गोवा : राष्ट्रीय खेळांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा घोटाळा ! – विरोधकांचा आरोप

गोवा विधानसभा अधिवेशन

क्रीडामंत्री गोविंद गावडे

पणजी, २० जुलै (वार्ता.) – राष्ट्रीय खेळांच्या नावाखाली क्रीडा खात्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा आरोप करून विरोधी पक्षांनी २० जुलैला विधानसभेत पुन्हा क्रीडामंत्री गोविंद गावडे यांना लक्ष्य केले. १९ जुलैला त्यांच्यावर कला अकादमीच्या कोसळलेल्या छतावरून घोटाळ्याचे आरोप झाले होते.

(सौजन्य : In Goa 24×7)

गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई आणि काँग्रेसचे कार्लुस आल्वारेस फेरेरा यांनी, ‘काही नुकतीच करण्यात आलेली पायाभूत सुविधांची कामे राष्ट्रीय खेळांच्या नावाखाली पुन्हा करण्यात येत आहेत’, असा आरोप केला.

१२ कोटी १७ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या कांपाल येथील पोहण्याच्या तलावाचे (स्विमिंग पूलचे) गेल्या वर्षी उद्घाटन करण्यात आले होते. आता याच तलावासाठी मेंब्रेन लावायचे काम हाती घेऊन ३५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत, तसेच दीड कोटी रुपये खर्च करून तातडीच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. पेडे (म्हापसा) आणि बांबोळी येथील मैदानांसाठीही असाच अनावश्यक खर्च करण्यात आला आहे, असे आमदार विजय सरदेसाई म्हणाले.