सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ‘ब्रह्मोत्‍सवा’निमित्त विदर्भ येथे काढलेल्‍या ‘हिंदु एकता दिंडी’मध्‍ये साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा !

३ जुलै २०२३ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे, त्‍या निमित्ताने…

‘विदर्भातील अमरावती आणि वर्धा येथे २०.५.२०२३ अन् नागपूर येथे २१.५.२०२३ या दिवशी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवानिमित्त ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्‍यात आले होते. विदर्भात सध्‍या उन्‍हाची तीव्रता पुष्‍कळ प्रमाणात जाणवत आहे. या कालावधीत साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्‍यांना आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

अमरावती येथील दिंडीच्या प्रसंगी उपस्थित मान्यवर आणि धर्माभिमानी अन् समोर फुलांनी सजवलेल्या पालख्या

१. ‘हिंदु एकता दिंडी’ मार्गस्‍थ असतांना पाऊस पडणार, अशी लक्षणे असतांनाही साधक निश्‍चिंत असणे

२०.५.२०२३ या दिवशी अमरावती येथील ‘हिंदु एकता दिंडी’ सायंकाळी ६ वाजता नियोजित मार्गाने मार्गस्‍थ झाली. दिंडीने १ किलोमीटर अंतर पार केल्‍यावर अकस्‍मात् वारा सुटला आणि ‘पाऊस येणार’, अशी चिन्‍हे दिसू लागली. दिंडीतील साधक निश्‍चिंत होते; कारण ११.५.२०२३ या दिवशी गोवा येथे झालेल्‍या सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या आदल्‍या दिवशी पावसाची लक्षणे असूनही प्रत्‍यक्ष रथयात्रेच्‍या वेळी वरुणदेवाने केलेली कृपा त्‍यांनी अनुभवली होती. देवाला शरण जाऊन साधकांनी गुरुमाऊलींना प्रार्थना केली आणि वरुणदेवाचा नामजप चालू केला.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

२. सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी नामजपादी उपाय केल्‍यावर पावसाचे संकट टळून ‘हिंदु एकता दिंडी’ निर्विघ्‍नपणे पार पडणे

२ अ. अमरावती येथील ‘हिंदु एकता दिंडी’ निर्विघ्‍नपणे पार पडणे : अमरावती येथील साधिका श्रीमती विभा चौधरी यांनी मला पावसाची स्‍थिती कळवली. मी सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना संपर्क करून नामजपादी उपाय विचारल्‍यावर ते म्‍हणाले, ‘‘मीच नामजपादी उपाय करतो.’’ त्‍यांनी १० मिनिटे उपायांसाठी नामजप केला आणि मला सांगितले, ‘‘पावसाचे संकट टळले आहे. तुम्‍ही निश्‍चिंत रहा.’’ मी श्रीमती विभा चौधरी यांना संपर्क करून स्‍थिती विचारली. तेव्‍हा त्‍यांनी सांगितले, ‘‘आभाळ स्‍वच्‍छ झाले असून पावसाची कोणतीच लक्षणे नाहीत.’’ साधकांनी कृतज्ञता व्‍यक्‍त केली आणि दिंडी निर्विघ्‍नपणे पार पडली.

पू. अशोक पात्रीकर

२ आ. वर्धा येथील ‘हिंदु एकता दिंडी’ निर्विघ्‍नपणे पार पडणे : त्‍याच दिवशी वर्धा येथील ‘हिंदु एकता दिंडी’च्‍या वेळीही उन्‍हाची तीव्रता नेहमीपेक्षा अल्‍प होती आणि वातावरणात गारवा जाणवत होता.

वर्धा येथील ‘हिंदु एकता दिंडी’त पूजन केलेला धर्मध्वज आणि फुलांनी सजवलेली पालखी

२१.५.२०२३ या दिवशी नागपूर शहरातील दिंडी सायंकाळी ५ वाजता मार्गस्‍थ होणार होती. अकस्‍मात् दुपारी ३.३० दरम्‍यान आभाळात पावसाचे ढग आले आणि शहरातील काही भागांत पावसाचे थेंब पडू लागले. नागपूर येथील साधिका सौ. नम्रता शास्‍त्री यांनी मला संपर्क करून पावसाची स्‍थिती सांगितली. दिंडीला काही वेळ होता; पण साधक गुरूंवरील श्रद्धेमुळे दिंडीच्‍या सिद्धतेत मग्‍न होते. मी सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना संपर्क करून दोन्‍ही दिंडीसाठी नामजपादी उपाय विचारल्‍यावर ते म्‍हणाले, ‘‘मीच १५ मिनिटे नामजपादी उपाय करतो.’’ त्‍यांनी १५ मिनिटे उपायांसाठी नामजप केला आणि मला कळवले, ‘पावसाची लक्षणे नाहीत.’ थोड्याच वेळात उत्तरदायी साधिकेचा लघुसंदेश आला, ‘ऊन पडले असून पावसाची भीती नाही.’

वरील तिन्‍ही प्रसंगांतून ‘वरुणदेवाने काही क्षण येऊन गुरूंच्‍या (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या) ‘हिंदु एकता दिंडी’ला आशीर्वाद दिला. दुसरीकडे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे पंचमहाभूतांवर जसे नियंत्रण आहे, तसेच नियंत्रण ठेवण्‍याची शक्‍ती त्‍यांनी सद़्‍गुरु गाडगीळकाकांनाही प्रदान केली आहे’, हे लक्षात आले. अशी अखंड कृपा गुरुमाऊली सर्व साधकांवर करत असते. त्‍यासाठी त्‍यांच्‍या चरणी कितीही कृतज्ञता व्‍यक्‍त केली, तरी ती अल्‍पच आहे. गुरुमाऊलींनी सुचवलेली ही शब्‍दसुमने त्‍यांच्‍या चरणांवर समर्पित करतो.’

– (पू.) अशोक पात्रीकर, फोंडा, गोवा. (२३.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधक आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक