अत्‍यंत सहनशील, मायेपासून अलिप्‍त आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती अपार भाव असणारे सनातनचे १६ वे (व्‍यष्‍टी) संत कै. (पू.) दत्तात्रेय देशपांडे (वय ८८ वर्षे) !

पू. दत्तात्रेय देशपांडेआजोबा यांच्‍या देहत्‍यागानंतरचा आज बारावा दिवस आहे. त्‍या निमित्ताने …

‘देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमातील सनातनचे १६ वे (व्‍यष्‍टी) संत पू. दत्तात्रेय देशपांडे (वय ८८ वर्षे) यांनी ७.५.२०२३ या दिवशी देहत्‍याग केला. पू. देशपांडेआजोबा यांच्‍या देहत्‍यागानंतर १८.५.२०२३ या दिवशी १२ वा दिवस आहे. त्‍या निमित्त सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांना पू. आजोबांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

पू. दत्तात्रेय देशपांडे

१. कै. (पू.) दत्तात्रेय देशपांडे (वय ८८ वर्षे) यांची सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये

सद्गुरु राजेंद्र शिंदे

१ अ. परिस्‍थिती स्‍वीकारणे : वर्ष २०१३ मध्‍ये पू. आजोबा देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात रहायला आले. तेव्‍हा त्‍यांची प्रकृती अत्‍यंत नाजूक होती. त्‍यांना पोटाचे विकार अधिक होते. त्‍यामुळे त्‍यांच्‍या खाण्‍यापिण्‍यावर पुष्‍कळ बंधने होती. आश्रमात आल्‍यावर वृद्धावस्‍थेतही त्‍यांनी आश्रमातील वातावरणाशी जुळवून घेतले आणि कार्यपद्धती शिकून त्‍याप्रमाणे आचरण करण्‍याचा प्रयत्न केला.

१ आ. शांत स्‍वभाव : पू. आजोबांचा मूलतःच स्‍वभाव शांत होता. ते मितभाषी होते. ते कुणाशी अनावश्‍यक बोलायचे नाहीत. आपल्‍या प्रकृतीतील चढउताराविषयीही ते अन्‍य कुणाशी विशेष बोलत नसत.

१ इ. सहनशील : सर्वसाधारणपणे या वयात प्रकृतीच्‍या समस्‍या पुष्‍कळ असतात आणि अशा व्‍यक्‍ती त्‍या इतरांना सांगून सहानुभूती मिळवण्‍याचा प्रयत्न करत असतात; परंतु पू. आजोबांविषयी असे काहीही होत नव्‍हते.

१ ई. संस्‍कृत अभ्‍यासक : पू. आजोबा यांना संस्‍कृत चांगल्‍या प्रकारे येत होते. त्‍यांना संस्‍कृतमधील विविध श्‍लोक अर्थासह आणि योग्‍य उच्‍चारासह पाठ होते. योग्‍य वेळी योग्‍य त्‍या संस्‍कृत श्‍लोकांचा ते संदर्भ देत असत.

१ उ. दैनिक ‘सनातन प्रभात’चे सखोल वाचन करणे : पू. आजोबा दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रतिदिन सखोल वाचन करायचे. पहिल्‍या पानापासून अखेरच्‍या पानापर्यंत सर्व बातम्‍या आणि लेख यांचे ते अभ्‍यासपूर्ण वाचन करायचे. त्‍यांची मातृभाषा कन्‍नड असल्‍यामुळे त्‍यांची मराठी वाचनाची गती अल्‍प होती, तरीही ते अत्‍यंत आवडीने दैनिक ‘सनातन प्रभात’चे दिवसभर वाचन करायचे. वाचन करतांना त्‍यांना एखादा शब्‍द कळला नाही, एखाद्या वाक्‍याचा अर्थ कळला नाही किंवा काही सूत्रांच्‍या संदर्भात त्‍यांना जाणून घ्‍यायचे असल्‍यास, ते त्‍याचे पूर्ण शंकानिरसन होईपर्यंत जिज्ञासू वृत्तीने जाणून घ्‍यायचे. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’चे सखोल वाचन करणे’, ही एक प्रकारे त्‍यांची साधनाच होती’, असे मला वाटते.

१ ऊ. चुकांचे निरीक्षण करून स्‍वतःला पालटण्‍याची तीव्र तळमळ : अलीकडे वय आणि प्रकृती यांमुळे त्‍यांना स्‍वभावदोष अन् अहं निर्मूलन सारणी लिखाण करणे जमत नव्‍हते; परंतु २ वर्षांपूर्वीपर्यंत ते स्‍वभावदोष आणि अहं त्‍यांच्‍याविषयी घडलेले प्रसंग ते वहीमध्‍ये लिहून ठेवायचे. पू. आजोबा प्रतिदिन मनातील विचार अथवा स्‍थुलातील घडलेले प्रसंग यांचे निरीक्षण करून ते वहीत लिहून ठेवत आणि त्‍या संदर्भातील स्‍वभावदोष घालवण्‍याचा प्रयत्न करत असत.

१ ए. समष्‍टी सेवा : मागील काही वर्षे पू. आजोबांनी समष्‍टीसाठी नामजप आणि मंत्रजप करणे इत्‍यादी सेवा केल्‍या.

१ ऐ. मायेपासून अलिप्‍त : पू. आजोबांना पत्नी, मुली, नातवंडे असा परिवार आहे; परंतु ते त्‍या कुणामध्‍येच अडकलेले नव्‍हते. घरच्‍यांकडून त्‍यांना काही अपेक्षाही नव्‍हत्‍या. आवश्‍यक असेल, तरच ते स्‍वतः भ्रमणभाष करून संपर्क करायचे, अन्‍यथा त्‍यांच्‍या बोलण्‍यात अन्‍य वेळीही कधी घरच्‍यांविषयी उल्लेख नसायचा. ‘मागील १० वर्षांत ते कोणताही सण, उत्‍सव किंवा सहजही स्‍वतःच्‍या किंवा नातेवाइकांच्‍या घरी गेले आहेत’, असे झाले नाही. मध्‍यंतरी नातेवाइकांच्‍या आग्रहाखातर ते त्‍यांच्‍याकडे २ – ४ दिवसांसाठी जाऊन आले होते. ‘खर्‍या अर्थाने आश्रमात आल्‍यावर त्‍यांनी मायेचा त्‍याग केला’, असेे लक्षात येते.

१ ओ. विरक्‍ती : त्‍यांचे जीवन एखाद्या विरक्‍ताप्रमाणे होते. त्‍यांना कसलीच आवड-नावड नव्‍हती. आश्रमात कधी कार्यक्रम किंवा सण, उत्‍सव असल्‍यास त्‍यांच्‍याकडे असलेले एकच धोतर ते प्रत्‍येक वेळी नेसायचे. तसेच कपड्यांचेही त्‍यांच्‍याकडे अल्‍पच जोड होते. ‘एखादा सदरा किंवा धोतर घेता का ?’, असे त्‍यांना विचारल्‍यावर ते म्‍हणायचे, ‘‘आवश्‍यकता नाही.’’

१ औ. मृत्‍यूची भीती नसणे : ‘तुम्‍हाला मृत्‍यूची भीती वाटते का ?’, असे विचारल्‍यावर पू. आजोबा म्‍हणाले, ‘‘अजिबात नाही. मृत्‍यूला का घाबरायचे ?’’

२. सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे आणि पू. (सौ.) अश्‍विनी पवार पू. देशपांडेआजोबांना त्‍यांच्‍या आश्रमातील निवासाच्‍या खोलीत भेटायला गेल्‍यावर तेथे जाणवलेली सूत्रे

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

१४.११.२०२२ या दिवशी मी आणि पू. (सौ.) अश्‍विनी पवार पू. आजोबांना भेटायला गेलो होतो. त्‍या वेळी आमच्‍यामध्‍ये पुढील संभाषण झाले.

२ अ. हिंदु राष्‍ट्रासाठी प्रसार करण्‍याची इच्‍छा असणारे पू. देशपांडेआजोबा !

पू. देशपांडेआजोबा : लवकर हिंदु राष्‍ट्र यायला पाहिजे. त्‍यासाठी मला ‘प्रसारसेवा करावी, लोकांना याविषयी सांगत रहावे’, असे वाटते.

पू. (सौ.) अश्‍विनीताई : आपले एवढे वय आणि आपल्‍याला असलेले आजारपण पहाता तुमचे हे विचार आदर्श आहेत. तुम्‍ही प्रचार करू शकत नाही, तर समष्‍टीसाठी अधिकाधिक नामजप करू शकता.

पू. देशपांडेआजोबा : हो.

२ आ. सतत इतरांचा विचार करणारे पू. देशपांडेआजोबा ! : ‘त्‍यांच्‍या साहाय्‍यासाठी दिलेल्‍या साधकाला त्‍यांच्‍याकडून अधिक त्रास होऊ नये’, असे त्‍यांना वाटायचे. खरे तर त्‍यांना पुष्‍कळ अशक्‍तपणा असायचा. त्‍यांना पलंगावरून स्‍वतःहून खाली उतरता येत नव्‍हते. तसेच आसंदीवर बसल्‍यावर पुन्‍हा उठताही येत नव्‍हते. ‘अशा स्‍थितीतही त्‍यांना ‘आपण स्‍वावलंबी असावे’, असे वाटत होते. त्‍या वेळी ‘त्‍यांच्‍यात इतरांचा विचार करणे, हा गुण अधिक प्रमाणात आहे’, हे माझ्‍या लक्षात आले.

२ इ. ‘रुग्‍णाईत स्‍थितीतही साधना वाढायला पाहिजे’, अशी तळमळ असणारे पू. देशपांडेआजोबा ! : भेटीच्‍या वेळी आम्‍हाला त्‍यांचा चेहरा आनंदी आणि निरागस बालकासारखा दिसत होता. ‘त्‍यांच्‍याकडे पहात रहावे’, असे वाटत होते. तेव्‍हा त्‍यांना ‘‘तुमचा चेहरा पुष्‍कळ निरागस दिसत आहे’’, असे सांगितल्‍यावर ते म्‍हणाले, ‘‘अजून निरागस व्‍हायला पाहिजे.’’ यावरून अशा रुग्‍णाईत स्‍थितीतही ‘साधना वाढायला पाहिजे’, अशी त्‍यांची तळमळ दिसून आली.

२ ई. कठीण प्रसंगातही सहनशील राहून देवाप्रती कृतज्ञ रहाणारे पू. देशपांडेआजोबा ! : एक दिवस ते काहीतरी घेण्‍यासाठी पलंगावरून खाली उतरत असतांना त्‍यांना तोल सांभाळता न आल्‍यामुळे ते पडले. तेव्‍हा त्‍यांच्‍या डोक्‍याला जोरात लागले. त्‍या स्‍थितीतून त्‍यांना उठताही येत नव्‍हते. ते शांतपणे साधक येण्‍याची वाट पहात राहिले. २० – २५ मिनिटांनी त्‍यांच्‍या खोलीत आलेल्‍या साधकाने त्‍यांना उठवले. त्‍यांच्‍या डोक्‍यावर त्‍यांनी थंडीत घालायची कानटोपी दुहेरी घातली असल्‍याने डोके आपटूनही त्‍यांना विशेष लागले नाही. हा प्रसंग सांगतांना ते ‘देवाने माझी किती काळजी घेतली’, असे सकारात्‍मक राहून सांगत होते.

३. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती भाव

अ. पू. आजोबांशी बोलतांना सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा उल्लेख आल्‍यास त्‍यांच्‍याप्रती बोलतांना आजोबांच्‍या डोळ्‍यांतून भावाश्रू येत असत.

आ. ‘अलीकडच्‍या काळात त्‍यांच्‍यातील कृतज्ञताभावातही पुष्‍कळ वाढ झाली आहे’, असे लक्षात येत होते.

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेमुळे ‘व्‍यक्‍ती तितक्‍या प्रकृती तितके साधनामार्ग’ या साधनेच्‍या सिद्धांतानुसार विविध मार्गांनी साधना करणार्‍या संतांचा सत्‍संग आम्‍हाला लाभत आहे आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले त्‍या त्‍या प्रकृतीनुसार प्रत्‍येकाला संतपदाकडून पुढे पुढे मोक्षापर्यंत नेत आहेत’, हे शिकायला मिळत आहे. याबद्दल त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– (सद़्‍गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.५.२०२३)