सत्र न्यायालयाने चिखली (गोवा) येथील पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांना अंतरिम जामीन नाकारला !

  • पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याचे प्रकरण

  • आज होणार सुनावणी

(अंतरिम जामीन : अटकपूर्व जामीन किंवा नियमित जामिनासाठीचा अर्ज न्यायालयासमोर प्रलंबित असेपर्यंत न्यायालयाने तात्पुरता आणि अल्प कालावधीसाठी दिलेला जामीन)

पाद्री बोलमॅक्स पेरेरा

मडगाव, ७ ऑगस्ट (वार्ता.) – चिखली (गोवा) येथील पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांनी चर्चमधील प्रार्थनेच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याच्या प्रकरणी मडगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने पाद्री पेरेरा यांना अंतरिम जामीन नाकारला आहे. पाद्री पेरेरा यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी वास्को पोलिसांनी वेळ मागितल्याने न्यायालयाने सुनावणी स्थगित करून ती ८ ऑगस्ट या दिवशी ठेवली आहे.

पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांच्या विरोधात वास्को पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेचे कलम २९५(अ) आणि ५०४ कलमांखाली गुन्हा नोंदवला गेला आहे. यानंतर पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांनी मडगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांच्या न्यायालयात हा अर्ज ७ ऑगस्ट या दिवशी सुनावणीस आला. सत्र न्यायालयाने पाद्री पेरेरा यांना अंतरिम जामीन नाकारला.

 (सौजन्य : Prudent Media Goa)

(म्हणे) ‘पाद्री पेरेरा यांना सर्वांनी क्षमा करावी !’ – चर्चिल आलेमाव

या प्रकरणी माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी चलचित्राद्वारे (‘व्हिडिओ’द्वारे) गोमंतकियांना आवाहन केले आहे की, पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांनी चर्चमधील प्रार्थनेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करून चूक केली आहे. त्यांनी इतरांच्या श्रद्धास्थानाविषयी बोलायला नको होते; परंतु पाद्री पेरेरा यांनी नंतर मनापासून क्षमा मागितली आहे. यामुळे हे प्रकरण आणखी पुढे न वाढवता पाद्री पेरेरा यांना सर्वांनी क्षमा करावी. गोवा हे जागतिक पर्यटन क्षेत्र असल्याने येथील शांतता अबाधित ठेवणे आवश्यक आहे. (कोकणी-मराठी वादाच्या काळात राज्यभर दंगल उसळली होती तेव्हा, तसेच कोकण रेल्वेला विरोध करतांना घातलेला हैदोस या वेळी चर्चिल आलेमाव यांना गोवा हे जागतिक पर्यटन क्षेत्र आहे, हे ठाऊक नव्हते का ? आता पाद्रयाने केलेल्या वक्तव्यावरून जनक्षोभ उसळल्यावर कारणे सुचत आहेत का ? – संपादक)