परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त असलेल्या रथोत्सवाच्या वेळी ‘रथ अंतराळातून डोलत चालला आहे’, अशी अनुभूती घेणारे श्री. परशुराम पाटील !

वैशाख कृष्ण सप्तमी (२२.५.२०२२) या दिवशी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त सप्तर्षींच्या आज्ञेने रामनाथी, गोवा येथे रथोत्सव साजरा करण्यात आला. रामनाथी आश्रमातील श्री. परशुराम पाटील (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांना या रथोत्सवात रथ चालवण्याची सेवा मिळाली. त्या वेळी त्यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. रथोत्सवाच्या आदल्या दिवशी ‘रथ चालवण्याची स्वतःची पात्रता आहे का ?’, असा विचार येणे; परंतु ‘हे भगवंताचेच नियोजन असून तोच ही सेवा करवून घेणार आहे’, या विचारामुळे कर्तेपणाचे विचार निघून जाणे

श्री. परशुराम पाटील

‘रथोत्सवाच्या आदल्या दिवशी आदरयुक्त भीतीमुळे माझ्या मनात ‘ही सेवा करण्याची माझी पात्रता आहे का ?’, असे विचार येत होते; मात्र प्रत्यक्ष रथोत्सवाच्या दिवशी सकाळी ‘हे साक्षात् भगवंताचे नियोजन असल्यामुळे तोच ही सेवा माझ्याकडून करवून घेणार आहे’, असे विचार येऊन मनाचा कर्तेपणा आपोआप गळून पडला आणि मन निर्विचार झाले.

२. रथ चालवण्याचा सराव करतांना ‘भगवंतच रथ चालवत आहे’, असे जाणवणे

मला रथ चालवण्याचा अनुभव नसल्यामुळे मी रथ चालवण्याचा सराव करत होतो. सराव करतांना ‘मी रथ चालवत नसून भगवंतच रथ चालवत आहे’, असे मला जाणवत होते. त्यामुळे रथ चालवतांना मला कुठलीही अडचण आली नाही.

३. भावपूर्ण प्रार्थना करून रथावर चढतांना मनावरील दडपण दूर होऊन हलकेपणा जाणवणे

रथोत्सवाच्या वेळी  रथ चालवण्यापूर्वी मी रथासमोर उभे राहून प्रार्थना केली, ‘हे भगवंता, आपणच माझ्याकडून ही रथ चालवण्याची सेवा भावपूर्ण करून घ्या.’ प्रार्थना करून रथाच्या पायर्‍या चढू लागताच माझ्या मनावरील दडपण एकदम नाहीसे होऊन मला हलकेपणा जाणवला. जणू ‘कुणीतरी मला उचलून रथात बसवले’, असे मला जाणवले आणि माझे मन निर्विचार झाले.

४. रथ चालवतांना ‘हाताच्या बोटांत ३३ कोटी देवता विराजमान झाल्या असून त्याच रथ चालवत आहेत’, असे जाणवणे

रथ चालवण्यास आरंभ केल्यावर ‘माझ्या हाताच्या बोटांच्या पेशीपेशींत ३३ कोटी देवता विराजमान झाल्या असून त्या देवताच रथ चालवत आहेत’, असे मला जाणवले. मला त्या देवतांचे दर्शनही होत होते.

५. रथ चालवतांना अनुभवलेली भावस्थिती !

रथ चालवतांना मला आजूबाजूचे भान नव्हते आणि मला काही दिसतही नव्हते. मला रथाच्या गाडीचा आवाजही ऐकू येत नव्हता. जणू ‘रथ डोलत अंतराळातून आपोआपच चालला आहे’, असे मला वाटत होते. माझे मन वेगळ्याच निर्विचार स्थितीत गेले होते. ही भावस्थिती मला रात्रीपर्यंत आणि पुढेही २ दिवसांपर्यंत अनुभवता येत होती. यापूर्वी मी अशी भावावस्था कधीच अनुभवली नव्हती.

‘मी देवासाठी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी) काही केले नाही, तरी देवाने मला ही संधी देऊन माझ्या जन्माचे सार्थक केले’, त्याबद्दल देवाच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. परशुराम पाटील (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(६.६.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक