विमा आस्‍थापनांकडून रिक्‍शाचालकांची लूट !

वार्षिक २ सहस्र ऐवजी ७ सहस्र रुपये आकारण्‍यात येतात !

प्रतीकात्मक छायाचित्र

पुणे – विमा आस्‍थापनांकडून ‘थर्ड पार्टी इन्‍शुरन्‍स’च्‍या नावाने अनेक रिक्‍शाचालकांची लूट केली जात आहे. नियमाप्रमाणे विम्‍यासाठी वार्षिक केवळ २ सहस्र रुपयांची रक्‍कम भरायची असतांना रिक्‍शाचालकांना वार्षिक ७ सहस्र रुपये देणे बंधनकारक केले आहे. ‘आम आदमी पार्टी रिक्‍शा संघटना’ मागील दोन वर्षांपासून याला विरोध करत आहे. विमा हप्‍त्‍याचे सूत्र निश्‍चित करणारी स्‍वतंत्र सरकारी यंत्रणा आहे; मात्र काही लाख रुपयांची हानीभरपाई आणि कोट्यवधी रुपयांचा हप्‍ता अशी तफावत आढळून आल्‍याचे आम आदमी रिक्‍शा संघटनेचे सल्लागार श्रीकांत आचार्य यांनी सांगितले. कोरोना महामारीमुळे रिक्‍शाचालकांची आर्थिक हानी झाली आहे. त्‍यांना आर्थिक साहाय्‍य
करण्‍याऐवजी सरकार त्‍यांच्‍यावर आर्थिक बोजा टाकत आहे. या प्रकाराची नोंद न घेतल्‍यास रिक्‍शाचालक आंदोलन करतील, अशी चेतावणी देणारे निवेदन ‘आम आदमी रिक्‍शा संघटने’ने प्रादेशिक परिवहन विभागाला दिले आहे.