बंदीवानांना धर्मशिक्षण द्या !

धर्मशिक्षण

निरनिराळ्या गुन्ह्यातील बंदीवानांमध्ये सुधारणा घडवून त्यांना उत्तम नागरिक म्हणून समाजात पुन्हा पाठवण्यासाठी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाने बंदीवानांना उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. शैक्षणिक वर्ष २०२२ मध्ये ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, देहली’ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत कारागृहातील काही बंदीवान ‘बी.ए.’ (कला शाखेचा पदवीधर), ‘एम्.ए.’ (कला शाखेचा पदव्युत्तर), ‘एम्.बी.ए.’ (मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेटर) ची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. या अभ्यासक्रमांसाठी बंदीवानांना विनामूल्य प्रवेश दिला जातो. कारागृह प्रशासनाचा हा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे. येथे बंदीवानांना शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहेच, तसेच त्यांच्यातील गुन्हेगारी वृत्ती नष्ट होण्यासाठीही प्रयत्न व्हायला हवेत.

एकूणच गुन्हेगारांचा विचार केल्यास गुन्हे करणारे अशिक्षित आहेत, असे नाही. उच्च पदावर कार्यरत असलेले अनेक अधिकारीही कमकुवत क्षणी गुन्हा करतात. प्रसंगावधान बाळगून योग्य-अयोग्य विचार न झाल्यानेही गुन्हा घडतो. कधी कधी एखाद्या परिस्थितीवर मात करता न आल्यामुळे त्यावरील मार्ग म्हणून गुन्हेगारी वृत्ती स्वीकारली जाते. प्रसंगानुरूप ‘मी’, ‘माझे’ असा आत्मकेंद्रीत विचार होऊन मनुष्य गुन्हा करायला सरसावतो. त्यामुळे हे सर्व पाहिल्यास गुन्हेगारांमधील गुन्हेगारी वृत्ती नष्ट करण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देऊन साधना करायला शिकवायला हवे. एकूणच काय, तर ती व्यक्ती स्वतःच्या मनावरील नियंत्रण पूर्णपणे घालवून बसलेली असते. त्यामुळेच गंभीर गुन्हे घडतात आणि नंतर पश्चात्तापाची वेळ येते.

पूर्वीपेक्षा सद्यःस्थितीत सुशिक्षितांची संख्या वाढलेली आहे; पण त्यासह गुन्हेगारांची संख्याही वाढलेली आहे. मनुष्याची गुन्हेगारी वृत्ती नष्ट करण्यासाठी जनतेसहित बंदीवानांनाही धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. धर्मशिक्षणाने योग्य-अयोग्य यांची जाण येते. तसेच प्राप्त परिस्थितीत योग्य निर्णय घेता येतो. त्यामुळे बंदीवानांना सुशिक्षित करण्यासह त्यांना धर्मशिक्षण देऊन त्यांच्याकडून साधना करवून घेणेही अनिवार्य आहे !

– श्रीमती धनश्री देशपांडे, रामनाथी, गोवा.