पलानी मुरुगन मंदिरात ‘बिगर हिंदूंना अनुमती नाही’, असे दर्शवणारे फलक पुन्हा लावा !

मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश

मदुराई – मद्रास उच्च न्यायालयाने ‘पलानी मुरुगन स्वामी मंदिरात मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेशावर बंदी’, असे नमूद करणारे फलक पुन्हा लावण्याचा आदेश दिला आहे.  मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाचे न्यायमूर्ती एस्. श्रीमथी यांनी पलानी मंदिर भक्ती संघटनेचे संयोजक डी. सेंथिलकुमार यांच्या याचिकेवर सुनावणी करतांना हा आदेश दिला. (मंदिरांतील सात्त्विकता जपण्याच्या दृष्टीने उच्च न्यायालयाचा स्तुत्य निर्णय ! – संपादक) अलीकडेच बिगर हिंदूंनी या टेकडीवरील मंदिरात जाण्यासाठी तिकिटे खरेदी केली होती. त्यांना प्रवेश नाकारल्यानंतर त्यांनी असा दावा केला होता की, टेकडीवरील मंदिर हे पर्यटनस्थळ आहे आणि बिगर हिंदू त्याला भेट देऊ शकतात.

सेंथिलकुमार यांनी टेकडी मंदिर परिसर आणि त्याच्या उपमंदिरांमध्ये केवळ हिंदूंनाच प्रवेशाची अनुमती द्यावी आणि त्या संदर्भातील फलक मंदिराच्या समोर लावण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती उच्च न्यायालयाला एका याचिकेच्या द्वारे केली होती. राज्यघटनेच्या कलम १५(२) नुसार मंदिरे ‘पिकनिक स्पॉट’ म्हणून वापरली जाऊ शकत नाहीत. यापूर्वी सर्व मंदिरांमध्ये ‘बिगर हिंदूंना मंदिरांमध्ये अनुमती नाही’, असे दर्शवणारे फलक होते. ते फलक काढून टाकण्यात आले होते, असे सेंथिलकुमार यांनी याचिकेत म्हटले होते.