‘स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन’ प्रक्रियेच्‍या अंतर्गत स्‍वयंसूचना दिल्‍यावर बेंगळुरू (कर्नाटक) येथील साधिका सौ. कोमला श्रीवत्‍सन यांना त्‍यांच्‍यामध्‍ये जाणवलेले पालट अन् आलेल्‍या अनुभूती !

१. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी साधकांना येणार्‍या सर्व समस्‍यांवर मात करण्‍यासाठी स्‍वयंसूचना घेण्‍याविषयी सांगितल्‍याची जाणीव होणे

सौ. कोमला श्रीवत्‍सन

‘९.५.२०२१ या दिवशी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या जन्‍मोत्‍सव सोहळ्‍याचे संगणकीय प्रणालीद्वारे प्रसारण केले होते. त्‍यामध्‍ये परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी साधकांना पूर्वी केलेल्‍या मार्गदर्शनाचा काही भाग दाखवला होता. त्‍यांचे मार्गदर्शन ऐकतांना ‘साधकांना येणार्‍या सर्व समस्‍यांवर मात करण्‍यासाठी गुरुदेव (परात्‍पर गुरु डॉ. आठवले) स्‍वयंसूचना घेण्‍याविषयी सांगत आहेत’, याची मला जाणीव झाली. मी ‘सनातन संस्‍थे’च्‍या मार्गदर्शनानुसार वर्ष २००० मध्‍ये प्रारंभ केला असूनही स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन या प्रक्रियेच्‍या संदर्भात सातत्‍य अन् नियमितपणा राखू शकले नव्‍हते. त्‍यामुळे ‘माझ्‍या आयुष्‍याची आजपर्यंतची वर्षे वाया गेली’, याची मला खंत वाटली. त्‍यानंतर घरातील कामे करतांनाही मला निरुत्‍साह जाणवू लागला. मी भगवान श्रीकृष्‍णाला साहाय्‍य करण्‍यासाठी तळमळीने प्रार्थना करू लागले.

२. साधकांना सेवेच्‍या संदर्भात स्‍वतःच्‍या चुका सांगण्‍याविषयी कळवल्‍यावर आरंभी भीती वाटणे आणि नंतर इतरांच्‍या चुकांमधून पुष्‍कळ शिकायला मिळणे

३.६.२०२१ या दिवशी संध्‍याकाळी एका सेवेविषयी विचारविनिमय करण्‍यासाठी सत्‍संग आयोजित करण्‍यात आला होता. त्‍या दिवशी सकाळपासूनच मला उत्‍साह वाटू लागला. साधकांना या सेवेच्‍या संदर्भात स्‍वतःच्‍या चुका आणि अडचणी सांगण्‍याविषयी कळवण्‍यात आले होते. आरंभी मला प्रचंड भीती वाटत होती; परंतु नंतर माझ्‍यात पालट झाला. मी श्रीकृष्‍ण आणि गुरुदेव यांना ‘मला माझ्‍यामध्‍ये सुधारणा करण्‍यासाठी जे सांगण्‍यात येईल, त्‍याला सामोरे जाण्‍याचे बळ मला द्या’, अशी प्रार्थना करत होते. मी गुरुदेवांना शरण गेले आणि म्‍हणाले, ‘माझ्‍या चुकांविषयी विचारले अथवा मला चुकांविषयी कठोरपणे सांगण्‍यात आले, तरी ते स्‍वीकारण्‍याची अन् माझ्‍यात सुधारणा करण्‍याची शक्‍ती आपण मला द्यावी.’ प्रत्‍यक्षात वेळेअभावी माझ्‍या चुका घेतल्‍या नाहीत; परंतु इतरांच्‍या चुकांमधून मला पुष्‍कळ शिकायला मिळाले. ‘साधकांना सांगितलेली सर्व सूत्रे मलाही लागू आहेत’, असे मला वाटले.

३. अनुभूती

३ अ. स्‍वयंसूचना घेतल्‍यामुळे औषधे अथवा विश्रांती न घेऊनही डोके दुखणे आपोआप थांबणे : ‘मे २०२१ मध्‍ये माझ्‍या कुटुंबियांसह घडलेल्‍या २ प्रसंगांत माझ्‍यातील अहं आणि स्‍वभावदोष उफाळून आले होते. त्‍यामुळे मला प्रचंड डोकेदुखी चालू झाली. तेव्‍हा हे केवळ शारीरिक त्रास नसल्‍याचे माझ्‍या लक्षात आले. अकस्‍मात् माझ्‍या मनात स्‍वभावदोषांवर स्‍वयंसूचना घेण्‍याचा विचार आला आणि मी केवळ २ – ३ वेळा स्‍वयंसूचना घेताच काहीही औषधे अथवा विश्रांती न घेता माझे डोके दुखणे थांबले. त्‍या वेळी माझ्‍या लक्षात आले, ‘स्‍वयंसूचना अत्‍यंत परिणामकारक आहेत. या नियमितपणे करायला हव्‍यात.’

३ आ. पू. रमानंद गौडा यांनी स्‍वयंसूचना सत्रांची संख्‍या वाढवण्‍यास सांगितल्‍यावर तसे प्रयत्न होणे : पू. रमानंद गौडा यांनी मला व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधनेचा आढावा ‘व्‍हॉट्‍स अ‍ॅप’वर पाठवण्‍यास सांगितले. मी ३ दिवस माझा व्‍यष्‍टी साधनेचा आढावा पाठवल्‍यानंतर पू. रमानंद गौडा यांनी मला स्‍वयंसूचना सत्रांची संख्‍या वाढवण्‍यास सांगितले. त्‍या वेळी मी केवळ १ – २ स्‍वयंसूचनांची सत्रे करत होते. नंतर गुरुकृपेने १० सत्रे होऊ लागली.

४. माझी ६ वर्षांची मुलगी संकीर्तना हिनेही स्‍वतःच्‍या चुका लिहायला आरंभ केला असून तिला स्‍वयंसूचना शिकून ती घेण्‍याची आवड निर्माण झाली आहे.

५. स्‍वयंसूचना नियमितपणे दिल्‍यावर शरीर, मन, बुद्धी आणि आध्‍यात्मिक स्‍तरावर जाणवलेले पालट

आधी मी नकारात्‍मक विचार करायचे आणि मला ‘स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिये’मध्‍ये अजिबात रुची नव्‍हती. मी सातत्‍याने ६ ते ८ स्‍वयंसूचना देऊ लागल्‍यावर मला ‘नामजप करतांना येतो’, तसा ईश्‍वरी कृपेचा अनुभव येऊ लागला. त्‍यामुळे मी उत्‍साहाने स्‍वयंसूचनांची सत्रे करू लागले. त्‍यामुळे मला माझ्‍यात पुढील पालट जाणवले.

अ. आधीच्‍या तुलनेत झोपेचे प्रमाणही पुष्‍कळ न्‍यून झाले आहे.

आ. घरकाम आणि सेवा करतांना उत्‍साह वाढला आहे.

इ. दिवसभरात येणारे अनावश्‍यक विचार न्‍यून झाले आहेत.

ई. मानसिक ताण आणि चिंता अल्‍प झाल्‍या आहेत.

उ. काही दिवसांनी मला नियमितपणे स्‍वयंसूचना घेतल्‍यानंतर १ घंट्याने पुढच्‍या स्‍वयंसूचनेच्‍या वेळाची जाणीव होत होती. तेव्‍हा ‘श्‍वास घेण्‍यासाठी अथवा तहान लागली असतांना पाणी पिण्‍यासाठी जसे अस्‍वस्‍थ वाटते’, तसे मला वाटायचे.

ऊ. काही वेळा झोपेतही आपोआप स्‍वयंसूचना दिल्‍या जातात.

ए. मी स्‍वयंसूचना देते, तेव्‍हा माझ्‍याभोवती असलेले त्रासदायक शक्‍तीचे आवरण न्‍यून होत असून माझ्‍या सूक्ष्मदेहाचे शुद्धीकरण होत असल्‍याचे मला जाणवते.

६. परिणामकारकता

स्‍वयंसूचना सांगितलेल्‍या संख्‍येत (न्‍यूनतम १० आणि अधिकाधिक २५) दिल्‍या पाहिजेत, तरच त्‍या परिणामकारक होतात. ‘डॉक्‍टरांनी कोणत्‍याही रोगासाठी जितक्‍या वेळा औषध घेण्‍यास सांगितले असेल, तितक्‍या वेळा ते घ्‍यावे लागते’, तसे हे आहे. स्‍वयंसूचना दिवसातून केवळ ३ – ४ वेळा दिल्‍याने हेतू साध्‍य होणार नाही.

मला मार्गदर्शन करून या अनुभूती दिल्‍याविषयी परात्‍पर गुरु डॉ. आठवले आणि पू. रमानंद गौडा यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करते.’

– सौ. कोमला श्रीवत्‍सन, बेंगळुरू (१९.६.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक