गोवा : वनांना लागलेल्या आगींच्या संदर्भात वनखात्याकडून अज्ञातांविरुद्ध ३४ प्रथमदर्शनी गुन्ह्यांची नोंद

पणजी, ८ मे (वार्ता.) – गोव्यात मार्च महिन्यात विविध ठिकाणी वनांना लागलेल्या आगींच्या संदर्भात वनखात्याकडून अज्ञातांविरुद्ध ३४ प्रथमदर्शनी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. भारतीय वन कायदा १९२७, वन्यप्राणी संरक्षण कायदा १९७२ आणि गोवा दमण आणि दीव वनसंरक्षण कायदा १९८४ या कायद्यांच्या अंतर्गत हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

याविषयी केलेल्या अन्वेषणाच्या अहवालामध्ये म्हटले आहे,

‘‘हवामानातील अचानकपणे झालेले मोठे पालट, आग लागण्यास पोषक वातावरण, पावसाची कमतरता, तापमानामध्ये अचानकपणे झालेली वाढ, अल्प आर्द्रता यांमुळे आग लागली. मार्च मासाच्या पहिल्या पंधरवड्यात आग लागण्याच्या ७४ घटनांपैकी ३२ घटनांमध्ये ३ अभयारण्यांवर परिणाम झाला. आगीच्या घटनांमुळे ४१८ हेक्टर खासगी भूमी, राखीव वने, कोमुनिदादची भूमी, संरक्षित क्षेत्रे यांवर परिणाम झाला. यामध्ये वनखात्याच्या ३२० हेक्टर भूमीचा समावेश आहे. आगीचा परिणाम झालेल्या क्षेत्रांमध्ये झाडे लावून तेथील वनक्षेत्र वाढवण्यासाठी वनखात्याने आढावा घेण्यास प्रारंभ केला आहे.

केंद्रीय वनमंत्री अश्‍विनीकुमार चौबे

केंद्रीय वनमंत्री अश्‍विनीकुमार चौबे म्हणाले,

‘‘गोव्यात विविध ठिकाणी वनांना लागलेली आग ही आगीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने लागली आहे. या आगींमुळे गोव्यातील ४.१८ चौरस किलोमीटर वनक्षेत्रावर परिणाम झाला. यांपैकी २.२७ चौरस किलोमीटर भाग ३ अभयारण्यांतील आहे. वनक्षेत्रामध्ये आग लागू नये यासाठी पहाणी करणारे नेमणे, पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था करणे, वनक्षेत्राची पायाभूत रचना बळकट करणे, आग विझवण्यासंबंधी साहित्य मिळवणे, वनक्षेत्राच्या नजीक असलेल्या गावांमध्ये आगीपासून संरक्षण करण्याविषयी जागृती करणे, हे सर्व केंद्र सरकारच्या वन आग नियंत्रण आणि व्यवस्थापन योजनेच्या अंतर्गत येते; परंतु त्याचबरोबर प्रामुख्याने संबंधित राज्यातील सरकारचेही ते उत्तरदायित्व आहे.’’