दाभोलकर हत्‍या प्रकरणी सीबीआय अन्‍वेषणाचा अंतिम अहवाल १३ सप्‍टेंबरला न्‍यायालयात सादर होणार !

पुणे – अंनिसचे कार्याध्‍यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्‍या प्रकरणात केंद्रीय गुन्‍हे अन्‍वेषण विभागाचे (सीबीआयचे) अन्‍वेषण अधिकारी एस्.आर्. सिंह यांची उलटतपासणी ५ सप्‍टेंबर या दिवशी पूर्ण झाली. अधिवक्‍त्‍या सुवर्णा वस्‍त यांनी सिंह यांची उलटतपासणी घेतली. आतापर्यंत सीबीआयकडून या प्रकरणात २० साक्षीदारांची साक्ष नोंदवली आहे. त्‍यांची उलटतपासणी घेण्‍यात आली. प्रत्‍यक्षदर्शी साक्षीदारांसह ससून रुग्‍णालयाच्‍या शवविच्‍छेदन विभागातील डॉ. अजय तावरे, तसेच पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रानगट यांचीही उलटतपासणी घेण्‍यात आली. अन्‍वेषणाचा अंतिम अहवाल १३ सप्‍टेंबरला सादर करण्‍यात येणार आहे, अशी माहिती सीबीआयचे विशेष सरकारी अधिवक्‍ता अ‍ॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी न्‍यायालयात दिली. या प्रकरणात आणखी काही साक्षीदारांना न्‍यायालयात उपस्‍थित करायचे असल्‍यास त्‍यांची सूची सीबीआयला न्‍यायालयात सादर करावी लागणार आहे.