ओडिशामध्ये माओवाद्यांच्या तळावरून मोठा शस्त्रसाठा जप्त !

भुवनेश्‍वर (ओडिशा) – राज्यातील मलकानगिरी वनक्षेत्रात सीमा सुरक्षादलाच्या सैनिकांनी माओवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई केली. कैमेला भागातील माओवाद्यांच्या तळाविषयी सीमा सुरक्षा दलाला गुप्तचर विभागाकडून माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सैनिकांनी शोधमोहीम हाती घेतली होती. या वेळी सैनिकांनी मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्रे, दारूगोळा, रॉकेट लाँचर जप्त केले.

काही दिवसांपूर्वी अशाच एका कारवाईत मलकानगिरीच्या मारिगेट्टा गावात सैनिकांनी माओवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला होता. त्यावेळीही शस्त्रास्त्रे आणि स्फोटके यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ओडिशा राज्याला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी माओवाद्यांच्या कारवाया निपटण्यासाठी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली होती.