छत्रपती संभाजीनगरची दंगल
छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात रामनवमीच्या पूर्वसंध्येला २९ मार्च २०२३ या दिवशी रात्री अनुमाने १२ ते पहाटे ३ पर्यंत भीषण दंगल झाली. मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ झाली. या भागात असलेल्या श्रीराम मंदिरावर आक्रमण केले गेले. रामनवमी महोत्सवानिमित्त मंदिराच्या बाहेर उभारलेली कमान दंगलखोरांनी जाळली. धर्मांधांनी पोलिसांच्या १४ आणि अन्य ३ अशा एकूण १७ गाड्या जाळल्या, तुफान दगडफेक करत पेट्रोल बाँब फेकले. यात २० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घायाळ झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनुमाने अडीच कोटी रुपयांच्या मालमत्तेची हानी झाली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये गोळी लागून घायाळ झालेल्या शेख मुनोरुद्दिन शेख मोइनुद्दिन याचा उपचाराच्या वेळी मृत्यू झाला. पोलिसांनी दुसर्या दिवशी ४०० हून अधिक जणांवर गुन्हा नोंदवला, ज्यात मृत शेख मुनोरुद्दिनचे नाव आहे. तत्कालीन शहर पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी घटनेच्या अन्वेषणासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. या अन्वेषण पथकात शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांचा समावेश आहे. एकूण झालेली जाळपोळ बघता दंगलीचे स्वरूप भीषण असेच होते. पोलिसांना त्यांच्या गाड्या सोडून पळून जावे लागले, अनेक पोलीस घायाळ झाले. मंदिरावर आक्रमण झाले; परंतु पोलिसांच्या सजगतेमुळे दंगलखोर मंदिरात जाऊ शकले नाहीत. नाहीतर अनर्थ झाला असता आणि राज्यातच नव्हे, तर देशभरात त्याचे पडसाद उमटले असते. अशा दंगलीचा एकूण आढावा या लेखात घेतला आहे.
१. शहरातील तणावग्रस्त वातावरणाची पार्श्वभूमी
छत्रपती संभाजीनगर शहर तसे विविध चळवळींचे केंद्र आहे. राज्यातील मोठे आणि मराठवाड्याच्या राजधानीचे शहर आहे. शहराला आणि जिल्ह्याला अगोदर धर्मांध, अत्याचारी मोगल शासक औरंगजेबच्या नावावरून ‘औरंगाबाद’ हे नाव होते. ‘औरंगाबाद नाव पालटून छत्रपती संभाजीनगर व्हावे’, ही येथील जनतेची ३५ वर्षे जुनी मागणी होती. नामांतरासाठी जनता, तसेच महानगरपालिका आणि राज्यशासन यांनी अनेक प्रयत्न केले होते. राज्यशासनाने ‘औरंगाबाद’ नाव पालटून ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला. त्याला केंद्रशासनाने सहमती दिली आणि २४ फेब्रुवारी २०२३ या दिवशी राज्यशासनाद्वारे नाव पालटल्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.
या नामांतरानंतर अनेक शासकीय कार्यालयांवरील जुन्या पाट्या पालटण्यास प्रारंभ झाला; मात्र एम्.आय.एम्.चे स्थानिक खासदार इम्तियाज जलील यांनी या नामांतराच्या विरोधात भूमिका घेतली आणि औरंगजेबाच्या मृत्यूदिनी ३ मार्च २०२३ या दिवशी आंदोलन करण्याचे घोषित केले अन् ४ मार्चपासून आंदोलन चालू केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १४ दिवस धरणे आंदोलन केले, तसेच एक दिवस मोर्चा काढला. यामुळे शहरासह जिल्ह्यातील वातावरण बिघडण्यास प्रारंभ झाला. छत्रपती संभाजीनगर नावाच्या समर्थनात असणार्या नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. सोशल मिडियामध्ये (सामाजिक माध्यमांमध्ये) त्याचे पडसाद उमटू लागले होते. १९ मार्च २०२३ या दिवशी छत्रपती संभाजीनगर नामकरणाच्या समर्थनार्थ शहरात सकल हिंदु समाजाच्या वतीने शहरातील अनेक पक्ष, संघटना, मंडळे आणि नागरिक यांनी एकत्र येत मोठ्या संख्येत ‘हिंदु जनगर्जना मोर्चा’ काढला आणि मोर्चाचा समारोप जाहीर सभेत झाला. त्यावरही राजकीय टीकाटिपणी केली गेली.
२. छत्रपती संभाजीनगर नामकरणाच्या विरोधात आणि समर्थनार्थ अर्ज मोहीम
नामांतराच्या शासकीय अधिसूचनेमध्ये ‘नागरिकांनी २७ मार्चपर्यंत नामांतराच्या संदर्भात हरकती आणि सूचना नोंदवाव्या’, असे म्हटले होते. अनेक मुसलमान पक्ष आणि संघटना यांनी हरकती नोंदवण्यास प्रारंभ केला. शेवटच्या दिवसापर्यंत नामांतराच्या समर्थनार्थ ४ लाख ३ सहस्र, तर विरोधात २ लाख ७३ सहस्र अर्ज प्रविष्ट झाले. सोशल मिडियावरही याचे वातावरण होते. अनेक मुसलमान लोक औरंगजेबाचे समर्थन करत होते. ज्या भागात दंगल झाली, तेथे राममंदिराच्या अगदी समोर ‘इब्राहिम पटेल’ या नेत्याच्या कार्यालयावर ‘औरंगाबाद बचाव संघर्ष समिती’चा फलक (बॅनर) लावलेला होता. या सर्व घडामोडींच्या कारणाने शहरातील वातावरण तणावग्रस्त झाले होते.
३. दंगलीचे घटनास्थळ असलेल्या किराडपुरा भागातील श्रीराम मंदिराविषयी माहिती
शहरातील हा किराडपुरा भाग १०० टक्के मुसलमानबहुल परिसर आहे. कधीकाळी या भागात हिंदु बहुसंख्य होते; परंतु हळूहळू मुसलमानांची संख्या वाढत गेली. येथील श्रीराम मंदिर ३५० वर्षे जुने आहे. औरंगजेबाचा सरदार जसवंत सिंग यांनी हे मंदिर बांधले. किराडपुराच्या शेजारी आजही जसवंतपुरा भाग आहे. या ठिकाणी प्रतिवर्षी रामनवमी उत्सव होतो. काही दशकांपूर्वी तेथील हिंदूंनी पुढाकार घेऊन ट्रस्ट स्थापन केला, मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मंदिर मोठे केले. रस्त्याच्या बाजूने गाळे काढून मंदिराला आर्थिक उत्पन्न चालू केले. वर्ष १९८८ मध्ये शहरात भीषण दंगल झाली. या दंगलीनंतर हिंदूंना येथून हुसकावून लावण्यास प्रारंभ झाला. आज परिसरात राममंदिर आहे; पण वस्ती मात्र मुसलमानांची आहे.
४. दंगलीचा घटनाक्रम आणि धर्मांधांनी घातलेला हैदोस
रामनवमीच्या पूर्वसंध्येला २९ मार्च २०२३ या दिवशी शहरातील किराडपुरा भागात असलेल्या राममंदिर परिसरात रात्री दंगल झाली. पोलीस आणि पत्रकार यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या रात्री साधारण १२ वाजण्याच्या सुमारास गाडीचा धक्का लागला; म्हणून दोन गटांत किरकोळ वाद झाला; पण पोलिसांनी तो वाद मिटवला. त्यानंतर रात्री १ वाजता नंतर पुन्हा मोठ्या संख्येने एक टोळके आले आणि त्यांनी पोलीस अन् मंदिर यांवर दगडफेक चालू केली. नंतर जमाव वाढत गेला. पोलिसांच्या काही गाड्या आल्या; परंतु पोलिसांची संख्या अल्पच होती. दगडफेक करणारा जमाव मुसलमान असल्याने पोलिसांनी मौलाना आणि मुसलमान नेते यांना जमावाला शांत करण्यासाठी बोलावले.
एक मौलाना अन्वर अली इशाती यांना तर पोलिसांनी पोलिसांच्या गाडीच्या बोनेटवर उभे केले आणि ते मुसलमान जमावाला शांत रहाण्याचे आवाहन करत होते; परंतु जमाव आक्रमक होता. त्यात मौलानालाही दगड लागल्याने ते घायाळ झाले. या वेळी खासदार इम्तियाज जलील हेही त्या ठिकाणी आले आणि त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला; पण जमाव त्यांच्यावरही धावून गेला. त्यामुळे दगड लागू नये; म्हणून खासदार जलील मंदिराच्या छोट्या प्रवेशदाराने मंदिरात गेले. जलील यांनी मंदिरातून काही व्हिडिओ करत मंदिरात काही झाले नसल्याचे सांगितले; मात्र त्याच वेळी मंदिराबाहेर दगडफेक चालू होती. नंतर साधारण २ वाजता दंगलखोरांनी पोलिसांच्या गाड्या जाळण्यास प्रारंभ केला. तसेच श्रीराम मंदिरासमोर उत्सवानिमित्त उभारलेल्या स्वागत कमानीचे कापड फाडून कमान जाळली. दंगलीचे अनेक व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फूटेजमध्ये लोक जाळपोळ करतांना दिसत आहेत. अनेकांच्या डोक्यांवर धार्मिक टोप्या आहेत; पण अनेकांनी तोंडाला रुमाल लावलेले होते. दंगलखोरांनी मंदिराच्या दिशेने पेट्रोल बाँबसुद्धा फेकले. अनेकांच्या हातात लाठ्या, काठ्या, लोखंडी सळया होत्या आणि त्यांनी त्याद्वारे पोलिसांच्या गाड्या फोडल्या. पोलिसांनी प्रथमदर्शी माहिती अहवालात दिलेल्या माहितीनुसार जमाव घोषणा देत होता, ‘‘इनको निकालो, जलाकर मार डालो, आज किसीको जिंदा नही छोडेंगे । नारे तकबीर अल्ला हू अकबर ।’’
मंदिराच्या आणि मंदिरातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलिसांनी अनेक वेळा हवेत गोळीबार केला अन् याचमुळे दंगलखोर मंदिरात घुसू शकले नाहीत. अनुमाने रात्री ३ वाजण्याच्या सुमारास पोलीस आयुक्त मोठ्या संख्येत फौजफाटा घेऊन आझाद चौकातून आत घुसले. दंगलखोरांनी पथदिवे फोडले असल्याने अंधार होता. पोलिसांवर दगडफेक झाली. पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, बळाचा वापर करत पोलीस साधारण रात्री ३.३० वाजता मंदिरापर्यंत पोचले आणि दंगलीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले. पहाटे दंगल आटोक्यात आल्यानंतर प्रशासनाच्या साहाय्याने पोलिसांनी जळलेली वाहने तेथून उचलली. सकाळी ११.३० वाजता मोठ्या संख्येत आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत श्रीरामाची आरती झाली अन् शहरात रामनवमीच्या मिरवणुका उत्साहात पार पडल्या.
५. पी.एफ्.आय. आणि इतर इस्लामी संघटनांचा संबंध
बंदी घातलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या कट्टरतावादी संघटनेच्या समर्थक तरुणांचा दंगलीमध्ये सहभाग असल्याचा दाट संशय अन्वेषण यंत्रणांना आहे. त्या दृष्टीने पोलीस अन्वेषण करत आहेत. सप्टेंबर २०२२ मध्ये केंद्रशासनाने पी.एफ्.आय.वर बंदी घातली, तेव्हा आतंकवादविरोधी पथकाने चेतावणी दिली होती की, पी.एफ्.आय.चे लोक पुढील काळात पोलिसांना लक्ष्य करतील. प्रत्यक्षातही या दंगलीत पोलिसांवर जोरदार आक्रमण झाले, पोलिसांच्या गाड्या जाळल्या आणि अनेक पोलीस घायाळ झाले. या आक्रमणात ‘सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’(एस्.डी.पी.आय.), ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ आणि अन्य इस्लामी संघटना यांचा सहभाग आहे का ? याचेही अन्वेषण होण्याची आवश्यकता आहे. पोलिसांनी अटकसत्र चालू केल्यानंतर आरोपींना न्यायालयीन साहाय्य करण्यासाठी अनेक मुसलमान संघटना पुढे आलेल्या आहेत.
६. ..तर कट्टरतावाद्यांच्या विरोधात उभे रहावे लागेल !
दंगलच मुळी भयानक असते. दंगलीतील जमाव आक्रमकतेने जाळपोळ, हिंसाचार करत सुटतो. यामध्ये पोलिसांच्या जीवालाही धोका निर्माण होतो. एका किरकोळ घटनेने एवढी मोठी एकतर्फी दंगल होणे, हे अनाकलनीय आहे. दंगलीत पेट्रोल बाँब वापरले गेले. तोंडाला रुमाल बांधलेले आणि जॅकेट घातलेले तरुण सिद्धतेनिशी कसे आले ? पोलिसांच्या गाड्यांखेरीज दंगलखोरांनी एकही स्थानिक गाडी जाळली नाही किंवा परिसरातील एकाही घरावर, दुकानावर दगडफेक का झाली नाही ? पोलिसांच्या मोठ्या गाड्या सामान्य तरुण कसा जाळू शकेल ? हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम मंदिरावर रामनवमीच्या सणाच्या दिवशीच आक्रमण करण्याचे नेमके कारण काय ? देशात अनेक ठिकाणी रामनवमीच्या दिवशीच हिंसक घटना घडल्या आहेत, यात काही दुवा आहे का ? आक्रमणाचा उद्देश नेमका काय होता ? या काही गोष्टी लक्षात घेता दंगल पूर्वनियोजित होती, असे दिसते.
काही कट्टरतावादी गट आणि संघटना यांनी ठरवून श्रीराम मंदिर अन् सुरक्षायंत्रणा यांना लक्ष्य केले का ? याचे सखोल अन्वेषण होणे आवश्यक आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी ‘छत्रपती संभाजीनगर नामांतरविरोधी आंदोलन’ करून शहराचे वातावरण बिघडवले, मुसलमानांमध्ये असंतोष निर्माण केला आणि इस्लामी कट्टरतावादी संघटनांनी याचाच अपलाभ घेतला असावा. सरकारने या घटनेची गंभीर नोंद घ्यावी. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पोलिसांनी अतिशय सखोल अन्वेषण करून दंगलखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन् वचक बसवावा. दंग्यांमध्ये झालेली हानी गुन्हेगारांकडून वसूल करावी. या अशा भीषण घटनांमधून समाजाने योग्य धडा घ्यावा, जागरूक रहावे आणि स्वतःचे मजबूत संघटन निर्माण करावे. भविष्यात भीषण परिस्थितीत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि राज्यघटनेच्या रक्षणासाठी कट्टरतावाद्यांच्या विरोधात उभे रहावे लागेल.
– श्री. सागर शिंदे (साभार : साप्ताहिक ‘विवेक’, ७.४.२०२३)
संपादकीय भुमीकासुनियोजित पद्धतीने धर्मांधांकडून दंगल घडवली जाते; पण पोलिसांना त्याचा सुगावा न लागणे, हे त्यांना लज्जास्पद ! |