मणीपूर येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना विशेष विमानाद्वारे महाराष्ट्रात आणणार !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – मणीपूर येथे चालू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील २२ विद्यार्थ्यांना आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. हे विमान लवकरच या विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात पोचणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७ मे या दिवशी हिंसाचारात अडकलेल्या काही विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी मणीपूर येथे एन्.आय्.टी. आणि आय्.आय्.टी. यांचे शिक्षण घेत आहेत. यांतील तुषार आव्हाड आणि विकास शर्मा या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी मणीपूरचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्याशी संपर्क साधून तेथील महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती केली.

काय आहे प्रकरण ?

‘मणीपूरमधील डोंगराळ भागात रहाणार्‍या मैतेई समाजाला ‘अनुसूचित जमाती’ या जातीच्या प्रकारात समाविष्ट करण्यात यावे’, अशी मागणी या समाजाकडूनच करण्यात येत आहे. या समाजाकडून ही मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. सद्यःस्थितीत या मागणीसाठी हा समाज रस्त्यावर उतरला आहे, तर या मागणीला विरोध करण्यासाठी अन्य समाजही रस्त्यावर उतरला आहे. यामुळे मागील आठवड्यापासून मणीपूर राज्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार चालू आहे. या हिंसाचाराला दंगलीचे स्वरूप आले आहे.