परशुराम घाटातील महामार्गाची एक दुपदरी मार्गिका ३१ मेपर्यंत चालू होणार !

परशुराम घाट

चिपळूण – परशुराम घाटातील मुंबई-गोवा या महामार्गाची एक दुपदरी मार्गिका ३१ मेपर्यंत चालू केली जाणार आहे. घाटातील दरीच्या बाजूकडील पेढे-परशुराम गावाकडील संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात परशुराम घाटात वाहतूककोंडी होणार नसल्याचे सांगितले जात आहे. मागील २ वर्षे पावसाळ्यात हा घाट वाहतुकीसाठी धोकादायक ठरला होता. अचानक दरडी कोसळल्यामुळे हा मार्ग काही काळ बंद ठेवावा लागला होता.

यावर्षी मात्र हा महामार्ग कायमच चालू रहावा, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उपाययोजना चालू आहेत. त्यासाठीच २५ एप्रिल ते १० मे या कालावधीत या घाटातील वाहतूक दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. आता या घाटाच्या उजव्या बाजूकडील मार्गिकेवरील काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होत आले आहे. राहिलेले काँक्रिटीकरणाचे काम येत्या आठवडाभरात पूर्ण होईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभाग प्राधिकरणाकडून देण्यात आली.