छत्रपती संभाजीनगर येथील २० मंदिरांत माहेश्‍वरी महिला मंडळाकडून वस्‍त्रसंहितेचे फलक !

प्रतिकात्मक चित्र

छत्रपती संभाजीनगर – सनातन धर्माचे पालन करत मंदिरात भारतीय परंपरेला शोभणारीच वस्‍त्रे परिधान करावीत, अशी मागणी मंदिर महासंघ आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना यांच्‍याकडून देशभरात केली जात आहे. त्‍यानुसार येथील माहेश्‍वरी महिला मंडळाने यासाठी पुढाकार घेत २० मंदिरांच्‍या दर्शनी भागात पोस्‍टर्स लावली आहेत. भाविकांनी कोणता पोशाख परिधान करावा, कोणता करू नये, याविषयी सूचना लावल्‍या आहेत. ‘अश्‍लील, बीभत्‍स, उत्तेजक वस्‍त्र परिधान करू नये’, असे फलकावर नमूद केले आहे. विशेष म्‍हणजे ही वस्‍त्रसंहिता (वस्‍त्रसंहिता म्‍हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्‍या कपड्यांच्‍या संदर्भातील नियमावली) फक्‍त तरुणींसाठी नव्‍हे, तर तरुणांसाठीही लागू करण्‍यात आली आहे.

मंदिराचे पावित्र्य अबाधित रहावे आणि संस्‍कृतीची जोपासना व्‍हावी; म्‍हणून तरुण आणि तरुणी यांनीही बर्म्‍युडा (अर्धी पँट) घालून मंदिरात येऊ नये, अशा सूचना केल्‍या आहेत. शहरातील सर्वाधिक भाविकांची संख्‍या असलेल्‍या वरद गणेश मंदिर, खडकेश्‍वर महादेव मंदिर, काळा गणपति मंदिरासह २० मंदिरांत हा फलक ४ जुलैला लावण्‍यात आला. ‘फॅशन’च्‍या नावाखाली विविध प्रकारचे कपडे परिधान करणे हे वैयक्‍तिक असले, तरीही मंदिर ही श्रद्धेची जागा आहे. तेथे तरुणींनी गुडघ्‍यापर्यंत स्‍कर्ट, लोअर घालून जाऊ नये, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

शहरातील मंदिरांत जेव्‍हा आम्‍ही या उपक्रमाविषयी चर्चा केली, तेव्‍हा सर्वांनी उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिला. संस्‍कृती संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्‍यकता आहे. या फलकाद्वारे आम्‍ही आवाहन केले आहे. आम्‍ही निर्बंध लादले नाहीत. तरुणाईचे जनजागरण करण्‍याचे काम आपणच केले पाहिजे, या उद्देशातून आम्‍ही हे काम करत आहोत. – प्रीती झंवर, अध्‍यक्ष, सिडको-हडको माहेश्‍वरी महिला मंडळ

आम्‍ही याविषयी निर्बंध लादलेले नाहीत; पण नागरिकांना महिला मंडळाने आवाहन केले आहे, त्‍याला आमची संमती आहे; कारण मंदिर ही सर्वांची श्रद्धा असलेली पवित्र वास्‍तू आहे. त्‍याचे पावित्र्य राखणे आपल्‍या सर्वांचे दायित्‍व आहे. तरुणाई हे भान ठेवणार नसेल, तर त्‍यांच्‍या लक्षात आणून देणे आपले काम आहे. – श्री. अनिल देशमुख, वरद गणेश मंदिर