शाळांमध्ये स्मार्टफोनवर बंदी घाला ! – युनेस्को

युनेस्कोची शिफारस

(युनेस्को म्हणजे संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था)

नवी देहली – अभ्यासातील व्यत्यय टाळणे, शिकण्यात सुधारणा करण्यासाठी आणि मुलांचे साबयर गुन्ह्यांपासून संरक्षण करण्याकरता शाळांमध्ये स्मार्टफोनमध्ये बंदी घालावी, अशी शिफारस ‘युनेस्को’ने अर्थात् संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्थेने त्याच्या वर्ष २०२३ च्या ‘ग्लोबल एज्युकेशन मॉनिटर’ या अहवालातून केली आहे.

१. युनेस्कोने म्हटले आहे की, अनेक शाळांमधून आज ऑनलाईन शिक्षण दिले जाते. अनेक विद्यापिठांतही ऑनलाईन शिक्षणाची सोय करण्यात आली आहे; मात्र या सोयीमुळे विद्यार्थ्यांची हानी होत आहे. विकासाच्या दृष्टीने केलेले नवे प्रयोग चांगलेच असतात, असे नाही. प्रत्येक पालटामुळे  प्रगतीच साधली जाते, असे नाही. काहीतरी नवे करणे आवश्यकच असले, तरी ते केलेच पाहिजे, असे नाही. भ्रमणभाष संचाचा अतिरिक्त वापर झाल्याने शैक्षणिक कामगिरी मंदावते. सतत भ्रमणभाष पहात राहिल्याने मुलांच्या भावनिक स्थिरतेवर नकारात्मक परिणाम होतो. परिणामी मुले चिडचिडी आणि रागीट बनतात, असा निष्कर्षही युनेस्काने काढला आहे.

२. युनेस्कोच्या महासंचालक ऑड्रे अझौले म्हणाल्या की, ऑनलाईन शिक्षण देतांना शिक्षणाच्या सामाजिक परिणामांकडे दुर्लक्ष करून नये. डिजिटल क्रांतीमध्ये अतुलनीय क्षमता आहे; परंतु समाजात त्याचे नियमन केले जात नाही. ‘शिक्षणक्षेत्रात डिजिटल क्रांतीचा कसा वापर केला जात आहे’, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शिक्षणातील डिजिटल क्रांती ही विद्यार्थ्यांच्या विकासासाठी झाली पाहिजे. हा पालट विद्यार्थ्यांसाठी धोका ठरू नये. विद्यार्थ्यांच्या गरजा प्रथम ठेवा. ऑनलाईन सुविधा हे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवादासाठी पर्याय असू नये. शिक्षक प्रथम असले पाहिजेत. चीनमध्ये शिक्षण क्षेत्रात डिजिटल क्रांती झाली असली, तरीही तिथे मर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. एकूण वेळेच्या ३० टक्केच शिक्षण डिजिटल माध्यमातून दिले जाते.

संपादकीय भूमिका 

स्मार्टफोनमुळे मुलांवर होणारे दुष्परिणाम पहाता पालकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मुलांना त्यापासून दूर ठेवणे आवश्यक !