विसरुनी देहभान अवघे लेवू हरिरंग | नारायणरंगी आनंदाचे डोही आनंद तरंग ||
- शंखनाद आणि ‘शांताकारं भुजगशयनं…’ श्लोकाने प्रारंभ !
- वर्ष २०२१ मध्ये सप्तर्षींच्या आज्ञेने झालेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या ध्वनीचित्रफितीचे प्रसारण !
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जीवनावर आधारित लघुपट
- भावफेरीसह मंगल रथोत्सव, अर्थात् गुरुदेवांचा ‘ब्रह्मोत्सव’
- श्रीसत्शक्ति आणि श्रीचित्शक्ति यांच्याकडून पंचफुलांनी श्री गुरुचरणी पुष्पार्चना
- ड्रोनच्या साहाय्याने दिव्य रथावर पुष्पवृष्टी
- मंत्रपठणाच्या घोषामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘उत्तराधिकार पत्र’ प्रदान
- गुरुकार्याची धुरा सांभाळणारे सद्गुरु, संत आणि साधक यांचा परिचय
- ‘अच्युताष्टकम्’ गीतावर दशावताराचे दर्शन घडवणारी नृत्यसेवा
- ‘आत्मारामा आनंदरमणा…’ भजनाचे साधिकांकडून आर्ततेने गायन
- तबल्याच्या साथीने सतारीवर ‘पूर्वी’ रागाचे भावपूर्ण वादन
- सनातनशी अनेक वर्षे जोडलेले उद्योजक आणि संत यांचे भावमय मनोगत
- ब्रह्मोत्सवाला साहाय्य केलेल्या ज्ञात-अज्ञात दात्यांविषयी आभारप्रदर्शन
- साधकांचा निरोप घेऊन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्यस्थळावरून प्रस्थान
- सर्व साधकांसाठी रथाचे जवळून दर्शन
अपूर्व भावाचा अद्वितीय सोहळा !
ब्रह्मोत्सवाच्या आरंभी मैदानाच्या एका बाजूला असलेला पडदा उघडला आणि उपस्थितांचे हात आपोआपच जोडले गेले ! साक्षात् श्रीगुरूंचे सुवर्णमय रंगाच्या दिव्य रथातून कार्यस्थळी आगमन झाले. श्रीविष्णुच्या रूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यासह त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे सर्वांना दर्शन झाले. सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीगुरूंचा हा रथ ओढत असलेल्या साधकांना पाहून अनेक साधकांनी स्वतःही मानसरित्या त्या सेवेत सहभाग घेतला !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले प्रत्येक साधकाकडे पाहून हात जोडून नमस्कार करत होते. साधकही त्यांना पाहून मनोभावे नमन करत होते. या वेळी साधकांना पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या नेत्रांत आलेले भावाश्रु पाहून साधकही भावविभोर झाले. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याही नेत्रांत भावगंगेचे अवतरण झाले होते. तीनही गुरूंना ‘याची देही याची डोळा’ अनुभवणे, हा अपूर्व भावाचा क्षण होता ! ‘जेवढे साधक तेवढे गुरूंविषयीचे भाव’ असा हा सात्त्विक सोहळा झाला. जसजसा दिव्य रथ पुढे मार्गक्रमण करत होता, तसतशी सर्व साधकांची भावावस्था परमावधीला पोचत होती. ‘विष्णुवैभवं विश्वरक्षकं…’, ‘नारायणं भजे नारायणं…’ इत्यादी भजनांमुळे या रथोत्सवाचे रूपांतर एका भक्तीउत्सवात झाले !
दिव्य रथोत्सवामुळे भूलोकी अवतरले भूवैकुंठ !
- दिव्य रथ जेव्हा मैदानात भ्रमण करत होता, तेव्हा श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे भूदेवीचा अवतार श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीदेवीचा अवतार श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत संपूर्ण ब्रह्मांडात विहार करून प्रत्येक लोकातील जिवांचे प्रीतीमय दृष्टीने अवलोकन करत आहेत’, असे जाणवले.
- रथोत्सवात तिन्ही मोक्षगुरूंच्या रूपाने वैकुंठच पृथ्वीवर अवतरला असून कार्यक्रमस्थळ, म्हणजे साक्षात् ‘भूवैकुंठ’ झाल्याचे जाणवले.
- दिव्य रथाच्या पुढे आणि मागे चालणार्या टाळ आणि ध्वज पथकांतील साधक अन् साधिका यांच्या ‘श्रीमन्नारायण नारायण हरि हरि’ आणि ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारि’ या गाण्याच्या धूनवर झालेल्या भावपूर्ण अन् लयबद्ध हालचालींमुळे त्यांच्या हृदयातून तालबद्ध वायुमय आणि नादमय सात्त्विक लहरी सभोवती पसरल्या. साधकांची मने भावलहरींनी पुलकित झाली.
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के)
कृतज्ञता ! कृतज्ञता !! कृतज्ञता !!
श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने झालेला हा दिव्य आणि भव्य ‘ब्रह्मोत्सव’ ‘याची देही, याची डोळा’ पहाण्याचे महत्भाग्य साधकांना लाभले’, यासाठी हे भगवंता, तुझ्या चरणी अनन्य भावे, कृतज्ञता ! कृतज्ञता !! कृतज्ञता !!!
आमच्या अंत:करणातील भक्तीभाव श्री गुरुचरणांवर भावसुमनांजलीच्या रूपाने सदैव अर्पण होऊ दे !
‘महान ब्रह्मांडगुरूंचे अवतारी तत्त्व अन् कृपाशीर्वाद आम्हा साधकांना सतत मिळत राहू दे’, ही आपल्या पावन चरणी शरणागत भावाने प्रार्थना !
|