शिष्याच्या मुखातून रात्रंदिवस श्री गुरुनामाचा मंत्रोच्चार सारखा चालू असतो. श्री गुरूंच्या वचनावाचून साधकाला दुसरे कोणतेही शास्त्र ठाऊक नसते. ज्या पाण्यास श्री गुरूंच्या चरणाचा स्पर्श झाला आहे, ते पाणी कसलेही असले, तरी त्यात संपूर्ण ब्रह्मांडाची तीर्थे साठवली असून ‘ते सर्व तीर्थांत श्रेष्ठ आहे’, असे गुरुभक्त समजतो.
साधकाला अकस्मात् श्री गुरूंचा उच्छिष्ट प्रसाद प्राप्त झाला, तर त्या लाभापुढे त्याला समाधीही नकोशी वाटते. श्री गुरु चालत असतांना त्यांच्या पायामागून जे धुळीचे रजःकण उडतात, ते रजःकण साधक आपल्या मस्तकावर धारण करतो आणि त्या लाभामुळे आपल्याला कैवल्यसुखाची प्राप्ती झाली आहे, असे तो समजतो.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘शिष्य’)