परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेल्या सहज संवादातील भावार्थ जाणून त्यांचे देवत्व ओळखणार्‍या आणि त्यांची बंडी शिवण्याची सेवा भावपूर्ण, शरणागतीने अन् नामजपासहित करणार्‍या सौ. पार्वती जनार्दन !

‘मला (सौ. पार्वती जनार्दन यांना) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची बंडी शिवायची सेवा मिळाली होती. बंडी शिवण्याच्या सेवेनिमित्त माझे त्यांच्याशी बोलणे झाले. तेव्हा आमच्यामध्ये झालेल्या संभाषणातील सूत्रे येथे दिली आहेत.   

(भाग १)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी बंडी शिवतांना आलेल्या अनुभूती

१ अ. ‘देव निराकार असल्याने परात्पर गुरु डॉक्टरांचे कपडे शिवतांना त्यांचे माप कळत नाही’, असे वाटणे : १०.६.२०२१ या दिवशी सकाळी मी शिवलेली बंडी परात्पर गुरुदेवांनी घालून बघितली. तेव्हा केवळ बंडीच्या खालची शिलाई सरळ करून घ्यायची होती. त्याचे छायाचित्र काढले. तेव्हा हाताच्या भागात किंवा काखेच्या भागात कुठेही सुरकुत्या नव्हत्या. त्यानंतर मी केवळ बंडीच्या खालची शिलाई नीट करून तेथे इस्त्री केली. बाकी काहीच दुरुस्ती केली नाही. त्या रात्री गुरुदेवांनी पुन्हा बंडी घालून बघितल्यावर हातावर अन् काखेत चुण्या दिसत होत्या. सकाळच्या छायाचित्राशी तुलना केली, तेव्हा हा पालट आपोआप झाल्याचे पाहून मला आश्चर्य वाटले. मी याचे कारण परात्पर गुरु डॉक्टरांना विचारल्यावर ते मला म्हणाले, ‘‘आपण हा प्रश्न महर्षींना विचारूया.’’ त्या वेळी मी त्यांना म्हणाले, ‘‘देव निराकार असतो. त्यामुळे आम्हाला त्याचे माप कळत नाही.’’ तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘हे तू छान सांगितलेस.’’

सौ. पार्वती जनार्दन

१ आ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या शरिरात दिवसभरात अनेक वेळा पालट होतात’, असे लक्षात येणे, ‘या सर्व गोष्टी सूक्ष्मातील आहेत’, असे जाणवून त्यांचे कपडे शिवतांना ते सांगतील, तसे त्यात पालट करणे आणि तसे करतांना पुष्कळ आनंद मिळणे : मी अनेक वेळा वरीलप्रमाणे अनुभव घेतला आहे. मागील ५ वर्षांपासून मी अधूनमधून परात्पर गुरुदेवांची बंडी किंवा सदरा शिवतांना किंवा त्यात सुधारणा करतांना दिवसातून ३ ते ४ वेळा त्यांना ते दाखवून घेत असे. ते त्यात काही पालट करायला सांगायचे. त्याप्रमाणे मी ते सर्व पालट वर्तमानकाळात राहून करायचे; कारण तेव्हाही ‘सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि रात्री त्यांच्या शरिरात पालट होतात’, असे माझ्या लक्षात आले. त्यातून मला त्यांच्यातील देवत्वाची अनुभूती येत होती. हा सर्व सूक्ष्मातील भाग असल्याने मी बुद्धीने अधिक विचार न करता गुरुदेवांनी सांगितले, तसे करायचा प्रयत्न करायचे. त्यातून मला आनंदही मिळायचा.

२. संतांच्या चेहर्‍यावरील सौंदर्य (तेज) बघितल्यावर ‘बाह्य सौंदर्यवर्धनापेक्षा साधना वाढवून मनाची निर्मळता वाढल्यावर चेहर्‍यावरील सौंदर्य आपोआप वाढणार अन् ते शाश्वत रहाणार’, असे विचार मनात येणे

मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर येथील संतांच्या चेहर्‍यावरील सौंदर्य (तेज) बघून ‘आपल्यालाही असेच शाश्वत सौंदर्य हवे’, असे मला वाटत असे. तेव्हा ‘बाह्य सौंदर्यवर्धनापेक्षा साधना वाढवून मनाची निर्मळता वाढली की, चेहर्‍यावरील सौंदर्य आपोआप वाढेल आणि ते शाश्वत असेल’, अशी माझ्या मनाची विचारप्रक्रिया झाली.

३. साधनेने येणारे सौंदर्य हेच खरे आणि शाश्वत सौंदर्य असणे

१०.६.२०२१ या दिवशी मी आणि परात्पर गुरुदेव यांच्यामध्ये पुढील संवाद झाला.

परात्पर गुरु डॉ. आठवले : आता तू सौंदर्यवर्धन (‘मेकअप’) करायला शिकलीस का ?

मी (सौ. पार्वती जनार्दन) : नाही. मला ते काही येत नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले : तू स्वतः ‘मेकअप’ करत नाहीस का ?

मी : नाही; कारण आध्यात्मिक सौंदर्य आपल्या चेहर्‍यावर आले की, ते शाश्वत असणार.

परात्पर गुरु डॉ. आठवले : अरे वा ! किती छान !

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सहज बोलण्यातून जाणवलेला भावार्थ !

परात्पर गुरु डॉ. आठवले : तुला बंडी शिवण्याची सेवा लवकर पूर्ण करून घरी जायचे आहे ना ?

मी : हो. सेवा झाली की, जायचे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : म्हणजे ‘तुला पती हवा कि देव ?’ असे विचारले की, तू ‘पती हवा’, असे म्हणणार ना !

मी : नाही. मला दोन्ही हवे !

परात्पर गुरु डॉ. आठवले : म्हणजे तू पतीमध्ये देव बघतेस का ?

मी : हो; कारण त्यांच्यामुळेच मला तुमच्यापर्यंत (गुरुदेवांपर्यंत) पोचता आले ना !

परात्पर गुरु डॉ. आठवले : तुला पतीकडून साधना कळली का ?

मी : हो. त्यांनीच शिकवली. त्यांनीच मला गुरूंपर्यंत पाठवले.

४ अ. ‘बंडीत सुधारणा कशी करू ?’, या विचारात राहिल्यामुळे ‘परात्पर गुरु डॉक्टर समोर असतांना भावस्थितीत रहाता न येणे’, याची जाणीव त्यांनी या संवादातून करून दिली’, असे जाणवणे : वरील संवाद वाचतांना तो सहज संवाद वाटत असला, तरी त्यातील भावार्थ महत्त्वाचा आहे. त्या वेळी ‘बंडीत कुठे आणि कशी सुधारणा करू ?’ हा विचार माझ्या मनात अधिक असल्याने गुरुदेव माझ्यासमोर असले, तरी मला भावस्थितीत रहाता येत नव्हते. त्यामुळे ‘त्यांनी या संवादातून मला त्यांच्यातील देवत्वाची जाणीव करून दिली’, असे माझ्या लक्षात आले.

४ आ. ‘यजमानांनी साधना शिकवून श्री गुरुचरणांपर्यंत पोचवले आहे; म्हणून त्यांच्यामध्ये देवाला बघून त्यांच्याप्रती सतत कृतज्ञताभावात रहायला हवे’, असे यातून श्री गुरूंना शिकवायचे आहे’, असे लक्षात येणे : ‘कोरोना महामारीच्या काळातही मला सेवेसाठी आश्रमात रहायला मिळाले. त्यासाठी माझे पती घरचे सर्व एकटे सांभाळत होते. त्यांचे मला पूर्ण सहकार्य आहे. त्यामुळेच मी ही सेवा करू शकत आहे’, हे लक्षात घेऊन मी पतीविषयी पुष्कळ कृतज्ञताभाव ठेवून रहाणे देवाला अपेक्षित आहे. पतीमुळे मला साधना करता आली. मला श्री गुरूंची महती कळली आणि आश्रमात राहून गुरुसेवेची संधीही मिळाली. देवच जिवाला श्री गुरूंपर्यंत पोचवत असतो, म्हणजे मला पतीच्या माध्यमातून देवाने (श्रीकृष्णाने) ही वाट दाखवली आहे. त्यामुळे मला ‘पतीमध्ये श्रीकृष्णाला बघून सतत कृतज्ञताभावात रहायला पाहिजे’, याची जाणीव परात्पर गुरुदेवांनी वरील संवादातून करून दिली’, असे मला वाटले.’

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/686110.html

– सौ. पार्वती जनार्दन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक