हिंदु राष्‍ट्र निर्मितीच्‍या चळवळीचे ‘सनातन प्रभात’ हे मुखपत्र ! – योगेश तुरेराव, संपादक, दैनिक ‘अग्रणी वार्ता’

सोलापूर येथे उत्‍साहपूर्ण वातावरणात पार पडला साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’चा रौप्‍य महोत्‍सवी वर्धापनदिन !

डावीकडून श्री. राजन बुणगे, वर्षा कुलकर्णी आणि दीपप्रज्वलन करताना श्री. योगेश तुरेराव

सोलापूर, २१ ऑगस्‍ट (वार्ता.) – हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेसाठी आवश्‍यक वातावरण निर्माण करण्‍याचे कार्य ‘सनातन प्रभात’ने केले आहे. हिंदु राष्‍ट्र निर्मितीच्‍या चळवळीचे ‘सनातन प्रभात’ हे मुखपत्र आहे. धर्मशिक्षणाची आवश्‍यकता ओळखून ‘सनातन प्रभात’ने ते वृत्तपत्रातून देण्‍याचा प्रयत्न केला आहे. निद्रिस्‍त हिंदूंमधील ‘स्‍वत्‍व’ जागृतीचे कार्य ‘सनातन प्रभात’ करत आहे. धर्माचरण करणार्‍या धर्माभिमान्‍यांना निर्माण करण्‍याचे कार्य ‘सनातन प्रभात’ करत आहे. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता नि:स्‍वार्थी भावाने सेवा देणारे साधक हीच ‘सनातन प्रभात’ची खरी शक्‍ती आहे. ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार व्‍हा आणि संपर्कातील सर्वांना ते वाचण्‍यास द्या. हे ईश्‍वरी कार्य असल्‍यामुळे ‘सनातन प्रभात’ची वाटचाल ‘सनातन’ पद्धतीने वृद्धींगत होईल, असे प्रतिपादन दैनिक ‘अग्रणी वार्ता’चे संपादक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. योगेश तुरेराव यांनी केले. ते २० ऑगस्‍ट या दिवशी येथील पद्मावती मंगल कार्यालय येथे झालेल्‍या साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’च्‍या रौप्‍यमहोत्‍सवी वर्धापनदिन सोहळ्‍यात बोलत होते.

या वेळी व्‍यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे, तसेच ‘सनातन प्रभात’च्‍या वार्ताहर वर्षा कुलकर्णी उपस्‍थित होत्‍या. सोहळ्‍याचा प्रारंभ मान्‍यवरांच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलनाने करण्‍यात आला. वेदमूर्ती श्री. वेणूगोपाल जिला (पंतलु) आणि त्‍यांचे सहकारी यांनी वेदमंत्रपठण केले. सोहळ्‍याला १७५ वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ उपस्‍थित होते. सूत्रसंचालन श्री. किशोर जगताप आणि कु. रश्‍मी चाळके यांनी केले.

श्री. योगेश तुरेराव यांनी ‘सनातन प्रभात’ची सांगितलेली अन्‍य वैशिष्‍ट्ये

१. हिंदु धर्मातील प्रत्‍येक धार्मिक कृतीमागील शास्‍त्र ‘सनातन प्रभात’मधूनच वाचनास मिळते. ते अन्‍यत्र कुठेही पहायला मिळत नाही.

२. अनेक वृत्तपत्रांमध्‍ये पानांवरील जागा भरण्‍यासाठी कोणते तरी लिखाण प्रसिद्ध करायचे म्‍हणून प्रसिद्ध केले जाते; पण ‘सनातन प्रभात’मध्‍ये असे कोणतेही वृत्त अथवा लिखाण नसते की, ते जागा भरण्‍यासाठी वापरले जाते.

३. सनातन प्रभातने आतापर्यंत जे अंक प्रकाशित केले आहेत, त्‍यातून एक मोठे महाकाव्‍य निर्माण होऊ शकते.

४. ‘सनातन प्रभात’ हे २५ वर्षांपासून खर्‍या अर्थाने भाषाशुद्धीचे कार्य करत आहे. ते धर्मजागृतीच्‍या चळवळीसमवेत भाषाशुद्धीची चळवळही उत्तमरित्‍या उभी करत आहे.

वाचकांचे मनोगत

माझ्‍या जीवनाला परिपूर्ण आकार मिळाला, तो केवळ ‘सनातन प्रभात’मुळे ! – व्‍यंकटेश जिला

‘सनातन प्रभात’चे वाचन करण्‍यास प्रारंभ केल्‍यापासून मला आत्‍मज्ञान होत असल्‍याचे मी अनुभवत आहे. कुणाशी कसे बोलावे ? कसे वागावे ? याचे आकलन होऊ लागले आहे. मला शांत झोप लागण्‍यासाठी औषधाच्‍या गोळ्‍या घ्‍याव्‍या लागत होत्‍या; मात्र ‘सनातन प्रभात’चे वाचन करण्‍यास प्रारंभ केल्‍यापासून मला औषधाची एकही गोळी न घेता शांत झोप लागत आहे. माझ्‍या जीवनाला जो परिपूर्ण आकार मिळाला आहे, तो केवळ ‘सनातन प्रभात’मुळे ! त्‍यामुळे आपण सर्वजण प्रत्‍येक हिंदु कुटुंबापर्यंत सनातन प्रभात पोचवण्‍याचा प्रयत्न करूया.

परखडपणे लिखाण करणारे ‘सनातन प्रभात’ एकमेव नियतकालिक ! – व्‍यंकटदास शास्‍त्री

देव, देश आणि धर्म यांसाठी वाहून घेतलेले एकमेव वृत्तपत्र म्‍हणजे सनातन प्रभात ! हिंदु धर्माविषयीची जागृती करण्‍यासाठी परखडपणे लिखाण करणारे सनातन प्रभात हे एकमेव नियतकालिक आहे. सनातन प्रभातचे प्रत्‍येक वयोगटातील व्‍यक्‍ती, उदा. बालक, युवा, वयोवृद्ध अशा सर्वांनी वाचन करायला हवे.

क्षणचित्रे 

१. सोहळ्‍याला सनातन संस्‍थेच्‍या धर्मप्रचारक सद़्‍गुरु स्‍वाती खाडये आणि पू. (कु.) दीपाली मतकर यांचीही वंदनीय उपस्‍थिती होती.

२. या वेळी मागील अनेक वर्षांपासून ‘सनातन प्रभात’चे वितरण करण्‍याची सेवा अविरतपणे करणार्‍या वितरकांचा सत्‍कार श्री. योगेश तुरेराव यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.

संपादकीय भूमिका

‘सनातन प्रभात’ची वाटचाल ‘सनातन’ पद्धतीने वृद्धींगत होईल, ही त्‍याच्‍या कार्याला मिळालेली पोचपावतीच !

वितरक श्री. सशांक महामुनी यांचा सत्‍कार करतांना श्री. योगेश तुरेराव 
वितरक श्री. रमेश आवार यांचा सत्‍कार करतांना श्री. योगेश तुरेराव