पुणे – राज्यातील अल्प पटसंख्येच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि सर्वांगीण विकास यांमध्ये कमतरता आढळल्याने त्या विद्यार्थ्यांसाठी आता क्लस्टर (समूह) शाळेचा प्रयोग राबवला जाणार आहे. महाराष्ट्रातील २० पेक्षा अल्प पटसंख्येच्या अंदाजे साडेचार सहस्रांहून अधिक शाळा आहेत. या शाळांमध्ये ५० सहस्र विद्यार्थी शिक्षण घेत आहेत; पण अल्प पटसंख्येमुळे विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये आणावे, अशी चर्चा आहे. पुणे जिल्ह्यातील पानशेत जवळ क्लस्टर (समूह) शाळेचा प्रयोग यशस्वी झाल्याने आता राज्यात तो लागू करण्यासाठी शिक्षण विभाग विचाराधीन आहे.
अल्प पटसंख्येच्या शाळा असलेल्या भागातील काही अंतरावरील एक मध्यवर्ती शाळा निवडून त्या शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा दिल्या जातील. शिक्षणासमवेतच मुलांचा सर्वांगीण विकास, समाजात मिसळण्याची वृत्ती, सामाजिक भान, खिलाडूवृत्ती आणि परस्परांना समजून घेण्याची कला विद्यार्थ्यांमध्ये रुजली पाहिजे; मात्र ही उद्दिष्टे अल्प पटसंख्येच्या शाळेत साध्य करणे कठीण असते. अनेक खेळ आणि क्रीडा विषयक संधीही त्यांना उपलब्ध होत नाहीत; म्हणून राज्यात क्लस्टर (समूह) शाळांचा प्रयोग राबवण्याचा विचार करीत असल्याचे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी सांगितले.