सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
‘गुरुदेवा (परात्पर गुरु डॉ. आठवले), आपण सांगितलेली आपत्काळाची तीव्रता लक्षात घेऊन २०.१.२०२१ या दिवशी आम्ही सांगलीला असलेले आमचे दुकान (कोल्ड्रिंगचे) विकून गोव्याला आपल्या चरणांशी स्थायिक झालो. आम्हाला देवा, तुमच्या कृपेमुळे इथे रहायला घरही मिळाले. आम्हा दोघांची (श्री. मनोज आणि सौ. मधुरा सहस्रबुद्धे) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात प्रतिदिन जाऊन सेवाही चालू झाली. आम्ही येथे आल्यापासून ‘तुम्ही आमचा सर्वार्थाने भार वाहिला आहे’, या गोष्टीची आम्ही क्षणोक्षणी अनुभूती घेत आहोत.
गुरुराया, एक दिवस दुपारी विश्रांती घेत असतांना भ्रमणभाषवर ‘जाऊ देवाचिया गावा । घेऊ तेथेचि विसावा ।।’, हा अभंग मी ऐकत असतांना माझी एकदम भावजागृती झाली. मला असे वाटले, ‘आम्हीसुद्धा गुरुदेवांच्या गावाला आलो आहोत आणि तेच आमची सर्वस्वी काळजी वहात आहेत’, याची आठवण होऊन डोळ्यांत भावाश्रू आले. मी तोच अभंग पुढीलप्रमाणे म्हणायला प्रारंभ केला. तो अभंग पुढे दिला आहे.
‘आलो गुरुदेवांच्या (टीप १) गावा (टीप २) ।
घेऊ येथेच विसावा ।
येथेच विसावा,
घेऊ येथेच विसावा ।। धृ. ।।
सांगू गुरुदेवांना सुख-दुःख ।
गुरुदेव निवारतील भूक ।
निवारतील भूक,
गुरुदेव निवारतील भूक ।। १ ।।
घालू गुरुदेवांसीच भार ।
गुरुदेव सुखाचा सागर ।
सुखाचा सागर, गुरुदेव सुखाचा सागर ।। २ ।।
चरणी राहू दे गुरुदेवा ।
आता जडोनी चरणांशी गुरुदेवा ।
चरणांशी गुरुदेवा, चरणांशी गुरुदेवा ।। ३ ।।
गुरुदेवा, आम्ही बाळे ।
या गुरुदेवांची लडिवाळे ।
या गुरुदेवांची लडिवाळे,
या गुरुदेवांची लडिवाळे ।। ४ ।।
टीप १ – परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले
टीप २ – सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
‘गुरुदेवा, तुमच्याच कृपेमुळे मला या ओळी सुचल्या आणि तुम्ही लिहूनही घेतल्या, त्याबद्दल कृतज्ञ आहे. ‘गुरुदेवा, माझ्याकडून तुम्हाला अपेक्षित अशी व्यष्टी आणि समष्टी साधना घडू दे’, अशी आपल्या चरणी मनोभावे प्रार्थना आहे.’
– सौ. मधुरा सहस्रबुद्धे, फोंडा, गोवा.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |