कै. पू. दत्तात्रेय देशपांडेआजोबा यांच्याविषयी श्री. यज्ञेश सावंत यांना जाणवलेली सूत्रे

पू. दत्तात्रेय देशपांडे

१. साधकाला आध्यात्मिक त्रास होत असतांना पू. देशपांडेआजोबा यांनी त्यांच्या पलंगावर विश्रांती घेण्यास सांगितल्यावर साधकाचा त्रास दूर होऊन त्याला उत्साह वाटणे

‘एकदा मी पू. देशपांडेआजोबांची सेवा करण्यास खोलीत जातांना मला पुष्कळ आध्यात्मिक त्रास होत होता. तेव्हा मी त्यांना औषध देऊन खोलीतून निघत असतांना माझा त्रासिक चेहरा पाहून त्यांनी मला विचारले, ‘‘काही त्रास होत आहे का ?’’ तेव्हा मी त्यांना मला होत असलेला त्रास सांगितला. तेव्हा त्यांनी मला त्यांच्या पलंगावर झोपण्यास सांगितले. मला प्रथम त्यांच्या पलंगावर झोपण्यास संकोच वाटत होता; म्हणून मी झोपलो नाही. त्यांनी पुन्हा सांगितल्यावर मी तशी कृती केली. मी त्यांच्या पलंगावर पहुडल्यावर ‘मला झोप कधी लागली ?’, ते कळले नाही. मला जाग आल्यावर मी एकदम ताजातवाना झालो होतो. ‘मला काही वेळापूर्वी त्रास होत होता’, हेसुद्धा मी विसरलो. तेव्हा ‘संतांनी वापरलेल्या वस्तूंमध्ये सात्त्विकता आणि चैतन्य अधिक प्रमाणात असते’, हे माझ्या लक्षात आले आणि त्यांचे सामर्थ्य अनुभवण्यास मिळाले.

श्री. यज्ञेश सावंत

२. पू. देशपांडेआजोबा मितभाषी होते; मात्र त्यांच्यामध्ये साधकाला नेमकेपणाने प्रश्न विचारून त्याचे क्षेमकुशल जाणून घेण्याची हातोटी होती.

३. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील चुका दाखवणे : त्यांना वाचनाची आवड होती. ते दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन बारकाईने करत आणि प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’मधील चुकांना खुणा करून ‘योग्य काय असले पाहिजे ?’, असे विचारत असत.

४. पू. देशपांडेआजोबा यांना पाहिल्यावर स्वामी समर्थांचीच आठवण येणे

त्यांच्याकडे पाहिल्यावर मला स्वामी समर्थांची आठवण यायची. ‘त्यांच्या रूपामध्ये स्वामी समर्थच आहेत कि काय ?’, असा विचार यायचा.

५. पू. दत्तात्रेय देशपांडेआजोबा यांच्या देहत्यागाविषयीची पूर्वसूचना

‘७.५.२०२३ या दिवशी सकाळी मी संकुलातील खोलीतील गच्चीत कपडे वाळत घालत असतांना तेथे एक मोठा कावळा आला. तो पुष्कळ वेळ बसून होता. पूर्वी कधी एवढा मोठा कावळा आला नव्हता. त्याला हुसकावल्यावरही तो उडून पुन्हा तिथेच येऊन बसत होता. तेव्हा मला ‘आमच्या नातेवाइकांपैकी कुणाची बातमी द्यायला आला आहे कि काय ?’, असा विचार आला. आश्रमात गेल्यावर पू. देशपांडेआजोबा यांनी देहत्याग केल्याचे समजले. तेव्हा ‘ही पूर्वसूचना होती’, हे माझ्या लक्षात आले.

(पू. दत्तात्रेय देशपांडे यांनी ७.५.२०२३ या दिवशी देहत्याग केला.)’

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.५.२०२३)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक