१. साधकांनो, आपली आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची असेल, तर संतांच्या अमूल्य वचनांवर अतूट श्रद्धा ठेवा ! : ‘संतांचा सहवास महत्त्वाचा आहे; परंतु त्यापेक्षाही त्यांच्यावर असलेली श्रद्धाच महत्त्वाची आहे. आपण संतांच्या सहवासात असलो, तरी त्यांची वचने आणि आचरण यांवर आपली श्रद्धाच नसेल, तर आपली आध्यात्मिक प्रगती होत नाही. अशा वेळी ‘चैतन्यसागरात असूनही आपण कोरडेच’, अशी आपली अवस्था होते. असे होऊ नये; म्हणून संतसहवासाचा उत्तम लाभ आपण करून घेतला पाहिजे. लेकरू कसे त्याच्या आईला सोडत नाही, तसे आपण श्रद्धेलाच आई मानून तिच्या प्रिय लेकरासारखे सतत तिच्यासमवेत राहिले पाहिजे.
२. समाजातील लोकांना ‘सनातन संस्थे’चे कार्य आणि साधनेचे महत्त्व समजावून सांगणे, हे आपले साधनाकर्तव्य चोख बजावून कलियुगात देवाने आपल्याला दिलेले धर्मप्रसाराचे कार्य अखंड चालू ठेवा ! : जेव्हा आपण समाजात नवीन लोकांना भेटून त्यांना ‘सनातन संस्थे’चे कार्य आणि साधनेचे महत्त्व समजावून सांगतो, तेव्हा त्यांच्या चित्तावर साधनेच्या संस्काराचे बीजारोपण होते अन् सनातनचे कार्य त्यांच्या चित्तावर कोरले जाते. पुढे केव्हातरी त्यांना आपण सांगितलेली साधना आणि कार्य यांचे महत्त्व पटते अन् तेही साधनेला प्रारंभ करतात. या जन्मात नाही, तर पुढील जन्मात तरी ते साधनेला लागतात; म्हणून समोरचा माणूस कसाही असला, तरी त्याला ‘साधनेचे महत्त्व सांगणे’, हे आपले कर्तव्य आहे. त्याने साधना कधी करायची, हा त्याचे प्रारब्ध आणि क्रियमाण यांचा भाग आहे. त्याचा विचार आपण करू नये. आपण आपले साधनाकर्तव्य चोख बजावावे आणि या कलियुगात आपल्याला देवाने दिलेले धर्मप्रसाराचे कार्य अखंड चालू ठेवावे. यालाच ‘समष्टी साधना’ म्हणतात.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ