‘टाइम्स नाऊ नवभरात’च्या महिला पत्रकाराला पंजाब पोलिसांनी केलेल्या अटकेचा पत्रकार संघटनांकडून निषेध

देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानावरील सुविधांवर लक्षावधी रुपयांच्या खर्चाचे प्रकरण

पत्रकार भावना किशोर

नवी देहली – पंजाबमधील लुधियाना येथील पोलिसांनी तेथे वृत्तसंकलनासाठी गेलेल्या ‘टाइम्स नाऊ नवभारत’च्या पत्रकार भावना किशोर, कॅमेरामन मृत्युंजय कुमार आणि वाहनचालक परमिंदर सिंह यांना अटक केली. या अटकेचा ६ मे या दिवशी देशभरातील पत्रकार संघटनांनी निषेध केला. न्यायालयाने भावना किशोर यांना २ दिवसांचा तात्पुरता जामीन संमत केला आहे. यावर पुढील सुनावणी ८ मे या दिवशी होणार आहे. केजरीवाल यांच्या देहलीतील शासकीय निवासस्थानी आलिशान सुविधांवर लक्षावधी रुपये खर्च केल्याचे वृत्त या वृत्तवाहिनीने ठळकपणे दिले होते. त्यानंतर ही कारवाई झाली.

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या लुधियाना येथील कार्यक्रमाचे निमंत्रण आल्यानंतर भावना किशोर आणि त्यांचे सहकारी वृत्तसंकलनासाठी गेले होते. तेथे त्यांना रोखण्यात आले. तेथून परततांना त्यांना ‘आप’च्या महिला कार्यकर्त्यांनी थांबण्यास भाग पाडले. (लोकशाहीत संयतपणे स्वतःचा विरोध नोंदवायचा असतो. ‘आप’ हा लोकशाहीवादी पक्ष असल्याचे सांगण्यात येते; मात्र अशा घटनांतून त्याचा लोकशाहीद्रोह दिसून येतो ! – संपादक) त्यातून वाद वाढून कार्यकर्त्यांनी स्थानिक पोलिसांना बोलावले. भावना किशोर आणि त्यांचे सहकारी यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे केली. त्यावरून या तिघांना अटक करण्यात आली.

संपादकीय भूमिका

  • आम आदमी पक्षाची हुकूमशाही ! ‘सामान्य जनतेचा पक्ष’ म्हणून मिरवणारा पक्ष अशा प्रकारे हुकूमशाही करत असल्याने आता जनतेने त्याला त्याची जागा दाखवून द्यावी !
  • अन्य वेळी केंद्रातील भाजप सरकार पत्रकारांनी गळचेपी करत असल्याची ओरड मारणारे कथित लोकशाहीवादी आता कुठल्या बिळात जाऊन लपले आहेत ?