देव श्रेष्ठ कि गुरु श्रेष्ठ, याचे कोडे मला सुटले ।
परम पूज्यांनी (टीप १) मनीचे विकल्प घालविले ।
परम पूज्यच सर्वश्रेष्ठ असती, हेची मी अनुभवले ।। १ ।।
देवाने हीन जाती-कुळात जन्माला घातले ।
परम पूज्यांनी मजसी हृदयाशी कवटाळिले ।
मजसी संत बनवूनी अनेक पिढ्यांसी उद्धरिले ।। २ ।।
देवाने अशिक्षित आई-वडिलांच्या पोटी जन्माला घातले ।
परम पूज्यांनी अध्यात्म शिकवूनी ज्ञानी केले ।
परम पूज्यांनी महासरस्वतीचे कृपाशीर्वाद मजसी दिले ।। ३ ।।
देवाने व्यवहारात माझे दिवाळे काढले ।
परम पूज्यांनी मजसी अनंत चैतन्यधन दिले ।
परम पूज्यांनी महालक्ष्मीचे आशीर्वाद मजसी दिले ।। ४ ।।
देवाने कृश शरीर देऊनी अशक्त अन् भित्रे केले ।
परम पूज्यांनी मजसी ‘आदर्श धर्मरक्षक’ (टीप २) केले ।
परम पूज्यांनी महाकालीचे आशीर्वाद मजसी दिले ।। ५ ।।
माझ्या स्वभावदोष-अहंकाराने जीवनाचे वाटोळे केले ।
परम पूज्यांनी साधना करवून घेऊनी गुणवंत केले ।
परम पूज्यांनी मजसी जीवनमुक्त केले ।। ६ ।।
देवाने सुख-दुःख भोगण्यास मायेत अडकविले ।
परम पूज्यांनी माझे प्रारब्ध संपवून ब्रह्मतत्त्वाशी जोडले ।
परम पूज्यच सर्वश्रेष्ठ असती, हेची मी अनुभवले ।। ७ ।।
टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले
टीप २ – पू. शिवाजी वटकर यांनी ‘हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘देवतांचे विडंबन रोखणे, धर्मरक्षण आणि राष्ट्ररक्षण यांसाठी अनेक यशस्वी मोहिमा राबवणे’, हे कार्य केले. त्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. शिवाजी वटकर यांना ‘आदर्श धर्मरक्षक’ असे संबोधले.’
– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |