अतिक अहमदचा खून, हत्या कि वध ?

‘संपत्तीच्या कारणासाठी, भूमी आणि स्त्री यांच्या वादावरून, दारूच्या नशेच्या आहारी जाऊन जेव्हा हत्या होते, तेव्हा त्याला ‘खून’ म्हणतात. समाजामध्ये अशा प्रकारच्या घटना घडून खूनाचे प्रकार वारंवार घडत असतात. काही खुनांच्या बातम्या होतात, तर काहींच्या होत नाहीत. आरोपी पकडले जातात. वर्षानुवर्षे त्यांचे खटले चालतात. काही जण सुटतात, काहींना दीर्घ कालावधीच्या शिक्षा होतात आणि काही फासावर लटकतात.

माणूस मारण्याच्या दुसर्‍या प्रकाराला शब्द आहे ‘हत्या.’ हत्येच्या घटनाही घडत रहातात. एखादा आमदार, खासदार, उद्योगपती, धर्माचार्य वा साधू, नामवंत राजकीय नेता यांना जेव्हा मारले जाते, तेव्हा त्याला नुसता खून न म्हणता ‘हत्या’ म्हणतात. अशा हत्याही समाजात वेगवेगळ्या कारणांसाठी घडत असतात. मारेकरी नंतर पकडले जातात. कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना शिक्षा दिली जाते.

तिसरा प्रकार वधाचा आहे. त्यातही माणसे मरतात. वधाला कुणी ‘खून’ किंवा ‘हत्या’ म्हणत नाहीत. ज्याचा वध झाला, तो भयानक दुष्ट असतो. त्याने अनेक दुष्कर्मे केलेली असतात. ‘तो कधी मरेल ?’, याची लोक वाट पहात असतात. तो अधर्मी आणि वृत्तीने दुष्ट असतो. निरपराध माणसे मारण्यात त्याला आनंद होतो. तो शक्तीमान असतो; म्हणून त्याला कुणी हात लावू शकत नाही; पण तोही धर्मशक्तीकडून मारला जातो. हे काम कधी प्रभु श्रीराम, कधी श्रीकृष्ण, कधी चंद्रगुप्त मौर्य, तर कधी छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले आहे. या वधाच्या स्मृती समाज जागृत ठेवतो.

उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड, अनेक खून केलेला, लोकांच्या भूमी हडप केलेला अतिक अहमद, त्याचा भाऊ अशरफ अहमद आणि अतिकचा मुलगा असद यांना गेल्या मासात ठार मारले. ‘हे खून, हत्या कि वध आहेत ?’, हे वाचकांनी आपल्या बुद्धीने ठरवावे.

१. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘माफियाराज’ संपवण्यासाठी केलेले प्रयत्न !

श्री. रमेश पतंगे

‘कुटुंब रंगलंय काव्यात’, हा एक लोकप्रिय कार्यक्रम विसुभाऊ बापट गेली कित्येक वर्षे महाराष्ट्रात करतात. या कार्यक्रमात रसिकांना पुष्कळ आनंद मिळतो. अतिक अहमद याने चालवलेला ‘कुटुंब रंगले रक्तपातात’, हा कार्यक्रम मात्र रंजक नाही, भयानक आहे, अंगावर काटे आणणारा आहे. त्याची बायको शाहिस्ता परवीन आणि बहीण फरार आहे, तर २ मुले कारागृहात आहेत. यासह २ अल्पवयीन मुले पोलिसांच्या कह्यात आहेत. उत्तरप्रदेशात असे हे ‘कुटुंब रंगलंय रक्तपातात’, हा आपला कार्यक्रम राजकीय आश्रयाने करत राहिले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे शासन आले आणि त्यांनी ठरवले की, राज्यातील ‘माफियाराज’ संपवायचे. वर्ष २०१७ पासून पोलीस चकमकीमध्ये १८० हून अधिक कुख्यात गुंड ठार झाले. समाजवादी पक्षाचे राज्य, म्हणजे गुंडाराज होते. आता सज्जन शक्तीचे राज्य आहे.

२. अतिक अहमदच्या हत्येनंतर एम्.आय.एम्.चे असदुद्दीन ओवैसी यांनी केलेली गरळओक !

अतिक अहमद, त्याचा भाऊ आणि त्याचा मुलगा ठार झाले. अश्रू मात्र एम्.आय.एम्.चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या डोळ्यांत आले. ते म्हणाले, ‘‘मारेकर्‍यांची दृष्टी आणि हात स्थिर होते. हे सर्व पहाता ते ‘प्रोफेशनल किलर्स’ (व्यावसायिक मारेकरी – पैसे घेऊन हत्या करणारे) होते आणि हा एक ‘कोल्ड मर्डर’ (थंड डोक्याने केलेली हत्या) आहे. मलाही बंदूक चालवता येते. स्वसंरक्षणासाठी मीसुद्धा एका तज्ञाकडून बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. ‘या हत्येत उत्तरप्रदेशमधील भाजप सरकारची किती आणि काय भूमिका आहे ?’ अन् ‘ते मारेकरी कोण होते ?’ याचे अन्वेषण केले पाहिजे. ज्या समाजात मारेकर्‍यांना ‘हिरो’ मानले जाते, त्या समाजात न्यायालयात जाऊन न्याय कसा मिळणार ? अशा समाजात न्यायव्यवस्था कशाला हवी ? अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ दोघेही पोलिसांच्या कह्यात होते. त्यांना बेड्याही घालण्यात आल्या होत्या; मात्र ‘जय श्रीराम’ची घोषणा देत त्यांची हत्या करण्यात आली. योगी सरकारच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाकर्ती ठरली आहे. ही चकमक झाल्यावर ज्यांना आनंद साजरा करावासा वाटतो, तेच या हत्येला उत्तरदायी आहेत.’’

३. अतिक अहमदच्या हत्येनंतर कथित निधर्मीवादी नेत्यांचे उफाळून आलेले प्रेम

असेच दुसरे अश्रूबहाद्दर के.आर्. खान सिनेअभिनेते आहेत. ते म्हणाले, ‘‘अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ हे खासदार अन् आमदार होते. त्यांना पोलिसांसमोर गोळ्या झाडण्यात आल्या. जेथे आमदार-खासदार सुरक्षित नाहीत, तेथे सामान्य माणसांची काय लायकी ?’’ या के.आर्.के.ला विचारले पाहिजे, ‘जेव्हा राजू पाल आणि उमेश पाल यांची हत्या झाली, तेव्हा तुमचे थोबाड बंद का होते ? ते आताच कसे उघडले ?’ नेहमीप्रमाणे काश्मीरच्या मेहबूबा मुफ्ती म्हणतात, ‘यूपी’मध्ये (उत्तरप्रदेशमध्ये) कायदा-सुव्यवस्था चांगली नाही. तिथे जंगलराज आहे.’ या मुफ्तीच्या आणि तिच्या वडिलांच्या राज्यात ‘काश्मिरी हिंदू कसे वेचून वेचून मारले गेले ?’, यासाठी ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहिला पाहिजे. मारला गेलेला मुसलमान असल्यामुळे या सर्व ‘भाईजानांना’ प्रेमाचे भरते आले आहे. ‘सेक्युलर’ (निधर्मी) कपिल सिब्बल म्हणतात, ‘उत्तरप्रदेशमध्ये १२ सेकंदात २ हत्या झाल्या आहेत. पहिली अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची अन् दुसरी कायदा आणि सुव्यवस्थेची.’’

४. राजू पाल यांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नीने अतिक अहमदला दिलेला शाप खरा ठरला !

राजू पाल याची हत्या अतिक अहमद आणि त्याच्या टोळीने केली. त्याच्या हत्येपूर्वी ९ दिवस अगोदर त्याचे लग्न झाले होते. राजू पाल हे बहुजन समाजवादी पक्षाचे आमदार होते. राजू पाल यांची पत्नी पूजा हिच्यावर मोठा आघात झाला. त्या शोकात तिने अतिक आणि त्याचे कुटुंब यांना शाप दिला, ‘माझ्या निर्दोष पतीची ज्या प्रकारे हत्या झाली आहे, त्याची शिक्षा ईश्वर अतिक याच्या कुटुंबाला अवश्य देईल आणि ही शिक्षा सर्व जग पाहील.’ १८ वर्षांनंतर पूजाचा हा शाप खरा झाला. राजू पाल यांची हत्या वर्ष २००५ मध्ये झाली होती. एखाद्या साध्वी स्त्रीच्या शापाचा असा परिणाम होतो.

५. कायद्याच्या चौकटीत राहूनच प्रक्रिया होणे आवश्यक !

वेदिक आणि बौद्ध वाङ्मयात याविषयीच्या पुष्कळ कथा आहेत. ‘एका कथेत राजा एका सुंदर स्त्रीला बळजोरीने उचलून त्याच्या महालात आणतो आणि तिच्या नवर्‍यावर चोरीचा खोटा आरोप करून त्याला देहदंडाची शिक्षा देतो. तेव्हा ती पतिव्रता आक्रोश करून इंद्राला आवाहन करते आणि इंद्र प्रकट होऊन त्या राजाला तात्काळ वधस्तंभावर चढवतो. डोके उडवण्याची शिक्षा कार्यवाहीत आणणारे राजाची गर्दन छाटतात’, अशी ही थोडक्यात कथा आहे. हा आपला इतिहास आहे.

म्हणून अतिकच्या मृत्यूचा आपलाप करण्याचे आपल्याला काही कारण नाही. पापाचा घडा भरला की, शिक्षा होते. ज्यांनी अतिक अहमद आणि त्याच्या भावावर गोळ्या झाडल्या, त्यांनी कायदा हातात नक्कीच घेतला आहे. सुसंस्कृत समाजात कायदा हातात घेण्याची अनुमती कुणालाही देता येत नाही. अशी अनुमती देणे, म्हणजे अराजकाला निमंत्रण देण्यासारखे आहे. आपल्याला राज्यघटनेच्या कायद्याप्रमाणे चालायचे आहे; म्हणून अतिकची आणि त्याच्या भावाची हत्या करणार्‍या तिघांनी अतिकच्या अन् त्याच्या भावाच्या कर्माची शिक्षा दिली असली, तरीही अशा कृत्याचे समर्थन करता येणार नाही. कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून उद्या न्यायालय त्यांना काही शिक्षा करील आणि ती त्यांना भोगावी लागेल.

६. लोकमानस काय म्हणते ते महत्त्वाचे ?

कायदा, न्यायपालिका, न्यायपालिकेचा न्याय आणि त्याच्या पलीकडे जाणारा एक न्याय असतो. ‘मला काही सांगायचंय’, हे प्रभाकर पणशीकर यांची अप्रतिम भूमिका असणारे नाटक आहे. नाटकात ते निवृत्त न्यायमूर्ती आहेत. नाटकातील शेवटच्या संवादात ते स्वतःच्या मुलाला म्हणतात, ‘‘न्यायाच्या पलीकडे असणाराही न्याय मला आज समजला.’’ असा न्याय काय असतो ? कायद्याने ज्याला मारेकरी ठरवले, त्याला लोकमानस मारेकरी ठरवते का ? इंग्रजांनी अनेकांना फासावर लटकवले. ज्यांना लटकवले, त्यांना आपण ‘खुनी’ मानतो का ? आपले लोकमानस ‘धर्माचे आणि अधर्माचे काम कोणते ?’, या कसोटीवर प्रत्येक गोष्ट घासून पहात निर्णय घेत असते. त्या जनतेचा निर्णय कोणता असेल ?’

– श्री. रमेश पतंगे (साभार : साप्ताहिक ‘विवेक’, २१.४.२०२३)