भारताची बाजू घेणारे प्रसिद्ध पाकिस्‍तानी लेखक तारेक फतेह !

२४ एप्रिल २०२३ या दिवशी प्रसिद्ध पाकिस्‍तानी लेखक तारेक फतेह यांचे निधन झाले. ते कर्करोगाचे रुग्‍ण होते. टोरंटो (कॅनडा) येथे त्‍यांच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार झाले. त्‍यांचे वय ७३ वर्षे होते. तारेक फतेह यांचा भारतीय मुसलमान अत्‍यंत द्वेष करायचे; कारण ते शरियतमध्‍ये पालट करण्‍याच्‍या बाजूने होते.

तारेक फतेह

१. तारेक फतेह यांचे पूर्वाश्रमीचे जीवन आणि त्‍यांच्‍यावर पाकने केलेली कारवाई

कराची येथे २० नोव्‍हेंबर १९४९ या दिवशी जन्‍मलेले तारेक फतेह नेहमी पाकिस्‍तानच्‍या विरोधात होते. ते अखंड भारताचे समर्थक होते. त्‍यांचे वडीलसुद्धा अन्‍य मुसलमानांप्रमाणे बॅरिस्‍टर जिनांचे ऐकून खलिस्‍तानाच्‍या पाकिस्‍तानला आले; परंतु ते मृगजळ ठरले. ‘मी पाकिस्‍तानी होतो, आता मी कॅनडाचा आहे. पंजाबी मुसलमान कुटुंबातील होतो, जे आधी शीख होते. माझी श्रद्धा इस्‍लाममध्‍ये आहे. त्‍याचे मूळ यहुदी धर्मात आहे’, असे तारेक फतेह म्‍हणायचे. तारेक तरुण असतांना मार्क्‍सवादी विद्यार्थी नेते होते. त्‍यांनी जीवरसायनशास्‍त्रात पदवी घेतली. कराचीतील ‘सन’ नियतकालिकाचे ते बातमीदार होते. जनरल झिया-उल-हक यांच्‍या लष्‍करी सरकारने त्‍यांना दोनदा कारागृहात पाठवले. त्‍यांच्‍यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला.

२. तारेक फतेह यांचे भारताविषयीचे प्रेम दर्शवणारी उदाहरणे

अ. तारेक यांनी रजत शर्मा यांच्‍या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमामध्‍ये सांगितले होते, ‘‘बाबर हा तर भारतीय इतिहासातील भंगार होता. तो हिंदुस्‍थानी लोकांना काळे वानर मानत असे.’’ राममंदिराचे बांधकाम चालू झाले, तेव्‍हा तारेक फतेह आनंदित झाले होते. त्‍या रात्री म्‍हणजे ऑगस्‍ट २०१८ मध्‍ये फतेह हे टोरंटोमध्‍ये धोतर गुंडाळून नाचले होते.

आ. ऑगस्‍ट २०१८ मध्‍ये वृत्तवाहिन्‍यांनी बातमी दिली, ‘नवी देहली नगरपालिकेने ‘औरंगजेब रोड’चे नाव पालटून ‘डॉ. ए.पी.जे. अब्‍दुल कलाम रोड’, असे केले होते. फतेह यांच्‍या मते हा एक ऐतिहासिक कलंक पुसला होता. त्‍यांच्‍या लोकप्रिय टिव्‍ही कार्यक्रमात फतेह हे नेहमीच ब्रिटीश राजमधील मोगलांच्‍या महिमामंडनाचे कठोर टीकाकार राहिले. त्‍यांनी अनेकदा म्‍हटलेही होते, ‘‘अत्‍याचारी औरंगजेबाची नामोनिशाणी भारतातून पुसली गेली पाहिजे.’’ त्‍यांच्‍या या सूचनेला पूर्व देहलीचे लोकसभेतील भाजप सदस्‍य महेश गिरी यांनी गती दिली. आपल्‍या भाषणात फतेह म्‍हणाले होते, ‘‘आज केवळ हिंदुस्‍थानच इस्‍लामी राष्‍ट्रांच्‍या दहशतीला नष्‍ट करू शकतो; म्‍हणून तुम्‍ही आरंभी नवी देहलीतील ‘औरंगजेब रोड’चे नाव ‘दारा शिकोह रोड’ करू शकता का ?’’ हा त्‍यांचा प्रश्‍न होता. औरंगजेबाने त्‍याचा सख्‍खा भाऊ दारा शिकोह याला लाल किल्‍ल्‍याजवळ हत्तीच्‍या पायी देऊन चिरडले होते. त्‍यांचे डोके थाळीत ठेवून पिता शाहजहां याला नाश्‍त्‍यात (न्‍याहरीमध्‍ये) वाढले होते. केंद्रातील मोदी सरकारने ३ वर्षांत औरंगजेब रोडचे नाव पालटले.

इ. काश्‍मीरवरील पाकिस्‍तानच्‍या हिंसक आक्रमणांचा ते नेहमी निषेध करत राहिले. ते मुळातच फाळणीच्‍या विरोधात होते.

३. तारेक यांचे बलुचिस्‍तान प्रांत आणि यहुदी यांच्‍याविषयीचे मत

तारेक फतेह हे त्‍यांच्‍या टिव्‍ही कार्यक्रमात वारंवार म्‍हणायचे की, त्‍यांना बलुचिस्‍तान प्रांताला ‘स्‍वतंत्र देश’ म्‍हणून पाहायचे आहे. पाकिस्‍तानने त्‍यांना गुलाम करून ठेवले आहे. ‘द ज्‍यू इज नॉट माय एनिमी : अनव्‍हिलिंग द मिथ्‍स दॅट फ्‍युएल मुस्‍लिम अँटी सेमिटिझम्’ (ज्‍यू माझा शत्रू नाही : ‘मुसलमान ज्‍यूद्वेषा’संदर्भातील मिथकांचे अनावरण) या त्‍यांच्‍या पुस्‍तकात फतेह यांनी स्‍पष्‍ट लिहिले होते, ‘भ्रामक इतिहासाच्‍या परिणामी ज्‍यूंवर अत्‍याचार करण्‍यात आले.’ मुंबईत ९ नोव्‍हेंबर २००८ या दिवशी ज्‍यू नागरिकांवर झालेल्‍या गोळीबाराने ते संतप्‍त झाले होते. या वैमनस्‍याच्‍या मुळांचा त्‍यांनी शोध घेतला.‘ ज्‍यूंविषयी असलेली उत्‍कट घृणा हेच इस्‍लामचे मूळ तत्त्व आहे’, असे त्‍यांना आढळले. यावर उपाय शोधण्‍याच्‍या बाजूने ते होते.

४. जनरल परवेझ मुशर्रफ आणि इस्‍लामी आतंकवाद यांविषयी तारेक यांनी केलेली मागणी

तारेक फतेह यांनी तत्‍कालीन पाकिस्‍तानी अध्‍यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी इस्‍लामाबादमधील लाल मशीद आणि तिच्‍यातील आतंकवादी यांवरील कारवाईच्‍या मागील राजकारणाची चौकशी करण्‍याची मागणी केली होती. त्‍यांच्‍या दृष्‍टीने हे कारस्‍थान होते. तारेक फतेह यांनी लिहिले होते, ‘जनरल मुशर्रफ आणि त्‍यांना आसरा देणारी अमेरिका या दोघांनाही हे जाणवायला पाहिजे की, मलेरियाशी लढण्‍यासाठी दलदल रिकामी करायची आवश्‍यकता आहे, वेगवेगळ्‍या डासांना मारण्‍याची नाही. पाकमधील इस्‍लामी आतंकवादाशी लढण्‍याचा सर्वोत्तम मार्ग हा आहे की, खोट्या मतदार याद्या संपुष्‍टात आणून लोकशाही निवडणुका घ्‍याव्‍यात. निर्वासित राजकारण्‍यांना देशात परतण्‍याची मुभा द्यायला हवी.’ यामुळे तारेक फतेह यांना देशद्रोही ठरवण्‍यात आले.

५. जहाल मुसलमान संघटनांकडून तारेक फतेह यांच्‍या विरोधात काढण्‍यात आलेले फतवे

‘अखिल भारतीय फैजान-ए-मदिना परिषदे’ने एका खासगी वृत्तवाहिनीवरील तारेक फतेह यांच्‍या ‘फतेह का फतवा’ या कार्यक्रमावर तात्‍काळ बंदी घालण्‍याची मागणी केली होती. बरेलीतील एका मुसलमान संघटनेने ‘कथितरित्‍या आपल्‍या टीव्‍ही कार्यक्रमातून गैरइस्‍लामी विचारांचा प्रसार करण्‍याविषयी तारेक फतेह यांचे शीर कलम करणार्‍याला १० लाख रुपये पुरस्‍कार देण्‍याची घोषणा केली होती.’

– के. विक्रम राव

(साभार : साप्‍ताहिक ‘विवेक’, २८.४.२०२३)

तारेक फतेह भारतीय मुसलमानांना सल्ला देत असत. ते म्‍हणत, ‘आपल्‍या आत्‍म्‍याला इस्‍लामी बनवा, मेंदूला नाही. गर्वावर हिजाब घाला, चेहर्‍यावर नको. बुरख्‍याने डोके झाका, चेहरा नव्‍हे.’

– के. विक्रम राव

तारेक फतेह यांनी इस्‍लामी मूलतत्त्ववादावर लिहिलेली जगप्रसिद्ध पुस्‍तके

१. ‘चेजिंग अ मिराज : द ट्रॅजिक इल्‍यूजन ऑफ अ‍ॅन इस्‍लामिक स्‍टेट’ (एका मृगजळाचा पाठलाग : एका इस्‍लामी राज्‍याचा दुर्दैवी भ्रम !)

२. ‘द ज्‍यू इज नॉट माय एनिमी : अनव्‍हिलिंग द मिथ्‍स दॅट फ्‍युएल मुस्‍लिम अँटी सेमिटिझम्’ (ज्‍यू माझा शत्रू नाही : ‘मुसलमान ज्‍यूद्वेषा’संदर्भातील मिथकांचे अनावरण)

(साभार : सामाजिक संकेतस्‍थळ)

फतेह नेहमी कट्टर इस्‍लामी धर्मांधतेच्‍या विरोधात परखडपणे विचार मांडत. अनेक मुलाखतींमध्‍ये त्‍यांनी सांगितले होते की, ते मूळचे राजपूत असून १८४० च्‍या दशकात त्‍यांच्‍या पूर्वजांना बळजोरीने इस्‍लाम स्‍वीकारण्‍यास भाग पाडले गेले.

(साभार : सामाजिक संकेतस्‍थळ)