२.५.२०२३ या दिवशी झालेल्या भागात आपण ‘सौ. मनीषा मधुकर मयेकर साधनेत कशा आल्या आणि त्यांची साधना कशी चालू झाली ?’, हे पाहिले. आजच्या भागात ‘त्यांनी झोकून देऊन केलेली सेवा, सेवा करतांना त्यांना आलेल्या अनुभूती आणि आता उतारवयात परात्पर गुरु कालिदास देशपांडे यांच्या आज्ञेनुसार घराला आश्रम समजून त्यांनी आनंदाने जीवन व्यतीत करणे’ इत्यादी पाहूया.
(भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/678994.html |
‘घरात साधनेसाठी प्रतिकूल वातावरण असूनही तळमळीने साधना करून आध्यात्मिक प्रगती वेगाने कशी करायची ?’, हे सौ. मनीषा मधुकर मयेकर यांच्या या लेखातून शिकायला मिळते. कर्करोगाचे शस्त्रकर्म झाल्यानंतर त्यांना अध्यात्मप्रसाराची सेवा करणे शक्य झाले नाही; पण ‘त्यांनी परात्पर गुरु कालिदास देशपांडे यांचे आज्ञापालन करून घराचा आश्रम बनवला’, याविषयी त्यांचे कौतुक करावे, तेवढे अल्पच ! त्यांनी ‘संतांचे तंतोतंत आज्ञापालन कसे करावे ?’, याचा आदर्श साधकांसमोर ठेवला आहे. ‘त्यांची उत्तरोत्तर आध्यात्मिक प्रगती होवो’, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१३.२.२०२३) |
५. सत्संगाविषयीची ओढ वाढणे आणि सत्संगातून अन् नामातून पुष्कळ आनंद मिळणे
मी सत्संग कधीच चुकवला नाही. सत्संगाची वेळ रात्री ९ ते ११, अशी होती. सत्संगाला माझ्या समवेत २ साधिका यायच्या. माझ्या घराच्या बाजूलाच त्यांची घरे होती. घरातील रात्रीची आवराआवर करून आम्ही तिघी सत्संगाला जायचो. ‘सत्संगही केवळ माझ्यासाठीच चालू आहे’, असे मला वाटायचे. नामजप चालू असल्यामुळे माझ्या मनाला आनंद होत होता. मी नाम घेत झोपायचे. त्यामुळे मला रात्री झोप छान लागत होती. मी निश्चय केला, ‘मनात कुठलेही विचार येवोत, नामापासून दूर जायचे नाही.’ ‘नाम म्हणजचे गुरु आणि ते तर आपल्या समवेत सतत आहेत’, याचाच मला आनंद व्हायचा. सत्संगामुळे मला माझ्या मनातील अध्यात्माविषयीच्या प्रश्नांची उत्तरे मिळत होती. हळूहळू मला सत्संगाचा आनंद मिळू लागला. मी सत्संगाची वाट बघत असायचे.
६. सत्संगसेविकेने सेवा करायला सांगितल्यावर लगेचच त्याविषयी चिंतन करणे
एकदा सत्संगसेविका मला म्हणाल्या, ‘‘आता सत्सेवा करा. श्री गुरूंचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) आवडते कार्य करा.’’ मी विचारले, ‘‘म्हणजे काय करायचे ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘समाजात जाऊन अध्यात्माचा प्रसार करायचा.’’ देवानेच शेजारच्या २ मुली माझ्या सोबतीला दिल्या होत्या. रात्री झोपतांना मी विचार करू लागले, ‘आपण सत्सेवा कशी करायची ? आपण सेवेला कसे जायचे आणि आज्ञापालन कसे करायचे ?’
७. स्वतःच्या मनाने सेवा करण्याविषयी झालेल्या चुका आणि त्या वेळी सत्संगसेविकेकडून मिळालेले मार्गदर्शन !
७ अ. सत्संगसेविकेला न विचारता मनाने २ – ३ सत्संग घेणे आणि सत्संगसेविकेने चूक लक्षात आणून देऊन संहितेप्रमाणे सत्संग घेण्यास सांगणे : माझ्या मनात विचार आला, ‘आपण आपल्या वाडीतच सत्संग घेऊया आणि सेवेला आरंभ करूया.’ मला एकेक क्षण मोलाचा वाटू लागला. मी एका घरी ‘इथे रात्री ८ वाजता सत्संग आहे’, असे सांगून आले. मी बोलवलेली मंडळी उत्सुकता म्हणून तिथे एकत्र आली. असे मी तिथेच २ – ३ सत्संग घेतले. याविषयी सत्संगसेविका ‘डॉ. (सौ.) प्रसादी यांना कळल्यानंतर त्या मला म्हणाल्या, ‘‘असे आपल्या मनाने सत्संग घ्यायचे नाहीत.’’ त्यांनी मला ‘मी तिथे काय सांगितले ?’, ते विचारले आणि म्हणाल्या, ‘‘मी पुढच्या वेळी तुम्हाला सत्संगाची संहिता (‘स्क्रिप्ट’) आणून देते. त्याप्रमाणे तुम्ही सत्संग घ्या.’’ नंतर समाधान व्यक्त करून त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही सत्संग घेऊ शकाल.’’
सत्संगाला साधक यावेत; म्हणून मी सत्संगाची वेळ उशिराची ठेवत होते आणि घरी साधनेसाठी प्रतिकूल वातावरण असल्यामुळे मला वेळेत घरीही पोचावे लागायचे. देवानेच माझ्याकडून सर्व व्यवस्थित नियोजन करून घेतले. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढू लागला.
७ आ. गणपतिपुळे येथे होणार्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जाहीर सभेचा पुष्कळ प्रसार करणे आणि त्यातून आनंद मिळणे : वर्ष १९९८ – ९९ मध्ये रत्नागिरीतील गणपतिपुळे येथे सनातनची सार्वजनिक सभा होणार होती. तेथे पुष्कळ प्रसार होत होता. मी वाटेतील वाटसरूंनाही सभेविषयी सांगत होते, ‘‘सभेला या. आपले ‘गुरु’, म्हणजे परमेश्वरच आहेत. ते येणार आहेत. न चुकता या.’’ त्या वेळी मी त्यांना सभेतील विषयाचे स्वरूप आणि साधना समजावून सांगत होते. या प्रसारातून मला पुष्कळ आनंद मिळत होता.
७ आ १. परात्पर गुरु डॉक्टरांवर फुलांची उधळण करून त्यांचे स्वागत करण्याचे ठरवणे ; त्यासाठी हार, फुले इत्यादी सर्व सिद्धता करणे आणि ‘परम पूज्यांना हे आवडणार नाही’, असे सांगून सत्संगसेविकेने चूक लक्षात आणून देणे : सभेचे दिवस जवळ येत होते. ‘श्री गुरु येतील, तेव्हा आपण काय करायचे ?’, असे मी मनात ठरवत होते. ‘श्री गुरु फाटकामध्ये येताच त्यांच्यावर फुलांची उधळण करून त्यांचे स्वागत करायचे’, असे मी ठरवले. ते येणार होते, त्या दिवशी ‘दत्तजयंती’ होती. गुरुकृपेने मला ‘संतसेवा’ मिळाली होती. त्या वेळी मला वाटले, ‘परम पूज्यांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) रूपाने दत्तगुरुच गणपतिपुळ्याला येणार आहेत’, या भावाने ‘आपण तेथेच दत्तजयंतीचा उत्सव साजरा करू. आपल्याला त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ होणार आहे. आपण केवढे भाग्यवान आहोत !’
ज्या दिवशी परम पूज्य येणार होते, त्या दिवशी मी पूजेचे सर्व साहित्य, म्हणजे दाराला लावायला मोठा हार, समई, ताम्हण इत्यादी घेऊन गेले. मी डॉ. (सौ.) प्रसादीबाईंना म्हणाले, ‘‘बाई, मला हे सर्व करू द्या. आज दत्तजयंती आहे. प्रत्यक्ष गुरुदेव येणार आहेत.’’ डॉ. प्रसादी मला म्हणाल्या, ‘‘परम पूज्यांना हे आवडणार नाही. आपल्याला कर्मकांडात अडकायचे नाही.’’
८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रथम भेट !
८ अ. परात्पर गुरु डॉक्टरांना साधकांच्या घरी उतरायचे असणे; मात्र तसे करणे शक्य नसल्याने ऐन वेळी त्यांना गणपतिपुळे येथील एका सभागृहात न्यायचे ठरवणे : परम पूज्यांनी कुठे उतरायचे ती जागा निश्चित केली होती; पण ते साधकांचे घर नव्हते. तेव्हा परम पूज्य म्हणाले, ‘‘मला साधकांच्या घरी उतरायचे आहे.’’ ते शक्य नसल्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांना गणपतिपुळ्याच्या एका मोठ्या सभागृहामध्ये न्यायचे ठरले. लगेच धावपळ चालू झाली. प्रसादीबाई मला म्हणाल्या, ‘‘गुरु आपली अशीच परीक्षा घेतात. त्यांच्या इच्छेप्रमाणे आपल्याला वागायचे असते.’’ तेव्हा मी साधनेत नवीनच होते. आम्ही साधक ते धुळीने माखलेले सभागृह झाडत होतो. तेवढ्यात परम पूज्य सभागृहात आलेही आणि म्हणाले, ‘‘राहू दे ते तसेच !’’ आणि ते तेथील पलंगावर बसले.
८ आ. साधिकेला परात्पर गुरु डॉक्टरांना औक्षण करण्याची संधी मिळणे आणि तिच्या घरी साधनेसाठी प्रतिकूल वातावरण असल्याचे कळल्यावर त्यांनी तिची विचारपूस करणे : मला परम पूज्यांना औक्षण करण्याची संधी मिळाली. त्यांना नाम लावतांना मला त्यांच्या कपाळाचा स्पर्श झाला. तो स्पर्श मला सर्वकाही देऊन गेला. डॉ. (सौ.) प्रसादीबाईंनी परम पूज्यांना सांगितले, ‘‘यांच्या घरी साधनेसाठी प्रतिकूल वातावरण आहे.’’ तेव्हा परम पूज्यांनी माझी प्रेमाने विचारपूस केली.’
९. परात्पर गुरु डॉक्टर रत्नागिरीला आले असतांना त्यांची साधिकेच्या यजमानांशी ओळख होणे आणि त्यांनी यजमानांना ‘पत्नीला साधनेला अन् सेवेला पाठवा, त्यामुळे सर्व कुटुंबियांचे कल्याण होईल’, असे सांगणे
‘एकदा परम पूज्य रत्नागिरीमध्ये साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. मार्गदर्शन संपल्यानंतर सर्व जण बाहेर पडले. परम पूज्य सर्वांना निरोप देत होते आणि ‘गाडी शिकून घ्या’, असे सांगत होते. तेवढ्यात मी म्हणाले, ‘मलाही गाडी शिकायची फार इच्छा आहे.’’ तेव्हा परम पूज्य मला म्हणाले, ‘‘मग शिका. आपले साधक गाडी शिकवायला आहेत.’’ तेव्हा डॉ. (सौ.) प्रसादीबाई त्यांना म्हणाल्या, ‘‘यांच्या घरी साधनेला प्रतिकूल वातावरण आहे.’’ परम पूज्य गाडीत बसले, तेवढ्यात माझे यजमान तेथे आले. एका साधकाने परम पूज्यांना सांगितले, ‘‘हे भाभींचे यजमान आहेत.’’ परम पूज्य गाडीतून खाली उतरले आणि माझ्या यजमानांना म्हणाले, ‘‘यांना साधनेला आणि सेवेला पाठवा. त्यांची पूर्वजन्मीची साधना आहे; म्हणून त्या आता साधनेत आहेत. त्यांच्या साधनेने त्यांच्या सासरचे आणि माहेरचे कल्याण होईल.’’ परम पूज्यांनी मला मोठा आशीर्वादच दिला.
१०. झोकून देऊन केलेली अध्यात्मप्रसाराची सेवा आणि त्या वेळी आलेल्या अनुभूती !
१० अ. गावातील सर्वांच्या घरी जाऊन त्यांना नामाची महती सांगणे, सनातनच्या ग्रंथांचे वितरण करणे आणि ही सेवा करतांना पुष्कळ आनंद मिळणे : मी गावात कधी कुणाच्या घरी गेले नव्हते; पण श्री गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मी सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने घेऊन गावातील प्रत्येक घरी गेले. त्या वेळी ‘गावात किती प्रेमळ माणसे आहेत !’, याची मला जाणीव झाली. त्यांना नामाविषयी माहिती सांगतांना मला फार आनंद व्हायचा. मी त्यांना सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने दाखवायचे अन् त्यांचे महत्त्व सांगायचे. आरंभी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ आणि ‘दत्त’ या २ ग्रंथांचा पुष्कळ प्रसार अन् वितरण व्हायचे. माझ्या मनात दिवसरात्र साधनेचाच विचार असायचा. ‘पूर्वी संतांनी तीव्र साधना केली; म्हणून त्यांना देव भेटला. आपणही तीव्र साधना करायची’, असा विचार माझ्या मनात यायचा. नंतर माझ्या घरातील वातावरण साधनेसाठी आणखी प्रतिकूल होऊ लागले.
१० आ. साधना करतांना कुटुंबियांकडून अनेक अडचणी येणे : साधना करत असतांना मला पुष्कळ अडचणींना सामोरे जावे लागत होते. घरात आम्ही ७ – ८ जण होतो. मी त्या सर्वांना ‘साधक’ म्हणत असे. श्री गुरु त्यांच्या माध्यमातून माझी परीक्षा घेत होते. एका साधकाला (कुटुंबियाला) सनातनचा विषय फारसा आवडत नसे. दुसरे साधक (कुटुंबीय) माझ्याशी फार कडक बोलायचे. एकदा मी नामस्मरणाला बसले होते. तेव्हा मी त्यांच्या हाकेला ‘ओ’ दिली नाही; म्हणून त्यांनी आदळआपट केली.
(क्रमशः)
– सौ. मनीषा मधुकर मयेकर, कोतवडे, जिल्हा रत्नागिरी.
(७.२.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |