बजरंग दलावर राज्य सरकार बंदी घालू शकत नाही !  

कर्नाटकमधील काँग्रेसचे नेते वीरप्पा मोईली यांची सारवासारव !

काँग्रेसचे नेते वीरप्पा मोईली

बेंगळुरू (कर्नाटक) – बजरंग दलावर बंदी घालण्याचा काँग्रेसचा कोणताही उद्देश नाही. पक्षामध्ये असा कोणताही प्रस्ताव नाही आणि राज्य सरकार अशा प्रकारे बंदी घालू शकत नाही, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांनी केली आहे. काँग्रेसने कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या घोषणापत्रामध्ये बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे देशभरातून काँग्रेसचा विरोध होत आहे. या घोषणेचा लाभ भाजपला होऊ लागल्यानेच आता काँग्रेस कोलांटीउडी मारण्याचा प्रयत्न करू लागल्याचेच मोईली यांच्या या विधानावरून लक्षात येत आहे.

मोईली म्हणाले की, काँग्रेसच्या घोषणापत्रामध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि बजरंग दल यांचा उल्लेख असला, तरी यात सर्व कट्टरतावादी संघटनांचा समावेश आहे; मात्र कोणत्याही संघटनेवर बंदी घालण्याचे राज्य सरकारला शक्य नाही; कारण हा अधिकार केंद्र सरकारला आहे. (हे काँग्रेसवाल्यांना आधी ठाऊक नव्हते कि आता त्यांना जाग आली ? यातून ते मतदारांना अशा प्रकारची घोषणा देऊन मूर्ख बनवण्याचाच प्रयत्न करत होते, हे स्पष्ट होते ! याविषयी मतदारांनी काँग्रेसला जाब विचारायला हवा ! काँग्रेसने आतापर्यंत अशाच प्रकारची अशक्य असणारी आश्‍वासने देऊन मतदारांना मूर्ख बनवल्यानेच आता तिच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे ! – संपादक) यामुळे कर्नाटक सरकारकडून बजरंग दलावर बंदी घालणे अशक्य आहे.

संपादकीय भूमिका

बजरंग दलाच्या बंदीचा विषय कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या मुळावर आल्याने आता ही सारवासारव काँग्रेस करत आहे; मात्र त्याचा कोणताही लाभ काँग्रेसला होणार नाही, हे हिंदू निवडणुकीत दाखवून देणार आहेत !