स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘वीर सावरकर – सिक्रेट फाइल्स’ वेब सीरिज येणार !

मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘वीर सावरकर – सिक्रेट फाइल्स’ ही हिंदी वेब सीरिज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त २६ फेब्रुवारी २०२४ या दिवशी प्रदर्शित होणार आहे. या ‘वेब सीरिज’चे पोस्टर आणि टीझर (चित्रपटाचा संक्षिप्त भाग) प्रदर्शित करण्यात आले आहे. मराठी अभिनेते सौरभ गोखले हे या ‘वेब सीरिज’मध्ये वीर सावरकर यांची भूमिका साकारणार आहेत.

या ‘वेब सीरिज’चे लेखन आणि दिग्दर्शन योगेश सोमण करणार असून निर्मिती डॉ. अनिरबन सरकार हे करणार आहेत. ही ‘वेब सीरिज’ ३ भागांमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे. याविषयी माहिती देतांना डॉ. अनिरबन सरकार म्हणाले, ‘‘या ‘वेब सीरिज’च्या माध्यमातून वीर सावरकर यांचे विचार, शौर्य, बलीदान युवकांपुढे आणण्याचा प्रयत्न असेल.’’ या ‘वेब सीरिज’ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका साकारणारे सौरभ गोखले म्हणाले, ‘‘कोणत्याही कलाकाराला ऐतिहासिक भूमिका साकारायला मिळणे, हे त्याचे भाग्य असते. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका करण्याची मला संधी मिळाली आहे. वीर सावरकर यांचे साहित्य वाचून, त्यांच्या जीवनाचा अभ्यास करून चांगल्या पद्धतीने ही भूमिका साकारण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.’’