गाडी पूर्ण भरून सुटल्यानंतर ५ मिनिटांत दुसरी गाडी सोडणार !
मुंबई – गणेशोत्सवात भाविकांची असुविधा होऊ नये, यासाठी गाडी प्रवाशांनी भरल्यावर ती गाडी सोडल्यानंतर ५ मिनिटांनी पर्यायी गाडी सोडण्याचे नियोजन एस्.टी. महामंडळाने केले आहे. गणेशोत्सवासाठी आतापर्यंत एस्.टी.च्या २ सहस्र ७०० गाड्या आरक्षित झाल्या आहेत, अशी माहिती एस्.टी. महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.
अधिक माहिती देतांना शिवाजी जगताप म्हणाले, ‘‘मागील वर्षी गणेशोत्सवामध्ये २ सहस्र ९०० गाड्या आरक्षित झाल्या होत्या. यावर्षी आरक्षित गाड्यांची संख्या ३ सहस्र ४०० पर्यंत पोचण्याची शक्यता आहे. ऑनलाईन आणि प्रत्यक्ष पद्धतीने गाड्यांची नोंदणी चालू आहे. गणेशोत्सवानिमित्त १४ सप्टेंबर या दिवशी काही गाड्या, तर १६ सप्टेंबरपासून पूर्ण क्षमतेने गाड्या सोडण्यात येतील. गणेशोत्सवातील विशेष गाड्यांच्या व्यतिरिक्त अन्य नियमितच्या गाड्याही चालूच रहाणार आहेत.’’