आपल्या आधुनिक हिंदुस्थानात असलेल्या नौसेनेचे ब्रीद वाक्य आहे, ‘शं नो वरुण:’ याचा अर्थ आहे, ‘जलदेवतेने आमच्यावर कृपा करावी.’ आपल्या देशात समुद्रप्रवास हा प्राचीन काळापासून प्रचलित आहे. गुजरातमधील लोथल येथील खोदकामात असे आढळून आले आहे की, इसवी सन पूर्व २४५० च्या आसपास निर्माण केलेल्या बंदरातून इजिप्तशी समुद्रातून थेट व्यापार होत असे. (इसवी सन चालू होऊन आता २ सहस्र वर्षे पूर्ण होऊन २३ वर्षांचा काळ लोटला. याचा अर्थ ४ सहस्र ४७३ वर्षांपूर्वी आपल्याकडे जहाजातून समुद्रप्रवास करता येत होता.)
१. ब्रिटीश सरकारने हिंदुस्थानातील नौका निर्माण कलेचा गळा घोटणे
१ अ. नौका निर्माणाचा प्राचीन इतिहास रामायण आणि महाभारत यांच्या काळापासूनचा ! : वर्ष १९५० मध्ये ‘कल्याण’ मासिकाच्या ‘हिंदु संस्कृती’ विशेषांकात गंगाशंकर मिश्र यांनी नौका निर्माणाचा सविस्तर इतिहास लिहिला आहे. आपल्या प्राचीन वेद, ब्राह्मण, रामायण, महाभारत या साहित्यात जहाजांचा उल्लेख आढळतो. ‘महाभारता’त यांत्रिक नावेचे वर्णन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे, ‘सर्ववातसहां नावं यंत्रयुक्तां पताकिनीम् ।’, म्हणजे सर्व प्रकारच्या हवामानाला तोंड देणारी यंत्रे आणि पताकायुक्त नाव !
वराह मिहीर यांनी लिहिलेली ‘बृहत् संहिता’ आणि अकराव्या शतकात भोजराजाने लिहिलेला ‘युक्तिकल्पतरु’ या ग्रंथांमध्ये जहाज निर्मितीवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
१ आ. वास्को द गामाने हिंदुस्थानचा शोध लावला, हे तथ्यहीन ! : ‘वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी हिंदुस्थानचा मार्ग शोधत कालिकत बंदरात आला’, असे आपल्याला शिकवले गेले. यात काहीही तथ्य नाही. वस्तूस्थिती अशी…
पुरातत्व शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. विष्णु श्रीधर वाकणकर सांगतात, ‘मी अभ्यासासाठी इंग्लंडमध्ये गेलो होतो. तिथे एका संग्रहालयात वास्को द गामाच्या डायरीसंबंधी सांगितले गेले. त्या डायरीत वास्को द गामा हिंदुस्थानात कसा आला ? त्याचे वर्णन आहे. त्याने लिहिले आहे की, ‘ज्या वेळी माझे जहाज आफ्रिकेतील झांझिबार जवळ आले, तेव्हा मी माझ्या जहाजापेक्षा तिप्पट मोठे जहाज पाहिले. मी एका आफ्रिकन दुभाषासह त्या जहाजाच्या मालकाला भेटायला गेलो. चंदन नावाचा एक गुजराती व्यापारी जहाजाचा मालक होता. तो हिंदुस्थानातून चीड (पाईन वृक्ष) आणि सागवानाचे लाकूड अन् मसाले घेऊन आफ्रिकेत आला होता. तेथील हिरे घेऊन कोचीन बंदरात त्यांचा व्यापार करत असे.’ चंदन व्यापार्याने वास्को द गामाला विचारले, ‘तू कुठे जाणार आहे ?’ त्याने उत्तर दिले, ‘हिंदुस्थानला जाणार आहे.’ चंदन व्यापारी त्याला म्हणाला, ‘मी उद्या निघणार आहे तू माझ्या मागे ये.’ अशा प्रकारे चंदन व्यापाराच्या मागून वास्को द गामा हिंदुस्थानात येऊन पोचला.
१ इ. युरोपच्या तुलनेत भारतीय जहाजे अधिक मोठी आणि वर्षानुवर्षे टिकणारी अशी मजबूत असणे : पाश्चात्त्य लोकांनी ज्या वेळी हिंदुस्थानशी संपर्क केला, त्या वेळेला त्यांना हिंदुस्थानातील जहाजे पाहून आश्चर्याचा धक्का बसला; कारण १७ व्या शतकापर्यंत युरोपमधील जहाजे अधिकाधिक ६०० टनांची होती. हिंदुस्थानातील ‘गोदा’ नावाची जहाजे १ सहस्र ५०० टनांपेक्षा अधिक मोठी होती. युरोपीय कंपन्यांनी हिंदुस्थानात निर्माण होत असलेली जहाजे उपयोगात आणण्यास आरंभ केला. हिंदुस्थानातील कारागिरांकडून जहाजे बनवून घेण्यासाठी अनेक कारखाने चालू करण्यात आले.
वर्ष १८११ मध्ये लेफ्टनंट वॉकर याने लिहिले, ‘ब्रिटिशांच्या जहाजांच्या मालकीच्या जहाजांच्या दुरुस्त्या प्रत्येक १२ वर्षांनी कराव्या लागत असत. तथापि सागवानी लाकडाच्या भारतीय जहाजांचा उपयोग २५ वर्षांपेक्षा अधिक काळ कोणत्याही दुरुस्तीविना करता येईल. ईस्ट इंडिया कंपनीजवळ ‘दरिया दौलत’ नावाचे एक जहाज आहे, ते सलग ८७ वर्षे कोणत्याही दुरुस्तीविना वापरले गेले.’
वर्ष १८११ मध्ये एक फ्रेंच प्रवासी वाल्टझर सॉलविन्स याने ‘ली हिंदु’ या नावाचे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात प्राचीन काळापासून नौका निर्माण कलेत हिंदूच सर्वांत अग्रेसर होते आणि आजही ते युरोपीय लोकांना धडे शिकवतील. इंग्रजांनी हिंदूंकडून जहाज निर्मितीच्या अनेक गोष्टी शिकून घेतल्या. भारतीय जहाजांमध्ये सौंदर्य आणि उपयुक्तता यांचा पुष्कळ सुंदर मेळ साधला जातो.
१ ई. तत्कालीन हिंदुस्थानात जहाज निमिर्तीची ठिकाणे : मुंबई येथील कारखान्यात वर्ष १७३६ पासून १८६३ पर्यंत (म्हणजे १२७ वर्षांत) ३०० जहाजांची निर्मिती करण्यात आली. त्यातील अनेक जहाजे इंग्लंडच्या शाही ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. त्यात ‘एशिया’ नावाचे जहाज २ सहस्र २८९ टनांचे होते. या जहाजात ८४ तोफा बसवल्या होत्या. बंगाल प्रांतात हुगळी, सिल्हट, चितगाव आणि ढाका इत्यादी ठिकाणी जहाजांचे कारखाने होते. वर्ष १७८१ ते १८२१ या ४० वर्षांच्या कालखंडात १ लाख २२ सहस्र ६९३ टनांची २७२ जहाजे केवळ हुगळीमध्ये निर्माण करण्यात आली.
१ उ. इंग्रज सरकारने हिंदुस्थानची जहाजे न वापरण्यासाठी आणलेला दबाव : हिंदुस्थानचा हा नौका निर्माण कलेचा उत्कर्ष इंग्रजी सत्तेला सहन झाला नाही. इंग्लंडमधील इंग्रज सरकारने ‘हिंदुस्थानच्या जहाजांचा वापर करायचा नाही’, असा दबाव ईस्ट इंडिया कंपनीवर आणण्याचा प्रयत्न केला. तथापि वर्ष १८११ मध्ये कर्नल वॉकर यांनी आकडेवारी देऊन सिद्ध केले, ‘हिंदुस्थानच्या जहाजांच्या निर्मितीसाठी पुष्कळ कमी व्यय येतो. ही जहाजे मजबूत असतात. ब्रिटीश तांड्यांमध्ये केवळ हिंदुस्थानचीच जहाजे उपयोगात आणली, तर खर्चात पुष्कळ मोठी बचत होईल.’
नेमकी हीच गोष्ट जहाज निर्माण करणार्या इंग्रज व्यापार्यांना सहन झाली नाही. डॉ. टेलर यांनी लिहिले, ‘जेव्हा हिंदुस्थानी मालाने भरलेले हिंदुस्थानी जहाज लंडनच्या बंदरात पोचले, तेव्हा जहाजांच्या इंग्रज व्यापार्यांमध्ये घबराट निर्माण झाली.’ लंडन बंदरातील कारागिरांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाला कळवले, ‘हिंदुस्थानी खलाशांनी लंडनमध्ये आल्यावर आमचे सामाजिक जीवन पाहिले. त्यामुळे हिंदुस्थानात युरोपीय आचार-विचारांविषयी त्यांना आधी असलेला आदर आणि भय नष्ट झाले. ते आपल्या देशात परत जातील, तेव्हा आमच्याविषयी वाईट गोष्टींचा प्रसार करतील. त्यामुळे आशियातील नागरिकांमध्ये आज आमच्या आचरणाविषयी जो आदरभाव आहे आणि ज्याच्या जोरावर आम्ही आमचे प्रभुत्व टिकवले आहे, ते नष्ट होईल त्याचा परिणाम पुष्कळच हानीकारक ठरेल.’
१ ऊ. हिंदुस्थानी जहाजांना इंग्लंडमध्ये बंदी घालणे : यावर विचार करण्यासाठी ब्रिटीश संसदेने सर रॉबर्ट पिल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. या समितीच्या सदस्यांमध्ये परस्पर विरोधी मते असतांनाही वर्ष १८१४ मध्ये लंडन बंदरातील कामगारांनी जो अहवाल सादर केला होता, त्या अहवालावर आधारित एक कायदा पारित करण्यात आला. या कायद्यानुसार ‘हिंदुस्थानी खलाशांना ब्रिटीश नाभिक बनण्याचा अधिकार राहिला नाही. ब्रिटीश जहाजावरसुद्धा किमान ७५ टक्के खलाशी इंग्रजच असले पाहिजेत’, असा निर्बंध घालण्यात आला. ब्रिटीश मालकांच्या जहाजाव्यतिरिक्त अन्य जहाजे लंडन बंदरात प्रवेश करू शकणार नाहीत. तसेच इंग्रजांव्यतिरिक्त अन्य कुणीही बनवलेल्या अन्य जहाजातून बाहेरून मालाने लादलेली जहाजे इंग्लंडमध्ये येणार नाहीत’, असा नियम करण्यात आला.
वर्ष १८६३ पासून या नियमांची कार्यवाही कडक झाली. हिंदुस्थानातील प्राचीन नौका निर्माण कला अस्ताला जाईपर्यंत असे निर्बंध निर्माण करण्यात आले. हिंदुस्थानच्या जहाजांवर लादलेल्या मालावर कर वाढवला गेला. अशा प्रकारे व्यापारी उलाढालीतून हिंदूंना बाजूला करण्याचा प्रयत्न झाला. यावर भाष्य करतांना सर विल्यम डिग्वीने लिहिले, ‘पाश्चात्त्य (पश्चिमेकडील) जगाच्या राणीने अशा प्रकारे प्राच्य (पूर्वेकडील) सागराच्या राणीचा वध केला.’ अशा प्रकारे हिंदुस्थानातील नौका निर्माण कलेचा ब्रिटीश सरकारने गळा घोटला.
केवळ हिंदुस्थानलाच उज्ज्वल वैज्ञानिक परंपरेचा इतिहास !
आचार्य सुश्रुत यांच्या प्रसिद्ध ‘सुश्रुतसंहिता’ या ग्रंथात ‘प्लास्टिक सर्जरी’चे विस्तृत वर्णन आहे. असे असतांनाही ‘हिंदुस्थान विज्ञानाच्या क्षेत्रात मागासलेला होता’, असे बेधडक विधान केले जाते. आपल्यालाच आपल्या उज्ज्वल वैज्ञानिक परंपरेचा इतिहास ठाऊक नाही, तो जाणून घेण्याची इच्छाही नाही. ‘केवळ पाश्चिमात्यांनीच विज्ञानात प्रथम प्रगती केली’, यावर लोक अंधविश्वास ठेवतात. त्यासाठीच हा लेख प्रपंच !
२. ‘प्लास्टिक सर्जरी’ हिंदुस्थानने जगाला दिलेली देणगी
जहाज बांधणीसह वैद्यकीय क्षेत्रातही हिंदुस्थान आघाडीवर होता. जयपूरमध्ये (राजस्थान) रहाणार्या डॉ. विजया दया (एम्.डी. ॲनॅस्थेशिया) यांनी ‘प्लास्टिक सर्जरी’च्या एका प्रयोगाचे वर्णन केले आहे. ते असे….
२ अ. वर्ष १७९२ च्या काळात एका कुंभाराला ‘प्लास्टिक सर्जरी’ आणि अन्य शल्यकर्म यांचे ज्ञान असणे : ‘वर्ष १७९२ मध्ये टिपू सुलतान आणि मराठे यांच्यात युद्ध झाले. या युद्धात ४ मराठा सैनिक आणि एक गाडीवान यांचे हात अन् नाक कापले गेले. एका वर्षानंतर कासवजी नावाच्या गाडीवानावर आणि सैनिकांवर पुण्यातील एका कुंभाराने शल्यकर्म करून नव्या नाकाचे रोपण केले. हा कुंभार मातीची भांडी बनवत असे. तसेच माणसाचे कापलेले अवयव जोडण्याचे कामही तो कौशल्याने करत असे. रोग्याच्या शरिरावरील कातडे काढून त्या साहाय्याने कापल्या गेलेल्या अवयवांची आणि फाटलेल्या भागांची दुरुस्ती करण्यातही तो वाकबगार होता. या पद्धतीला आधुनिक वैद्यकीय शास्त्रात ‘प्लास्टिक सर्जरी’ असे म्हणतात.
२ आ. ‘प्लास्टिक सर्जरी’चे तंत्र शिकून लंडनचे डॉ. जे.सी.कार्प्यु यांनी युरोपमध्ये क्रांती घडवून आणणे : वर्ष १७९३ मधील कासवजीचे नवे नाक बसवल्याचे केलेले शस्त्रकर्म डॉ. थॉमस क्रुसो आणि डॉ. जेम्स फिंडले या दोन इंग्रजी चिकित्सकांनी पाहिले. त्या इंग्रज डॉक्टरांनी या प्रक्रियेचे चित्रांकन केले. त्याचा अहवाल ‘मद्रास गॅझेट’मध्ये प्रकाशित केला. हा अहवाल इंग्लंडमधील लंडन येथून प्रकाशित होणार्या ‘जंटलमन’ नावाच्या नियतकालिकात वर्ष १७९४ मध्ये छापला गेला.
युरोपमधल्या चिकित्सकांनी हा अहवाल वाचला आणि युरोपात खळबळ उडाली. युरोपमधील शल्य चिकित्सकांनी या संपूर्ण तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास केला. या अभ्यासकांमध्ये लंडनचे डॉ. जे.सी.कार्प्यु नावाचे ३० वर्षांचे एक शल्यचिकित्सक होते. वर्ष १८१४ मध्ये याच पद्धतीचा अवलंब करून त्यांनी एका रुग्णाच्या नाकाचे रोपण केले. ते शस्त्रकर्म यशस्वी झाली. त्यामुळे युरोपमधील चिकित्सा क्षेत्रात क्रांती झाली. डॉ. कार्प्यु आणि त्यांच्यासह त्या वेळच्या सर्व चिकित्सकांनी एका सुरात घोषणा केली, ‘प्लास्टिक सर्जरी हे हिंदुस्थानचे योगदान आहे.’
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (५.८.२०२३)
संपादकीय भूमिकानौका निर्माण आणि प्लास्टिक सर्जरी यांचे तंत्र ही भारताची जगाला असलेली देणगीच ! |