मणीपूर हिंसाचारावरील टिप्‍पणीवरून भारताकडून अमेरिकेच्‍या राजदूतांची कानउघाडणी !

भारताच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते अरिंदम बागची आणि अमेरिकी राजदूत एरिक गार्सेटी

नवी देहली – भारतातील अमेरिकी राजदूत एरिक गार्सेटी यांनी मणीपूरमध्‍ये चालू असलेल्‍या हिंसाचाराविषयी टिप्‍पणी केली होती. त्‍यावर भारताच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते अरिंदम बागची यांनी ‘मी अमेरिकी राजदूतांची प्रतिक्रिया वाचलेली नाही; परंतु जर ते असे म्‍हणाले असतील, तर मी स्‍पष्‍ट करू इच्‍छितो की, आम्‍ही तेथे शांतता प्रस्‍थापित करण्‍याचा प्रयत्न करत आहोत. आमच्‍या यंत्रणा आणि सुरक्षा दले यासाठी काम करत आहेत. आमचे स्‍थानिक सरकारही यासाठी प्रयत्नशील आहेच. कुणी विदेशी राजदूत भारताच्‍या अंतर्गत सूत्रांविषयी टिप्‍पणी करील, यावर माझा विश्‍वास नाही. तथापि त्‍यांची प्रतिक्रिया न वाचता मी त्‍याविषयी मत व्‍यक्‍त करू इच्‍छित नाही.

(म्‍हणे) ‘लहान मुले मारली जात असतील, तर चिंता व्‍यक्‍त करण्‍यासाठी भारतीय असण्‍याची आवश्‍यकता नाही !’ – अमेरिकी राजदूत

एका प्रश्‍नाच्‍या उत्तरात गार्सेटी म्‍हणाले होते की, मणीपूरमधील हिंसाचार, हा चिंतेचा विषय आहे. हिंसाचारात लहान मुलेही मारली जात असतील, तर त्‍याविषयी चिंता व्‍यक्‍त करण्‍यासाठी कुणी भारतीयच असण्‍याची आवश्‍यकता नाही. आम्‍ही भारताला मणीपूर हिंसाचारावरून साहाय्‍य करण्‍यासाठी सिद्ध आहोत.

काँग्रेसकडूनही अमेरिकेला विरोध !

काँग्रेसचे नेते मनीष तिवारी म्‍हणाले की, अमेरिकी राजदूताने भारताच्‍या अंतर्गत विषयांवर टिप्‍पणी करण्‍याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकेत बंदुकीद्वारे होत असलेल्‍या हिंसाचारात अनेक लोक मारले जातात. त्‍यावर आम्‍ही कधी अमेरिकेला ‘हे कसे रोखावे ?, ते आमच्‍याकडून शिका’, असे म्‍हटले नाही. वंशवादामुळे अमेरिकेला अनेक वेळा दंगलींना सामोरे जावे लागले आहे. यावरून आम्‍ही कधी ‘आम्‍हाला याविषयी अमेरिकेला व्‍याख्‍यान द्यायचे आहे’, असे म्‍हटले नाही.

संपादकीय भूमिका

अमेरिकेत होत असलेल्‍या हिंसाचाराचा पाढा वाचण्‍यास आरंभ केला, तर त्‍याची सूची अमर्याद होईल. भारताने आता अमेरिकेला आरसा दाखवण्‍याची आवश्‍यकता आहे !

मणीपूरमधील ख्रिस्‍ती जमातीकडून हिंसाचार केला जात असून भारतीय सुरक्षायंत्रणा त्‍यांच्‍या विरोधात कारवाई करत आहेत. त्‍यामुळे ख्रिस्‍तीधार्जिण्‍या अमेरिकेला पोटशूळ उठतो, यात काय ते आश्‍चर्य ?