गोवा ते उत्तराखंड थेट विमानसेवा चालू होणार

पणजी – गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे हे २३ मे या दिवशी विमानप्रवास करून गोवा ते उत्तराखंड पहिल्या थेट उड्डाणसेवेचा शुभारंभ करणार आहेत. या विमानसेवेचा लाभ दोन्ही राज्यांतील पर्यटन उद्योगांना होणार आहे. ही उड्डाणे प्रत्येक मंगळवार, गुरुवार आणि शनिवार गोव्यातून दुपारी ३.१५ वाजता, तर उत्तराखंडहून सायंकाळी ६.३० या वेळेत असतील. नवीन थेट उड्डाण मार्ग पर्यटकांना गोवा आणि उत्तराखंड या राज्यांत प्रवास करण्यासाठी आणि दोन्ही राज्यांमधील अद्वितीय सांस्कृतिक आणि नैसर्गिक आकर्षणे पहाण्यासाठी एक सोपा आणि सोयीस्कर मार्ग प्राप्त झाला आहे.

पर्यटनमंत्री खंवटे म्हणाले, ‘‘गोवा आणि उत्तराखंड यांमध्ये थेट उड्डाण चालू झाल्याबद्दल मला आनंद होत आहे. ज्यामुळे दक्षिण काशीच्या दृष्टीकोनातून गोव्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळण्यास साहाय्य होईल. गोव्यात अनेक पुरातन मंदिरे आहेत. पर्यटकांना आता या थेट उड्डाणांमधून सहज प्रवास करता येणार आहे. त्याचप्रमाणे उत्तराखंडला भेट देणार्‍या गोव्यातील पर्यटकांना राज्याच्या भव्य निसर्ग सौंदर्याचाही लाभ होणार आहे. या नव्या थेट उड्डाणाच्या शुभारंभामुळे दोन्ही राज्यांमधील संपर्क वाढेल, ज्यामुळे पर्यटकांना संधी मिळेल.’’

गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मोपा) आणि उत्तराखंडमधील जॉली ग्रँट विमानतळ (डेहराडून) या ठिकाणी नवीन थेट विमानोड्डाण ‘इंडिगो एअरलाइन्स’द्वारे चालवले जाईल. यामुळे प्रवाशांना आरामदायी आणि त्रासमुक्त अनुभव मिळेल.