नवी मुंबईत नैसर्गिक नालेस्‍वच्‍छतेच्‍या कामांना गती !

प्रतिकात्मक चित्र

नवी मुंबई, १७ मे (वार्ता.) – पावसाळापूर्व शहरातील नैसर्गिक नालेस्‍वच्‍छतेच्‍या कामांना गती आली आहे, अशी माहिती घनकचरा व्‍यवस्‍थापन विभागाचे उपायुक्‍त बाबासाहेब राजळे यांनी दिली. अनुमाने २ कोटी रुपये खर्चाची ही कामे आहेत.

शहराच्‍या पूर्वेला महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळ वसलेले आहे. या नाल्‍यांमध्‍ये कारखान्‍यांतून निघणारे आणि प्रक्रिया केलेले पाणी सोडले जाते. काही झोपड्यांतील सांडपाणी, कचरा, नाल्‍यालगतच्‍या झाडांच्‍या फांद्या पडणे, झाडे उन्‍मळून पडणे, डोंगरावरील माती नाल्‍यात येणे असे प्रकार चालू असतात. हे अडथळे दूर केले नाहीत, तर ठिकठिकाणी पाणी तुंबण्‍याची समस्‍या निर्माण होऊ शकते. त्‍यामुळे प्रतिवर्षी हे अडथळे दूर करून काही प्रमाणात गाळ आणि माती काढण्‍याचे काम घनकचरा विभागाच्‍या माध्‍यमातून ठेकेदारांद्वारे केले जाते. या कामात हलगर्जीपणा करणार्‍यांवर कडक कारवाई करण्‍यात येणार आहे, अशी माहिती बाबासाहेब राजळे यांनी दिली.

  • २ कोटी रुपये खर्च
  • कामात हलगर्जीपणा केल्‍यास कारवाई