लोक मुसलमानांच्या भेदभावाविषयी का बोलतात ?, हा प्रश्‍न पडतो ! – हुमा कुरेशी, अभिनेत्री

हुमा कुरेशी, अभिनेत्री

मुंबई – भारतात रहात असतांना मला कधीच वाटले नाही, की मी मुसलमान आहे किंवा मी वेगळी आहे. माझे वडील गेली ५० वर्षे ‘सलीम’ नावाचे रेस्टॉरंट चालवत आहेत. आजही जेव्हा अशा गोष्टी (मुसलमानांच्या भेदभावाविषयी) बोलल्या जातात, तेव्हा लोक असे नेमके का बोलतात ? हा प्रश्‍न पडतो, अशी प्रतिक्रिया मुसलमान अभिनेत्री हुमा कुरेशी यांनी व्यक्त केली आहे. ‘बॉलिवूडमध्ये मुसलमानांशी भेदभाव केला जातो का ?’ असा प्रश्‍न त्यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्या वेळी त्या बोलत होत्या.

(सौजन्य : ETimes)

या वेळी त्या असेही म्हणाल्या की, काही लोकांना भेदभाव वाटू शकतो. त्यामुळे प्रश्‍न विचारले पाहिजेत आणि सरकारने त्याची उत्तरेही दिली पाहिजेत. पंतप्रधान मोदी नुकतेच अमेरिकेला गेले होते, तेव्हा त्यांना अमेरिकी प्रसारमाध्यमांनी भारतातील मुसलमानांच्या हक्काविषयी प्रश्‍न विचारले होते.

संपादकीय भूमिका

हुमा कुरेशी यांच्या वक्तव्याविषयी ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे सांगणार्‍यांना काय म्हणायचे आहे ?