माणसाचा श्‍वान होतो तेव्‍हा…!

लोकांना विविध विषयांचे छंद असतात, आवड असते. त्‍यासाठी लोक वाटेल ते करण्‍यास सिद्ध होतात. अशीच एक जगावेगळी बातमी काही दिवसांपूर्वी वाचनात आली. जपान येथील एका व्‍यक्‍तीला चक्‍क कुत्रा (श्‍वान) बनण्‍याची इच्‍छा होती. त्‍यामुळे त्‍याने स्‍वत:त काही पालट करण्‍यासाठी तब्‍बल १८ लाख रुपये व्‍यय केले आहेत. त्‍याच्‍यासाठी तेथील कपड्यांचे उत्‍पादन करणार्‍या प्रसिद्ध आस्‍थापनाला चक्‍क कुत्र्याचा पोशाख शिवून देण्‍यास सांगितले आणि आस्‍थापनाने ४० दिवसांनी तो सिद्ध करून दिलाही ! त्‍या व्‍यक्‍तीचे कुत्र्यात रूपांतर करण्‍याची प्रक्रिया १ वर्ष चालली आणि तो आता रस्‍त्‍यावर कुत्र्याप्रमाणे फिरत आहे. रस्‍त्‍यावर चालतांना तो चार पायांवर चालणार्‍या कुत्र्यासारखाच दिसतो. परिणामी त्‍याला पहाण्‍यासाठी लोक गर्दी करत आहेत. काही वर्षांपूर्वी त्‍या व्‍यक्‍तीने यूट्युबवर व्‍हिडिओ अपलोड करून त्‍याला प्राण्‍यांसारखे रहाण्‍याची इच्‍छा बोलून दाखवली होती आणि त्‍याची पूर्तता त्‍याने याप्रकारे केलीही आहे. हा जगावेगळा प्रकार ऐकून कुणीही डोक्‍यावर हात मारेल आणि हा कुठला छंद अशी निर्भत्‍सना करेल ! मात्र हा विषय तेवढ्यावर सोडून देण्‍यासारखा नाही.

(सौजन्य : InKhabar Official) 

पृथ्‍वीतलावर माणूस हा एक संस्‍कारी, मन, भावना आणि बुद्धी असलेला प्राणी आहे. या सर्व वैशिष्‍ट्यांचा उपयोग करून मानवाने त्‍याचे जीवनमान अधिक उंचावणे अपेक्षित आहे; मात्र तो त्‍याच्‍या उलट करू लागला आहे. जपान येथेे अन्‍यही काही विकृती लोक जोपासतात. त्‍यामध्‍ये कुणा पुरुषाला स्‍त्री, तर कुणा स्‍त्रीला पुरुष व्‍हावेसे, कुणाला भुतासारखे, तर कुणाला वस्‍त्रहीन रहावे वाटते, तर कुणाला समलैंगिक विवाह करायचा आहे. काहीतरी वेगळे करून दाखवण्‍याच्‍या नादात तो वस्‍तूस्‍थिती आणि निसर्ग यांपासून दूर कुठे तरी जात आहे.

अतिरेकी व्‍यक्‍तीस्‍वातंत्र्य, आत्‍मप्रौढी, अतीमहत्त्वाकांक्षा आणि पराकोटीचा स्‍वार्थ यांमुळे व्‍यक्‍ती स्‍वकोषात प्रचंड गुरफटली जाते अन् विकृत मानसिकता निर्माण करून बसते. त्‍यानंतर होणारी भयावह कृती केवळ त्‍याचेच नाही, तर सामाजिक स्‍वास्‍थ्‍यच बिघडवणारी ठरते. इतरांनीही असे विकृत छंद जोपासल्‍यास जग म्‍हणजे वेड्यांचा बाजार होईल हे निश्‍चित ! ‘मानवाचे पूर्वज हे माकड होते’, हे डार्विनच्‍या उत्‍क्रांतीवादाचे गृहीतक फसलेले आहे; मात्र ते उलट होऊन, सध्‍याचा मानव माकडाप्रमाणे वर्तन करून मानवाचा माकडच होतो कि काय ? अशीच परिस्‍थिती निर्माण झाली आहे. हे रोखण्‍यासाठी मानवाला धर्मशिक्षण देणेच आवश्‍यक आहे !

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल.