गोवा : पद्मश्री विनायक खेडेकर आणि पंडित प्रभाकर कारेकर गोमंत विभूषण पुरस्काराने सन्मानित

पणजी, ३० मे (वार्ता.) – पद्मश्री विनायक खेडेकर यांना लोककलेसाठी आणि पंडित प्रभाकर कारेकर यांना भारतीय शास्त्रीय संगीतासाठी गोमंत विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दोनापावला येथील राजभवन येथे गोमंत विभूषण पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. याप्रसंगी कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, इतर मंत्रीगण आणि शासकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.

या वेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, गोव्याने मागील १० वर्षांत सर्वच क्षेत्रांमध्ये चांगला विकास केला आहे; मात्र काही जण याकडे दुर्लक्ष करून सरकारवर केवळ टीकाच करत आहेत. राज्यात कला आणि साहित्य या क्षेत्रांमध्ये अनेक रत्ने सिद्ध झाली आहेत. या कलाकारांची माहिती भावी पिढीला मिळावी, तसेच कलाकारांच्या योगदानाचे कौतुक व्हावे, यांसाठी गोमंत विभूषण पुरस्कार दिला जातो. गोव्यात कला आणि संस्कृती क्षेत्रांमध्ये मोठा वाव आहे.

मंत्री गोविंद गावडे म्हणाले, गोवा ही भारताची सांस्कृतिक राजधानी आहे. गोव्यातील संगीत कलाकारांना जागतिक कीर्तीचा मान मिळत आहे.