कुख्यात अमली पदार्थ तस्कर अली शिराझी याला अटक

अली शिराझी

मुंबई – ऑस्टे्रलिया आणि ब्रिटन या देशांसह भारतामध्येे ‘केटामाइन’ या अमली पदार्थाची विक्री करणारा अली अझगर शिराझी याला २४ मे या दिवशी मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. मुंबईतील किल्ला न्यायालयाने शिराझी याला १ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शिराझी याने ‘एअर कार्गो’मध्ये लपवून विदेशात ८ कोटी रुपयांच्या अमली पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तो दुबईत पळून जाण्याच्या सिद्धतेत होता.

अली अझगर शिराझी याला पहातच क्षणी अटक करण्याची नोटीस मुंबई पोलिसांकडून काढण्यात आली होती. अमली पदार्थांचा आंतरराष्ट्रीय तस्कर कैलास राजपूत याचा शिराझी हा विश्‍वासू साथीदार मानला जातो. कैलास राजपूत याला काही मासांपूर्वी ब्रिटन येथे अटक करण्यात आली असून त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून प्रयत्न चालू आहेत. कैलास राजपूत याच्या अटकेनंतर अली अझगर शिराझी हा त्याचा अमली पदार्थांचा कारभार सांभाळत होता. मुंबईतील अंधेरी येथे गुन्हे अन्वेषण शाखेने १५ मार्च या दिवशी धाड टाकून १५ किलो ७४० ग्रॅम ‘केटामाईन’ हा ८७ लाख रुपये किमतीचा अमली पदार्थ पकडला होता. त्यानंतर शिराझी भूमीगत झाला होता. शिराझी याच्या अटकेमुळे अमली पदार्थांच्या तस्करीचे आणखी काही धागेदारे हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

संपादकीय भूमिका 

अमली पदार्थांचे जाळे नष्ट न करता येणे पोलीस-प्रशासन यांचा लज्जास्पद ! असे पोलीस-प्रशासन समाजहित काय साधणार ?