सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या वेळी नृत्यकलेशी संबंधित साधिकेला नृत्य करतांना आलेल्या अनुभूती

२२.५.२०२२ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव झाला. या जन्मोत्सवाच्या वेळी निघालेल्या दिंडीत विविध नृत्ये सादर करण्यात आली. या नृत्यात नृत्यकलेशी संबंधित साधिका सहभागी होत्या. जन्मोत्सवाच्या वेळी झालेल्या दिंडीत या नृत्याच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

नृत्य साधना

१. दिंडीच्या अगोदर सराव करतांना जाणवलेली सूत्रे

१ अ. नृत्याचा सराव केल्यानंतर काही दिवसांनी गुडघ्यांमध्ये अचानक वेदना होणे, दिंडीत नृत्यासाठी सहभागी होण्याचा निरोप मिळाल्यावर प्रार्थना केल्यावर नृत्य करतांना कोणतीही अडचण न येणे : ‘नृत्याचा सराव आरंभ केल्यानंतर काही दिवसांनी माझ्या गुडघ्यामध्ये अचानक वेदना होऊ लागल्या. तेव्हा चिकित्सालयातून मला ‘काही दिवस नृत्याचा सराव करायला नको’, असे सांगितले गेले. माझ्या मनात दिंडीत सहभागी होण्याची पुष्कळ इच्छा होती. मला दिंडीत नृत्य करण्याचा निरोप आला, त्या वेळी ‘दुखणे नंतर बघता येईल; पण एकदा प्रयत्न करूया’, असा विचार करून मी सरावाला गेले. त्या वेळी देवाची कृपा अनुभवता आली. मी प्रार्थना करून नृत्याचा सराव करण्यास गेल्यावर मला तेथे व्यवस्थित नृत्य करता आले. त्या वेळी माझ्या पायाला काहीच झालेले नाही’, असे मला वाटत होते.

१ आ. आवरणामुळे आरंभी सूत्रे आकलन न होणे आणि सरावाचे घंटे वाढत गेल्यावर आवरण न्यून होऊन उत्साह वाटणे : नृत्य सरावाच्या वेळी आधी माझ्यावर त्रासदायक आवरण असल्याने सूत्रे पटकन आकलन व्हायची नाहीत आणि त्याविषयीचा उत्साहसुद्धा अधिक काळ टिकून रहात नव्हता; परंतु जसजसे सरावाचे घंटे वाढत गेले, तसतसे आवरण न्यून होत गेल्यासारखे वाटून मनाला उत्साह वाटू वाटला.

कु. तीर्था देवघरे

२. प्रत्यक्ष दिंडीच्या सरावाच्या वेळी नृत्य करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

२ अ. प्रत्यक्ष दिंडीच्या सरावाच्या वेळी ऊन्हात विनाचप्पल नृत्य करायचे असणे, दिंडीला आरंभ होण्याच्या वेळी ऊन न्यून होऊन थंडावा जाणवणे : प्रत्यक्ष दिंडीच्या सरावाच्या वेळी आम्हाला सांगितले होते की, ‘आता ऊन असणार आहे; परंतु तुम्हाला देवासमोर चप्पल न घालता नृत्य करायचे आहे.’ आम्हा सर्व साधिकांची मनाची सिद्धता (तयारी) झाली होती. आम्ही सरावाच्या ठिकाणी पोचल्यावर आरंभी प्रचंड ऊन होते; पण दिंडीला आरंभ झाल्यावर एका क्षणात ऊन न्यून होऊन वातावरणात थंडावा निर्माण झाला. जणू देवाने आम्हाला उन्हाचा त्रास होऊ नये; म्हणून आमची काळजी घेतली.

२ आ. ‘अच्युतम केशवम्..’ या गाण्याच्या एका कडव्यात नारायणाला आळवतांना ‘नारायणाने माझ्या गळ्यात हार घालून तो मला सूक्ष्मातून दर्शन देत आहे’, असे  जाणवणे :  या गाण्याचा सराव करतांना मनात आपोआप ‘ॐ नमो नारायण ।’, हा नामजप चालू झाला.

२ इ. पहिल्या नृत्यगटातून दुसर्‍या नृत्याच्या गटात माझे नाव घातल्यावर स्वीकारता न येणे अन् सेवेत भाव ठेवल्यावर ते स्वीकारता येणे, अशा प्रकारे ‘गुरुदेव नृत्य सेवेतून अहंलय, बुद्धीलय आणि मनोलय करवून साधनेत पुढे नेत आहेत’, असे जाणवणे : दिंडीच्या दुसर्‍या दिवशी माझा नृत्याचा गट बदलून मला शेवटच्या गटात घातले. त्या वेळी मला ती परिस्थिती स्वीकारता येत नव्हती. त्यानंतर मी देवाला तो भाग आत्मनिवेदन केला की, ‘देवा, मी कुठे चुकत आहे, मी कुठे प्रयत्न वाढवणे आवश्यक आहे, ते तूच मला सांग.’ त्या वेळी त्यानेच मला आतून उत्तर दिले की, ‘देव तर सगळीकडे आहे. तो तुझे नृत्य बघणार आहे. दिंडीच्या दिवशी बघितले नाही, तरी तो कधीतरी कोणत्यातरी माध्यमातून पहाणार आहे. त्यामुळे ‘असे का केले ?’, असा विचार करण्यापेक्षा ‘तुला नृत्य करण्याची संधी मिळाली’, त्याविषयी कृतज्ञ राहून प्रयत्न कर.’ देवाने असे सुचल्यावर मला ते पटकन स्वीकारता आले आणि त्यातून त्याने माझा मनोलय, बुद्धीलय आणि अहंलय करवून घेतला’, असे लक्षात आले.

३. दिंडीच्या दिवशी, म्हणजे जन्मोत्सवाच्या दिवशी आलेल्या अनुभूती

३ अ. श्रीमन्नारायण जणू सूक्ष्मातून दर्शन देत आहे’, असे जाणवणे : सरावाच्या वेळी आणि प्रत्यक्ष दिंडीच्या दिवशी कधीही डोळे बंद करून मी श्रीमन्नारायणाचे स्मरण करायचे, त्या वेळी ‘मला श्रीमन्नारायण जणू सूक्ष्मातून दर्शन देत आहे’, असे जाणवायचे.

३ आ. सरावाच्या वेळी आणि प्रत्यक्ष दिंडीच्या दिवशी ‘जय जनार्दना…’, या कृष्णाच्या गाण्यामध्ये ‘मीच गोपी आहे आणि माझ्या समवेत कृष्ण असून मी कृष्णाच्या समवेत नृत्य करत आहे’, असे अनुभवले.

३ इ. ‘परिस्थिती स्वीकारून आपण ईश्वरेच्छेने करतो, तेव्हा देव आपल्याला परमानंदाची अनुभूती देतो’, असे शिकायला मिळणे : मी नृत्याच्या शेवटच्या गटात होते; परंतु त्या दिवशी अचानक आम्हाला सांगितले की, ‘आमच्या गटाने पालखी समोर आणि पहिल्या गटाने शेवटी, म्हणजे आम्ही आधी जेथे करणार होतो, तेथेच नृत्य करायचे आहे’, असे सांगितले. आम्हाला देवाने ‘साक्षात् श्रीमन्नारायणासमोर नृत्य करण्याची संधी दिली.’ यातून मला शिकायला मिळाले की, ‘आपण परिस्थिती स्वीकारून ईश्वरेच्छेने करतो, तेव्हा देव आपल्याला परमानंदाची अनुभूती देतो.’

३ ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती सतत कृतज्ञता वाटून भावजागृती होणे : दिंडीला आरंभ झाल्यावर ‘गुरुदेव प्रत्येक साधकावर किती कृपा करतात !’, असा विचार येऊन मनात सतत कृतज्ञता वाटत होती. त्या कृतज्ञतेमध्ये सतत भावजागृतीसुद्धा होत होती.

‘हे श्रीमन्नारायणस्वरूप गुरुमाऊली, तुमच्या अपार कृपेने मला एवढे अनुभवता आले. हे गुरुमाऊली, माझी काही पात्रता नसूनही तुम्ही मला एवढी मोठी संधी दिली, त्याबद्दल तुमच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता. गुरुदेव, तुम्हाला अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न तुम्हीच माझ्याकडून करवून घ्या, अशी तुमच्या श्री चरणी प्रार्थना करते.’

– कु. तीर्था देवघरे (भरतनाट्यम् विशारद) (वय १५ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२५.५.२०२२)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक