देशाचे आरोग्य स्वस्थ आणि बलशाली होण्यासाठी तंबाखू अन् तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला विरोध आवश्यक !

आज ३१ मे ‘जागतिक तंबाखूविरोधी दिन’ आहे. त्या निमित्ताने…

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्या आजूबाजूला सर्वत्र दिसून येतात. घर, कार्यालये, तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारी अन् धूम्रपान करणारी मंडळी दिवसेंदिवस वाढत चालली आहेत.

१. प्रौढ मंडळींच्या तंबाखू सेवनात घट; पण युवकांच्या तंबाखू सेवनात लक्षणीय वाढ

भारतात तंबाखू नियंत्रणासाठी कायदा आहे; पण कडक कार्यवाहीच्या अभावी तो फक्त कागदावरच राहिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार तंबाखूमुळे जगात प्रतिवर्षी ६० लाख लोकांचा मृत्यू होतो. ही संख्या वर्ष २०३० पर्यंत ८० लाख होण्याची शक्यता आहे. जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षणात महाराष्ट्रातील अल्पवयीन आणि तरुण यांच्यामधील तंबाखू सेवनाविषयी चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रौढ मंडळींच्या तंबाखू सेवनात गेल्या ७ वर्षांत ३१.४ टक्क्यांवरून २६.६ टक्क्यांपर्यंत घट नोंदवण्यात आली आहे; पण १५ ते १७ वयोगटातील युवकांच्या तंबाखू सेवनात मात्र २.९ टक्क्यांवरून ५.५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तंबाखू सेवन वाईटच; पण तंबाखू सेवनास प्रारंभ करण्याचे सरासरी वयही साडेअठरावरून १७ वर्षे ४ मास या वयावर येऊन पोचले आहे.

२. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणार्‍या मृत्यूच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ

तंबाखूजन्य पदार्थांवर लावलेल्या करामुळे (‘टॅक्स’मुळे) सरकारच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा होत असला, तरी ‘या पदार्थांच्या सेवनामुळे प्रतिवर्षी ६  लाख व्यक्तींचा मृत्यू होत असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच प्रतिवर्षी ८ लाख नवे रुग्ण आढळत असून यातील ३ लाख २० सहस्र रुग्ण तोंडाच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत’, अशी माहिती ‘कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’ (सीपीएए)ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात आहे.

तंबाखूमुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून एकट्या मुंबईत हे प्रमाण २५.४ टक्के आहे. याखेरीज लहान मुलांमध्येही धूम्रपान करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ‘जागतिक तंबाखूविरोधी दिना’निमित्त प्रबोधनावर भर दिला जात आहे.

३. धूम्रपानाची सवय सुटण्यासाठी ‘निकोटिन रिप्लेसमेंट थेरपी’ (टीप)

(टीप : ‘निकोटिन रिप्लेसमेंट थेरपी’ ही लोकांना धूम्रपान थांबवण्यास साहाय्य करण्यासाठी एक उपचारपद्धत आहे. ही थेरपी निकोटीनचा अल्प डोस पुरवणारी उत्पादने वापरते. या उत्पादनांमध्ये धुरात आढळणारे अनेक विषारी घटक नसतात. निकोटीनची लालसा न्यून करणे आणि निकोटीन काढण्याची लक्षणे न्यून करणे, हे या थेरपीचे ध्येय आहे.)

धूम्रपान करणार्‍यांसह इतरांवर याचा विपरित परिणाम होतो. तंबाखूच्या उत्पादनांची उपलब्धता आणि घरात एखाद्याला धूम्रपानाची असलेली सवय यांमुळे लहान वयात मुलांना व्यसनांची सवय होते. सध्या भारतात वयाच्या अवघ्या ९ व्या आणि १० व्या वर्षी धूम्रपानास प्रारंभ करणारी मुले आहेत. त्यामुळे धूम्रपानाशी निगडित आजारांमुळे मृत्यू होण्याची शक्यताही अधिक असते. धूम्रपान करणार्‍या ७० टक्के लोकांना धूम्रपानामुळे होणार्‍या दुष्परिणामांची जाणीव असते आणि यातील ५० टक्के लोकांची ही सवय सोडण्याची इच्छा असते; मात्र धूम्रपानाच्या सततच्या सवयीमुळे संबंधित व्यक्तीच्या शरिरावर निकोटिनचा प्रभाव पडलेला असतो. त्यामुळे ही सवय सुटता सुटत नाही. ‘निकोटिन रिप्लेसमेंट थेरपी’ (एन्.आर्.टी.) करून धूम्रपानाची सवय सोडता येते; मात्र कायमस्वरूपी हे व्यसन सोडणे व्यक्तीच्या इच्छेवरच अवलंबून असते.

४. केंद्र आणि राज्य सरकार यांच्या सहयोगाने राबवण्यात येणारा ‘राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम’

केंद्र आणि राज्य सरकार यांच्या सहयोगाने महाराष्ट्रात ‘राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम’ राबवण्यात येत आहे. या अंतर्गत व्यसन करणारे लोक आणि मुले व्यसनाच्या आहारी जाऊन अकाली मृत्यूचे प्रमाण न्यून व्हावे, यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. या जनजागृतीमुळे व्यसनाचे गंभीर परिणामही जनतेपर्यंत पोचवले जात आहेत. या कायद्याच्या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदी, १८ वर्षांखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणे वा विकायला लावण्यास प्रतिबंध, तंबाखूचा प्रसार, विज्ञापन आणि प्रायोजकत्व यांवर बंदी, शैक्षणिक संस्थेच्या १०० मीटर परिसरात तंबाखू विक्रीवर बंदी, तंबाखू उत्पादनावर धोक्यांच्या सूचना देणे याचा अंतर्भाव होतो. शासकीय कार्यालयात आणि परिसरात या पदार्थांच्या सेवनावर कडक बंदी असून अशा लोकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार कायद्याने अधिकार्‍यांना दिले आहेत.

५. व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी करावयाचे प्रयत्न

तंबाखू सेवन ही शालेय मुलांमध्ये आज सर्वांत मोठी चिंतेची गोष्ट असून लहान मुलांमधील व्यसनाचे प्रमाण न्यून करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. स्वतः पालकांनी मुलांसमोर व्यसन न करता त्यापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे; कारण लहान मुले ज्येष्ठांचेच अनुकरण करतात आणि परिणामी वाढत्या वयात मुले व्यसनाधीन होतात. त्यामुळे व्यसनापासून मुक्तता ही योग्य वयातच झाली पाहिजे. व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी व्यायाम, प्राणायाम, योगासने, आवडीचा छंद जोपासून त्यात रममाण होणे, व्यसनी संगतीपासून दूर रहाणे, वैद्यकीय साहाय्य घेणे यांसारखे उपाय करता येतील. व्यसनमुक्तीकडे चालू असलेल्या प्रक्रियेमध्ये समाजातील सर्व स्तरातील घटकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.

व्यसनाधिनतेचे परिणाम आपल्या आजूबाजूला व्यसनामध्ये अडकलेल्या लोकांना सांगून त्यांना व्यसनापासून रोखणे आणि त्यांना त्यापासून परावृत्त करणे, हे आपले सर्वांचे सामूहिक उत्तरदायित्व आहे. आपण सर्वजण मिळून जर या व्यसनाधीनतेच्या विरुद्ध प्रयत्न केला आणि तंबाखू अन् तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला विरोध केला, तर नक्कीच नागरिकांचे, देशाचे आरोग्य स्वस्थ अन् बलशाली होण्यास साहाय्य होईल हीच अपेक्षा !

– डॉ. अनिल आलुरकर आणि श्री. संजीव वेलणकर

(साभार : ‘मराठीसृष्टी’चे संकेतस्थळ)