‘कोरोना’च्या काळात पालकांचे निधन झालेल्या मुलांना ‘बालसंगोपन योजने’चा लाभ देण्यात येत आहे ! – आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री

विधान परिषद कामकाज…

आदिती तटकरे

मुंबई, २८ जुलै (वार्ता.) – कोरोना महामारीच्या काळात एक किंवा दोन्ही पालकांचे निधन झालेल्या मुलांना ‘बाल संगोपन योजने’चा लाभ देण्यात येत आहे. मार्च २०२३ पर्यंत लाभाची संपूर्ण रक्कम मुलांना देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुलांना केवळ शैक्षणिक साहित्य किंवा खर्चासाठी साहाय्य करण्यात येते. त्यानुसार १४ कोटी ६८ लाख रुपये रक्कम वितरीत करण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत २७ जुलै या दिवशी दिली.

या वेळी मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, बालसंगोपन निधी २ सहस्र २५० रुपये प्रतिमास नियमितपणे देण्याचा प्रयत्न करू. त्यात कोणताही विलंब होणार नाही. त्यासाठी ५४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. ज्यांचे अधिकोषात खाते नाही, त्यांना सर्वातोपरी सहकार्य केले जाईल.