पू. दत्तात्रेय देशपांडेआजोबा यांच्या देहत्यागानंतरचा आज तेरावा दिवस आहे. त्या निमित्ताने …
‘७.५.२०२३ या दिवशी देवद, पनवेल येथील सनातन आश्रमातील सनातनचे १६ वे (व्यष्टी) संत पू. दत्तात्रेय देशपांडे (वय ८८ वर्षे) यांनी देहत्याग केला. नोव्हेंबर २०२१ पासून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मी पू. देशपांडेआजोबांच्या सेवेत होतो. त्यांची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. काटकसरीपणा
पू. देशपांडेआजोबांच्या खोलीतील दिवा आणि पंखा अनावश्यक चालू असतील, तर ते मला तात्काळ बंद करायला सांगायचे. ते गुरुधनाचा एक कणसुद्धा वाया जाऊ देत नसत.
२. प्रेमभाव
अक्षय तृतीयेच्या दिवशी पू. आजोबांच्या मुलीने (श्रीमती कल्पना परांजपे, वय ५५ वर्षे) आश्रमात येतांना त्यांच्यासाठी पुरणपोळ्या आणल्या होत्या. त्या आश्रमातून गेल्यावर मी पू. आजोबांना पुरणपोळी खाण्यासाठी देत होतो. तेव्हा त्यांनी मला विचारले, ‘‘तू खाल्लीस का ?’’ मी त्यांना म्हटले, ‘‘तुम्ही खा. मी नंतर खाईन.’’ ते मला पुन्हा म्हणाले, ‘‘नाही. आधी तू खा. मग मी खाईन.’’ मी परत म्हटले, ‘‘मी नंतर खाईन.’’ तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘तू खाल्लीस, तरच मी खाईन.’’ तसेच ते मी जेवण केले असल्याची निश्चिती करून स्वतः जेवत असत. ते त्यांना भेटण्यासाठी येणार्या प्रत्येक साधकाला खाऊ देत असत.
३. कोणतीही परिस्थिती स्वीकारणे
ते प्रत्येक कृती सकारात्मक घेत. कुठलाही प्रसंग आला, तरी ‘हे आपले प्रारब्ध आहे’, असा विचार करून ते परिस्थिती स्वीकारत असत. ते प्रसंगाकडे सकारात्मक दृष्टीने बघत असत.
४. उत्तम स्मरणशक्ती
पू. आजोबांची स्मरणशक्ती शेवटपर्यंत चांगली होती. त्यांना भेटायला येणार्या सर्वांना ते चांगल्या प्रकारे ओळखत होते. लांबून येणार्या साधकांची आणि त्यांच्या परिचयाच्या अन्य साधकांचीही ते विचारपूस करत असत.
५. शांत वृत्ती
ते शांत स्वभावाचे होते. त्यांना त्यांच्या घरचे काही बोलले, तर ते कोणतीही प्रतिक्रिया न देता त्यांचे म्हणणे शांतपणे स्वीकारायचे.
६. मायेपासून अलिप्त
त्यांना कौटुंबिक किंवा कुठलीही मोहमाया नव्हती. ते रुग्णालयात असतांना त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना घरी येऊन रहाण्याची इच्छा व्यक्त केली होती; पण ते त्यांना म्हणाले, ‘‘मी एक आठवड्यापेक्षा अधिक घरी रहाणार नाही. मी आश्रमात जाणार.’’
७. अहंशून्यता
वर्ष २०२२ च्या गुरुपौर्णिमेला पू. देशपांडेआजोबांचा आणि माझा आध्यात्मिक स्तर १ टक्क्याने वाढला. तेव्हा त्यांना पुष्कळ आनंद झाला. ते मला म्हणाले, ‘‘तुझ्यामुळे माझी प्रगती झाली.’’ प्रत्यक्षात तेच मला सेवेची संधी देऊन माझ्याकडून साधना करवून घेत होते.
८. पू. आजोबांच्या सेवा करतांना आलेल्या अनुभूती !
अ. ‘आम्हा दोघांचा जीव एक झाला आहे’, असे मला नेहमी वाटत असे. ‘मी त्यांच्यासाठी आणखी काय सेवा करू शकतो ?’ असे मला वाटत असे.
आ. त्यांच्या सेवेत असतांना मला प्रत्येक कृतीतून चैतन्य मिळते, उदा. त्यांचे मलमूत्र काढतांनाही मला उत्साह आणि आनंद वाटत असे.
९. पू. देशपांडेआजोबांची संपूर्ण त्वचा मऊ, तेजोमय आणि चैतन्यदायी जाणवायची.
१०. पू. आजोबांनी देहत्याग केल्यावरही ‘ते शांत निद्रा घेत आहेत’, असे मला वाटत होते.
पू. देशपांडेआजोबांच्या सेवेत माझ्याकडून कळत-नकळत झालेल्या चुकांविषयी मी पू. देशपांडेआजोबा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची क्षमा मागतो. ‘गुरुमाऊली, ही सेवा तुम्हीच माझ्या माध्यमातून सहजतेने करवून घेऊन मला आनंद आणि चैतन्य दिले. त्याबद्दल मी आपल्या चरणी शरणागतभावाने कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. अविनाश गिरकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |