झोकून देऊन साधना आणि सेवा करणार्‍या कोतवडे (जिल्‍हा रत्नागिरी) येथील ६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. मनीषा मधुकर मयेकर (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

सौ. मनीषा मधुकर मयेकर यांच्‍यामध्‍ये साधनेची तीव्र तळमळ आणि देवाप्रती अपार भक्‍ती आहे. सौ. मयेकर यांच्‍या घरी त्‍यांच्‍या साधनेसाठी प्रतिकूल वातावरण होते; पण त्‍यांच्‍यातील साधनेच्‍या तीव्र तळमळीनेच त्‍यांना प्रतिकूल परिस्‍थितीला सामोरे जाण्‍यास शक्‍ती दिली. परिस्‍थितीला किंवा नशिबाला दोष देऊन स्‍वस्‍थ न रहाता त्‍यांनी प्रत्‍येक प्रसंगातून मार्ग शोधला. देवाने त्‍यांना प्रत्‍येक प्रसंगात साहाय्‍य केले. साधनेच्‍या या तळमळीच्‍या समवेतच त्‍यांच्‍या मनात परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती अपार भावही आहे. वयोमानानुसार आणि शारीरिक क्षमता न्‍यून झाल्‍यामुळे आता त्‍या अध्‍यात्‍मप्रसाराची सेवा करू शकत नसल्‍या, तरी परात्‍पर गुरु कालिदास देशपांडेकाका यांच्‍या शब्‍दांचे तंतोतंत आज्ञापालन करून त्‍यांनी घराचा आश्रम बनवला आहे. आता त्‍यांना घरातही परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होते. आता त्‍या अतिशय समाधानी वृत्तीने आनंदी जीवन जगत आहेत. ‘आनंद आणि समाधान मिळवणे’, हीच साधना आहे आणि त्‍यांनी ते साध्‍य केले आहे.

(भाग १)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘घरात साधनेसाठी प्रतिकूल वातावरण असूनही तळमळीने साधना करून आध्‍यात्मिक प्रगती वेगाने कशी करायची ?’, हे सौ. मनीषा मधुकर मयेकर यांच्‍या या लेखातून शिकायला मिळते. कर्करोगाचे शस्‍त्रकर्म झाल्‍यानंतर त्‍यांना अध्‍यात्‍मप्रसाराची सेवा करणे शक्‍य झाले नाही; पण ‘त्‍यांनी परात्‍पर गुरु कालिदास देशपांडे यांचे आज्ञापालन करून घराचा आश्रम बनवला’, याविषयी त्‍यांचे कौतुक करावे, तेवढे अल्‍पच ! त्‍यांनी ‘संतांचे तंतोतंत आज्ञापालन कसे करावे ?’, याचा आदर्श साधकांसमोर ठेवला आहे. ‘त्‍यांची उत्तरोत्तर आध्‍यात्मिक प्रगती होवो’, हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना !’

– (परात्‍पर गुरु) डॉ. आठवले (१३.२.२०२३)

सौ. मनीषा मयेकर

१. कौटुंबिक पार्श्‍वभूमी

‘मी ‘उपवास करणे, देवळात जाणे, पोथ्‍या वाचणे’ इत्‍यादी करत असे. कुटुंबात पुष्‍कळ माणसे असल्‍यामुळे मला सर्वांचे ऐकावे लागत असे. ‘काम करतांना माझ्‍याकडून काही चूक होणार नाही’, याकडे माझे लक्ष असायचे. त्‍यामुळे घरातील सर्वांचाच माझ्‍यावर विश्‍वास होता. मला जे दागिने किंवा कपडे मिळतील, त्‍यांत मी समाधानी होते; मात्र मी एकत्र कुटुंबात रहात असल्‍यामुळे काही वेळा मला पुष्‍कळ त्रास व्‍हायचा.

२. संगीतातून झालेली साधना

पूर्वी मला गाण्‍याची आवड होती. मी प्रतिदिन १ घंटा गाण्‍याचा सराव करायचे. माझ्‍या मनात रात्रंदिवस गाणेच असायचे. अभंग आणि भक्‍तीगीते यांतून मी देवाला भावपूर्ण आळवायचे. नाट्यगीतातून आलाप गातांना मला पुष्‍कळ आनंद व्‍हायचा. मी शास्‍त्रीय संगीत शिकले नव्‍हते; पण ‘संगीत ही साधनाच आहे. ती देवाची पूजा, उपासना आणि आराधना आहे’, असेच मला वाटायचे. मी घरात नेहमी सांगायचे, ‘‘मला संसारातील काही नको. ही संवादिनी (पेटी) आणि गाणे, हे मला अखंड हवे आहे.’’ मला सर्व प्रकारची गाणी म्‍हणायला आवडायचे.

३. सनातन संस्‍थेशी संपर्क

३ अ. यजमानांनी देवळातील एका सत्‍संगाला नेणे आणि तो सनातनचा सत्‍संग असणे : वर्ष १९९७ मध्‍ये एकदा रात्री १० वाजता माझ्‍या यजमानांनी मला देवळातील एका सत्‍संगाला नेले. तेव्‍हा देवळात पुष्‍कळ गर्दी होती आणि तिथे चालू असलेला सत्‍संग संपत आला होता. ‘पुढच्‍या आठवड्यात किती वाजता जमायचे ?’, हे ठरवून तो सत्‍संग संपला. त्‍यामुळे आम्‍हाला सत्‍संगाचा आरंभीचा भाग कळला नव्‍हता. तो सनातन संस्‍थेचा सत्‍संग होता. ठरल्‍याप्रमाणे पुढच्‍या आठवड्यात आम्‍ही सत्‍संगाला गेलो. आम्‍ही नेहमीप्रमाणे उशिरा पोचलो. सत्‍संग घेणार्‍या साधिकेने आम्‍हाला सत्‍संगाला वेळेवर येण्‍याचे महत्त्व सांगितले. काही लोक त्‍यांना शंका विचारत होते. त्‍या वेळी सौ. प्रसादीबाई (डॉ. (सौ.) शीतल प्रसादी)) सत्‍संग घ्‍यायला यायच्‍या. त्‍यांनी सर्वांना सत्‍संगातील सूत्रे लिहिण्‍यासाठी वही-पेन घेऊन यायला सांगितले.

३ आ. सनातनच्‍या सत्‍संगाला नियमितपणे जाणे, एका साधकाने ‘अध्‍यात्‍माचे प्रास्‍तविक विवेचन’, हा ग्रंथ वाचायला देणे; मात्र तो न कळल्‍यामुळे ठेवून देणे : पुढच्‍या आठवड्यात माझी जाऊ आणि शेजारच्‍या २ मुली आमच्‍या समवेत सत्‍संगाला यायला लागल्‍या. हळूहळू माझ्‍या मनातील शंकांचे निरसन होऊ लागले. एका साधकांनी ‘अध्‍यात्‍माचे प्रास्‍तविक विवेचन’, हा सनातनचा ग्रंथ मला वाचायला दिला. २ दिवसांनी मी तो ग्रंथ वरवर चाळून पाहिला; पण मला त्‍यातील काहीच कळत नव्‍हते; म्‍हणून मी तो ग्रंथ ठेवून दिला.

३ इ. पूर्वी साईबाबांचा नामजप करणे, सत्‍संगात ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि ‘कुलदेवता’ यांचा नामजप करायला सांगितल्‍यावर मनाची घालमेल होणे अन् साईबाबांनी तुम्‍हाला कुलदेवतेच्‍या हातात सोपवले असल्‍याचे साधकाने सांगितल्‍यावर कुलदेवतेचा नामजप चांगल्‍या प्रकारे होणे : सनातन संस्‍थेशी संपर्क होण्‍यापूर्वी माझे साईबाबांचे नामस्‍मरण चालू होते. त्‍या पूर्वी मला स्‍वामी स्‍वरूपानंदांची भक्‍ती करायला आवडत असे. मी पोथीवाचन करत होतेच. एकदा सत्‍संगात नामस्‍मरणाचा विषय चालू होता. श्री. रमण पाध्‍ये सत्‍संग घेत होते. त्‍यांनी सत्‍संगात ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि ‘कुलदेवता’ यांचे नामस्‍मरण करणे’, कसे श्रेष्‍ठ आहे ?’, हे सांगितले. माझ्‍या मनाची घालमेल चालू झाली. मी त्‍यांना माझी शंका विचारली, ‘‘माझी कुलदेवीवर श्रद्धा आहेच; परंतु मी साईबाबांचे नामस्‍मरण करत आहे. इतकी वर्षे माझी काही ना काही साधना चालूच आहे. मग ‘ती सारी साधना फुकट गेली’, असे समजायचे का ?’’

श्री. पाध्‍येकाका म्‍हणाले, ‘‘तुमची साधना फुकट गेली नाही. त्‍या साधनेमुळेच साईबाबांनी तुम्‍हाला तुमच्‍या कुलदेवीच्‍या हातात सोपवले आहे. ‘योग्‍य नामस्‍मरण कुणाचे आणि कसे करायचे ?’ हे त्‍यांनीच तुम्‍हाला या सत्‍संगाच्‍या माध्‍यमातून सांगितले आहे.’’ त्‍यानंतर माझे श्री कुलदेवीचे नामस्‍मरण सुंदररित्‍या चालू झाले.

३ ई. कुलदेवतेचे नामस्‍मरण चालू केल्‍यावर कुलदेवीच्‍या दर्शनाला जायला मिळणे आणि प्रवासात प्रवाशांना साधनेविषयी सांगता आल्‍याने आनंद होणे : आमची कुलदेवी गोव्‍याला ‘मये’ येथे आहे. एकदा अकस्‍मात् माझे यजमान मला म्‍हणाले, ‘‘२ दिवसांनी आपण मयेला कुलदेवीला जायचे आहे.’’ ही मला आलेली पहिलीच मोठी अनुभूती होती. प्रवासात मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप का करायचा ?’, याची माहिती प्रवाशांना सांगितली. मला अध्‍यात्‍माविषयी इतरांना सांगता आल्‍यामुळे माझे मन प्रसन्‍न झाले होते.

४. ‘नामस्‍मरण वाढावे’, यासाठी गाणे न्‍यून करणे; पण एका साधकाने ‘साधना ही आनंदप्राप्‍तीसाठी असून ‘तुम्‍हाला गाण्‍यातून आनंद मिळत असल्‍यास ते चालू ठेवा’, असे सांगणे

नामस्‍मरण पुष्‍कळ वेळ व्‍हायला पाहिजे; म्‍हणून मी हळूहळू गाणे म्‍हणणे न्‍यून करू लागले. मी संवादिनी वाजवायचे न्‍यून केले आणि नामस्‍मरणाकडे लक्ष देऊ लागले. माझ्‍या मोठ्या मुलाच्‍या ते लक्षात आले आणि त्‍याने मला ‘साधनेसाठी तुमचे गाणे बंद करू नका’, असे मला सांगितले. त्‍यानंतर मी सत्‍संगात याविषयी विचारल्‍यावर सत्‍संगसेवक मला म्‍हणाले, ‘‘साधना ही आनंदप्राप्‍तीसाठीच आहे. तुम्‍हाला गाण्‍यातून आनंद मिळतो, तर तुम्‍ही गाणे सोडायला नको.’’ तेव्‍हा मला वाटले, ‘देवा, पूजा-अर्चना, संगीत आराधना आणि नामस्‍मरण, या सर्वांतून तू नेहमी माझ्‍या जवळच असतोस.’ संगीताचा महिमा अगाध आहे. मी प्रतिदिन सायंकाळी प.पू. बाबांची (प.पू. भक्‍तराज महाराज यांची) आरती आणि भजने म्‍हणते. माझे वडील भजनीबुवा होते. लहानपणी काही वेळा मी त्‍यांच्‍या समवेत भजनाला जायचे. गणेशोत्‍सवात आमच्‍या घरीही भजन व्‍हायचे. त्‍यामुळे मला भजनांचीही आवड आहे.

(क्रमश:)

– सौ. मनीषा मधुकर मयेकर (वर्ष २०२२ मधील आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के), कोतवडे, जिल्‍हा रत्नागिरी. (७.२.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक