पंचाच्या साक्षीतील फोलपणा अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्ता समीर पटवर्धन यांच्याकडून उघड !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण

कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे आणि उमा पानसरे यांच्या संदर्भातील ॲस्टर आधार रुग्णालयातील विविध ‘एक्स-रे’ आणि अन्य वैद्यकीय कागदपत्रे ओळखणारा पंच सय्यद पटेल याने दिलेली साक्ष, प्रत्यक्षात असणारा पंचनामा अन् प्रत्यक्ष असलेली वस्तूस्थिती यांतील फोलपणा अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी ६ मे या दिवशी उलट तपासणीत न्यायालयात उघड केला. कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्यासमोर चालू आहे.

या प्रकरणी बेळगाव येथील अधिवक्ता प्रवीण करोशी, इचलकरंजी येथील अधिवक्ता डी.एम्. लटके आणि अधिवक्ता ए.जी. बडवे यांनीही उलट तपासणी घेतली. या प्रसंगी अधिवक्ता अमोघवर्ष खेमलापुरे, अधिवक्त्या प्रीती पाटील उपस्थित होत्या. या खटल्यात एकूण १२ संशयित आरोपी आहेत.  पुढील सुनावणी २० मे या दिवशी होणार आहे.

पंच पटेल यांनी ‘मी राजारामपुरी पोलीस ठाण्यासमोरून जातांना पोलिसांनी मला बोलावले आणि मी नोंदवलेला जबाब वाचून स्वाक्षरी केली आहे, माझ्यासमोर जबाबाची प्रत काढली आहे’, असे पंच पटेल यांनी न्यायालयात साक्ष देतांना सांगितले.

१. प्रत्यक्षात उलटतपासणीत अधिवक्ता पटवर्धन यांनी पंच पटेल यांनी साक्ष देतांना ते अशासकीय ठेकेदार असल्याचे सांगितले आहे, तर प्रत्यक्षात पोलिसांकडून सादर केलेल्या लेखी पंचनाम्यात ते शासकीय ठेकेदार असल्याचे लिहिले आहे. पंच पटेल यांनी त्यांच्या मुद्रित जबाबात खाडाखोड नाही, असे न्यायालयात सांगितले, तर प्रत्यक्षात मुद्रित जबाबात खाडाखोड असल्याचे निदर्शनास आणून दिले.

२. कॉ. पानसरे यांच्या संदर्भातील रुग्णालयातील एक्स-रे फिल्मवर एक होल दिसत आहे; त्यावर ‘मार्कर’ने गोल केले आहे आणि दुसर्‍या ठिकाणी लिहिले आहे; मात्र पटेल यांच्या  पंचनाम्यात त्याचा उल्लेख नसल्याचे अधिवक्ता पटवर्धन यांनी उलट तपासणीत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

३. अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पंच पटेल हे कॉ. पानसरे यांच्या वैद्यकीय अहवालात ८० पाने असल्याचे सांगत आहेत, प्रत्यक्षात त्या पानावर क्रमांक होते का ? याविषयी ते सांगू शकत नाहीत, काही पानांवर क्रमांक आहेत, तर काही पानांवर क्रमांक नाहीत. याच समवेत पटेल यांनी हातात पाने घेऊन मोजलेली नव्हती. तसेच पोलिसांनी दाखवलेले एक्स-रे, छायांकित प्रती आणि आजच्या दिवशी न्यायालयात दाखवलेले ‘एक्स-रे’, तसेच छायांकित प्रती त्याच आहेत, हेही सांगू शकत नाही. त्यामुळेच त्यांच्या जबाबात विसंगती असल्याचे उघड केले.

सरकारी पक्ष ज्या-ज्या पुराव्यांवर अवलंबून साक्ष घेत आहेत, त्याच्या प्रती आरोपीला मिळाल्या नसल्याविषयीचे आवेदन अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी न्यायालयात सादर केले. त्या संदर्भात न्यायालयात युक्तीवाद करतांना ते म्हणाले, ‘‘सरकार पक्षाकडून पूर्वीच ही कागदपत्रे देणे अपेक्षित होते; परंतु ते आरोपींना उपलब्ध करून दिले नसल्याने आरोपींना त्यांच्या बचावासाठी नैसर्गिक संधी मिळत नसल्याने एकप्रकारे आरोपींवर अन्याय होत आहे. यापुढील काळात असे होऊ नये; म्हणून सर्वांना समान संधी मिळण्याच्या दृष्टीने खटल्याशी संबंधित सर्व कागदपत्रे मिळावीत.’’