गोवा : पोलीस उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांना न्यायालयाकडून १० सहस्र रुपयांचा दंड

ध्वनीप्रदूषणाची तक्रार करणार्‍यालाच पोलीस कोठडीत टाकून मारहाण केल्याचे प्रकरण

पणजी, १२ मे (वार्ता.) – हणजूण पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक तथा विद्यमान पोलीस उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांनी तक्रारदाराशी गैरवर्तवणूक केल्याच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने त्यांना १० सहस्र रुपये दंड ठोठावला आहे. मानवी हक्क आयोगाच्या चौकशी अहवालाला आव्हान दिलेला अर्ज फेटाळतांना खंडपिठाने हा आदेश दिला आहे.

वर्ष २०१३ मध्ये हणजूण येथे एका नागरिकाने रात्रीच्या वेळी संगीत रजनी कार्यक्रमांचा त्रास होत असल्याची तक्रार दूरध्वनीवरून हणजूण पोलिसांना दिली होती. या तक्रारीची नोंद न घेताच उलट तक्रारदाराला दुसर्‍या दिवशी पोलीस ठाण्यात बोलावून त्याला अनधिकृतपणे कह्यात घेऊन कोठडीत टाकण्यात आले आणि त्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती. आयोगाने तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्वेश कर्पे यांना दोषी ठरवून त्यांना तक्रारदाराला भरपाई देण्याचा आदेश दिला होता. आयोगाच्या या आदेशाला पोलीस उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने पोलीस उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांचा आव्हान अर्ज फेटाळून लावतांना आदेशात गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत.

संपादकीय भूमिका

अशा अन्यायकारक वर्तणुकीसाठी कठोर शिक्षा झाल्यासच असे प्रकार थांबतील. पोलीस अधीक्षक पदावरील व्यक्ती जर तक्रारदाराला अशी वागणूक देत असेल, तर त्याखालील अधिकारी आणखी कसला आदर्श घेणार ?