परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त असलेल्या रथोत्सवाचे भावमय क्षण अनुभवतांना श्री. अविनाश जाधव यांना जाणवलेली सूत्रे

श्री. अविनाश जाधव

१. आई-वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रामनाथी आश्रमात येण्याचे नियोजन अनेक वेळा रहित करावे लागणे

‘माझ्या आई-बाबांची प्रकृती ठीक नसल्याने मागील ७ मासांपासून मला कोरेगाव (जि. सातारा) येथे घरी रहावे लागले. या ७ मासांच्या काळात मी ४ – ५ वेळा रामनाथी आश्रमात येण्याचे नियोजन केले; पण प्रत्येक वेळा मला ते रहित करावे लागले. रामनाथी आश्रमात येण्यासाठी मला पुष्कळ अडचणी येत होत्या.

२. ‘आज रामनाथी आश्रमात जायचेच’, असे ठरवून निघाल्यावर वेळेत बस मिळत जाणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सवाच्या दिवशी आश्रमात पोचल्यामुळे रथोत्सवाचा भावमय आनंद अनुभवता येणे

२१.५.२०२२ या दिवशी मी अकस्मात् ‘आज रामनाथीला जायचेच’, असे ठरवले. घरातील सर्व कामे आटोपून मी रात्री गोव्याला जाण्यासाठी निघालो. गुरुकृपेने मला एकापाठोपाठ बस मिळत गेल्याने माझा कोरेगाव ते सातारा, सातारा ते बेळगाव आणि बेळगाव ते गोवा हा प्रवास निर्विघ्नपणे पार पडला अन् २२.५.२०२२ या गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) जन्मोत्सवाच्या दिवशी मी गोव्याला पोचलो. गुरुदेवांच्या जन्मोत्सवानिमित्त रथोत्सवाचा कार्यक्रम होता. मी त्या दिवशी रामनाथी आश्रमात पोचल्यामुळे मला गुरुदेवांचा रथोत्सव अनुभवण्याचे भाग्य लाभले.

कोरेगाव ते गोवा या प्रवासाच्या दरम्यान मला ‘परात्पर गुरुदेवांच्या चैतन्यानेच येथे खेचून आणले आहे’, अशी आतून सतत जाणीव होत होती. ‘त्यांच्यामुळेच हे भावक्षण अनुभवता आले’, यासाठी मला कृतज्ञता वाटली.

३. ‘त्रिमूर्तींच्या दर्शनाने जीवन कृतार्थ झाले’, असे वाटून भावस्थिती अनुभवणे

रथात गुरुदेवांच्या समवेत श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पाहिल्यावर ‘त्रिदेवांच्या दर्शनाने माझे जीवन कृतार्थ झाले’, असे वाटून मी भावावस्था अनुभवली. गुरुदेवांकडे पहातांना मला भावाश्रूंना आवर घालणे अशक्य झाले. रथोत्सवाचे हे क्षण पहातांना माझे डोळे दीपून गेले.

३ अ. अनुभूती

१. रथोत्सवाच्या वेळी ‘सर्व वातावरण स्थिर झाले असून वातावरणात वेगळाच सुगंध दरवळत आहे’, असे मला जाणवले.

२. रथोत्सवाच्या वेळी सनातनच्या तिन्ही गुरूंच्या दर्शनाने आणि त्यांनी माझ्यावर टाकलेल्या दृष्टीक्षेपामुळे माझ्यावर आलेले त्रासदायक शक्तींचे आवरण काही क्षणांत निघून गेले.

४. लवकरच हिंदु राष्ट्राची पहाट होणार असून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हिंदु राष्ट्र निर्मितीच्या विजयाची माळ श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या गळ्यात घालतील’, असे जाणवणे

‘रथात आरूढ झालेले सनातनचे तिन्ही गुरु या रथोत्सवाच्या माध्यमातून संपूर्ण जग पादाक्रांत करत असून लवकरच आम्हा पामरांना हिंदु राष्ट्राची पहाट पहाण्याची संधी मिळणार आहे’, असा भाव माझ्या मनात निर्माण झाला. ज्याप्रमाणे कृष्णाने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करून महाभारतीय युद्धाच्या विजयाची माळ अर्जुनाच्या गळ्यात घातली; त्याचप्रमाणे हिंदु राष्ट्र निर्मितीच्या या महासंग्रामात परात्पर गुरुदेव हिंदु राष्ट्र निर्मितीच्या विजयाची माळ श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या गळ्यात घालतील’, असे मला जाणवले.

परात्पर गुरुदेवांचे चैतन्य आणि कृपा यांमुळेच मला हे अनमोल भावमय क्षण अनुभवता आले. त्यामुळे माझे मन अत्यंतिक कृतज्ञतेने उचंबळून आले. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. अविनाश जाधव (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.५.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक