‘सनातनचे संत गुरुच आहेत’, अशी अनुभूती देणारे  सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद (अण्‍णा) गौडा (वय ४७ वर्षे) यांना साधिकेने केलेले आत्‍मनिवेदन !

ज्‍येष्‍ठ शुक्‍ल नवमी (२९.५.२०२३) या दिवशी सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद (अण्‍णा) गौडा यांचा ४७ वा वाढदिवस झाला. त्‍यानिमित्त साधिकेने त्‍यांना केलेले आत्‍मनिवेदन येथे दिले आहे.

‘गुरु माता, गुरु पिता, गुरु बंधु आणि गुरु सखा’ अशी सर्व नाती गुरुदेवांच्‍या कृपेने मला पू. रमानंद (अण्‍णा) गौडा यांच्‍या सत्‍संगात पदोपदी अनुभवायला मिळाली आणि मिळत आहेत.

१. साधकांना ध्‍येयप्राप्‍ती करण्‍यासाठी आध्‍यात्मिक बळ देणारे पू. रमानंदअण्‍णा !

पू. रमानंद गौडा

पू. अण्‍णा, तुम्‍ही बोलत असतांना तुमचा ध्‍वनी आणि विचार काही वेळा झुळझुळ वहाणार्‍या लाटांप्रमाणे आमच्‍यापुढे येतो. काही वेळा अडथळे आले, तरीही त्‍यांना न जुमानता समुद्राला मिळण्‍याचे ध्‍येय ठेवून एकाग्रतेने वहाणार्‍या नदीसारखे सर्व अडथळ्‍यांच्‍या पलीकडे जाण्‍याचा भाव तुम्‍ही आमच्‍यात निर्माण करता. पू. अण्‍णा, तुम्‍ही साधकांची आई होऊन त्‍यांच्‍यावर वात्‍सल्‍याचा वर्षाव करता आणि साधकांचा मोठा भाऊ होऊन त्‍यांना स्नेह देता.

२. साधकांना गुरुतत्त्वाशी जोडून आधार देणे

एकाच सत्‍संगात मला तुमची अनेक रूपे दिसतात. प्रत्‍येक वेळी तुम्‍ही आम्‍हाला अंतर्मुख करता. तुम्‍ही आम्‍हाला सदैव गुरुतत्त्वाशी जोडता. तुम्‍ही आम्‍हाला सतत सेवेत ठेवता. ‘आम्‍ही भवसागरात गटांगळ्‍या खाऊ नये’, यासाठी तुम्‍ही आम्‍हाला हात देऊन बाहेर काढता. तुम्‍ही बोलत असतांना प्रत्‍येक वेळी माझ्‍यावर गुरुचरणांचे तीर्थ शिंपडल्‍यासारखे वाटते.

३. ‘सेवेत बुद्धीचा वापर अधिक होत आहे’, असे साधिकेला सांगून तिच्‍यात शरणागतभाव निर्माण करणे

सौ. विदुला हळदीपूर

पू. अण्‍णा, तुम्‍ही अनेक वेळा मला ‘सेवेत बुद्धीचा अधिक उपयोग होत आहे’, असे सांगत होता. तेव्‍हा मी सूक्ष्मातून गुरुचरणांशी जाऊन रडत होते. मी गुरुदेवांना सूक्ष्मातून सांगत होते, ‘गुरुदेवा, मी या बुद्धीच्‍या बेडीतून बाहेर कशी पडू ?’ नंतर माझ्‍या लक्षात आले, ‘तुमच्‍या वाणीनेच ती बेडी तुटणे साध्‍य झाले. मी आणखी पुष्‍कळ प्रयत्न करायला हवेत.’ बुद्धीच्‍या गर्वात रहाणार्‍या मला इथपर्यंत आणून सोडणार्‍या सच्‍चिदानंद परब्रह्माच्‍या दिव्‍य चरणी कोटीशः कृतज्ञता !

४. आईच्‍या मायेने साधकांना सांभाळणारे पू. रमानंदअण्‍णा !

आईची बाळावर निर्मळ प्रीती असते. आईचे तिच्‍या मुलावरील प्रेम वेगवेगळ्‍या प्रकारे व्‍यक्‍त होत असते. ती मुलाला चुका सांगतांनाही मुलावर प्रेमच करत असते. मुलाने चूक केल्‍यास प्रारंभी त्‍याची आई त्‍याला प्रेमाने आणि मवाळपणे सांगते. नंतर तिचा आवाज किंचित तीव्र होतो. पुढच्‍या टप्‍प्‍यावर ती मुलाला कठोरपणे सांगते आणि नंतर प्रेमाने समजावूनही सांगते. तुम्‍हीही असेच आहात पू. अण्‍णा ! मी तुमची अशी प्रीती अनुभवली आणि आताही अनुभवत आहे. बहुतेक सर्व साधक असेच अनुभवत आहेत.

५. प्रार्थना आणि कृतज्ञता !

‘पू. अण्‍णा यांच्‍यातील दैवी गुण आमच्‍यात येवोत’, अशी मी सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्‍या दिव्‍य चरणी अनन्‍य भावाने नतमस्‍तक होऊन प्रार्थना करते.

पू. अण्‍णा, तुम्‍ही मला ‘मन आणि बुद्धी यांसह शरीर गुरूंसाठी कसे झिजवायचे ?’, हे शिकवलेत. मी साधनेच्‍या मार्गात अनेक वेळा पडले आणि उठले. तुम्‍ही याचे साक्षीदार होऊन माझे मार्गदर्शक झालात. तुम्‍ही माझ्‍यात आध्‍यात्मिक चेतना भरून त्‍या चेतनेचे चैतन्‍यात रूपांतर करून ‘हा जीव सच्‍चिदानंद परब्रह्माला शरण जाईल’, असे करून उद्धरला आहे. पू. अण्‍णा, मला खरेच शब्‍द सुचत नाहीत.

सतत आनंदात रमणार्‍या पू. रमानंदअण्‍णांच्‍या चरणी कृतज्ञतापूर्वक कोटीशः नमन !

‘पू. अण्‍णा, गुरुदेवांनी निर्माण केलेले संत गुरुच आहेत’, याचा अनुभव पुनःपुन्‍हा येतो. गुरुदेव, तुम्‍ही आम्‍हा सर्वांना अपार प्रीती देऊन जिंकले आणि आम्‍ही तुमच्‍या निरागस प्रीतीपुढे हरलो आहोत.’

– सौ. विदुला हळदीपूर, धारवाड, कर्नाटक.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक